Thursday, 28 September 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 28.09.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

रेल्वे दुर्घटनांना आळा घालण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान वापरण्याचा सरकार विचार करत असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. रेल्वे संरक्षण आणि इशारा प्रणाली, तसंच मोबाईल रेल्वे रेडिओ यांना एकमेकांशी जोडण्याच्या व्यवस्थेमुळे सध्याच्या यंत्रणेत सुधारणा करता येईल, असं ते म्हणाले. सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये आणि स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रवाशांना संरक्षण, गती आणि सेवा प्रदान करण्याला रेल्वे मंत्रालयाचं प्राधान्य असल्याचं गोयल यावेळी म्हणाले.

****

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज नवी दिल्ली इथं ग्रामीण समृद्धी आणि स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याची घोषणा केली आहे. देशभरातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये एक ते १५ ऑक्टोबर दरम्यान हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये आमसभा घेऊन विकासाच्या मुद्यावर चर्चा करण्यात येणार आहे. गावात स्वच्छता, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, तसंच पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षण करणं, हा या पंधरवड्याचा उद्देश असल्याचं तोमर यांनी सांगितलं.

****

राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

राज्यात यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे मोठ्या प्रकल्पात उत्तम पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जलयुक्त शिवार योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी चाऱ्यांचं कामं हे खाजगी कंपन्याच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून करण्यासाठी नियोजन करणार असल्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितलं. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठवाडा कृष्णा-भिमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून निरा नदीतलं पाणी उजनीत आणण्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातला ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन प्रकल्प पूर्णत्वासाठी निधीची तरतूद आणि नियोजन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

मुंबईत पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगर रेल्वे मार्गावर अतिरिक्त शंभर रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहेत. या अतिरिक्त रेल्वे गाड्यांमध्ये मुंबईत लोकल रेल्वेची संख्या दोन हजार ९८३ वरुन तीन हजार ८३ इतकी होणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल उद्या मुंबई इथं या रेल्वेचा शुभारंभ करणार आहेत. यामुळे लोकलने रोज प्रवास करणाऱ्या ७७ लाख लोकांना फायदा होणार असल्याचं रेल्वे विभागानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

****

शिवसेनेच्या वतीनं जालना इथं आज पेट्रोल, डिझेल आणि गॅस दर वाढीविरोधात मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे पदाधिकारी बैलगाडीसह सायकल चालवत या मोर्चात सहभागी झाले. मामा चौक, महात्मा फुले मार्केट मार्गे काढण्यात आलेल्या मोर्चाचा महावीर चौकात समारोप करण्यात आला. याठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला आपल्या मागण्यांच निवेदन दिलं.

****

नांदेड जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीत ३५ पैकी २० जागा जिंकून काँग्रेस पक्षानं वर्चस्व प्राप्त केलं आहे. १७ जागांसाठी काल झालेल्या मतदानाची आज मतमोजणी करण्यात आली. या मंडळावरच्या १८ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.

धुळे जिल्हा नियोजन समितीच्या आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं चार तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत.

****

बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव औद्यागिक वसाहतीतल्या एका कारखान्यातून २५ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी मध्यरात्री या कारखान्यावर धाड टाकून ही कारवाई केली.

****

जालना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या चार संशयितांना अटक करून, २४ लॅपटाप, तीन एलसीडीसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई आणि जालना इथले रहिवासी असलेल्या या संशयितांनी गेल्या आठवड्यात शहरातल्या एका लॅपटॉप विक्रीच्या दुकानात चोरी केली होती.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरु इथं सुरु असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात, ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी ३३५ धावांचं लक्ष्य दिलं आहे. पहिले फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं निर्धारित षटकात पाच बाद ३३४ धावा केल्या. भारताकडून उमेश यादवनं चार, तर केदार जाधवनं एक बळी घेतला.

****

दुर्गाष्टमी आज सर्वत्र मोठ्या भक्तीभावानं साजरी करण्यात येत आहे, ठिकठिकाणच्या मंदीरांमध्ये आज अष्टमीचा होम करण्यात आला. विभागातल्या मोठ्या मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसून आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्गाष्टमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

No comments: