Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 September 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
संरक्षण मंत्री निर्मला सितारामन
या दोन दिवसीय जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज लडाखला सीमारेषेवर सुरक्षा
व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी खोऱ्यामध्ये अनेक भागांना भेटी दिल्या असून घुसखोरी
रोखण्यासाठी उत्तर काश्मीरमधल्या भक्कम व्यवस्थेचा आढावा घेतला. सैन्यानं पोलिस दल
आणि केंद्रीय सशस्र पोलिस दलासोबत निर्माण केलेल्या समन्वयाबद्दल त्यांचं कौतुकही केलं.
सितारामन यांनी नंतर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेऊन
सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली.
दरम्यान, सितारामन यांनी लेहमध्ये
प्रथम श्योक पुलाचं उद्घाटन केलं. हा पुल लेह ते काराकोरमला जोडणारा असून सैन्य दलाच्या
वाहतूकीसाठी ठरणार आहे.
****
मुंबईत एलफिन्स्टन स्थानकावर
चेंगराचेंगरीत झालेल्या २३ जणांच्या मृत्यूनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उपनगरीय
रेल्वेमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज रेल्वे मंडळाची मुंबईत बैठक
घेतली. या बैठकीत स्थानकावरून चालत जाण्यासाठीचे पुल हे आता प्रवाशांची सुविधा म्हणून
नव्हे तर बंधनकारक म्हणून असतील, असे निर्देश गोयल यांनी दिलेत. तसंच ज्या स्थानकावर
अधिक गर्दी असते अशा ठिकाणी अधिकच्या लिफ्ट बसवण्याचे निर्देशही गोयल यांनी यावेळी
दिले.
****
बुलेट ट्रेन प्रकल्प हा विमुद्रीकरणासारखा
प्रयत्न ठरणार असून त्याऐवजी या योजनेसाठीचे एक लाख कोटी रूपये रेल्वे सुरक्षेवर खर्च
करण्यात यावेत असं काँग्रेसचे जेष्ठ नेते पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या
कालच्या दुर्घटनेनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुंबई-अहमदाबाद बुलेट सेवा ही काही
सामान्य लोकांसाठी नसून उच्चभ्रू लोकांसाठी करण्यात येत असलेली सोय असल्याची टिकाही
त्यांनी यावेळी केली.
****
दरम्यान, या प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांचा
निष्काळजीपणा आणि सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई
उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या स्थानकावरचा पुल खूप अरुंद असल्याची तक्रार
नागरिकांनी याआधी केली होती, मात्र सरकार आणि रेल्वेकडून कोणतीही कारवाई केली गेली
नाही, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेतल्या मृतांची
संख्या २३ झाली आहे. सत्येंद्रकुमार कनोजिआ यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या विकासाला
केंद्रबिंदू मानून सहकार चळवळ अधिक गतिमान करावी, असं आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास
आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण
इथं आज संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकरी, कामगारांच्या
विकासासाठी शासन कटिबद्ध असून, त्यांच्याकरता लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात
येईल, असं जानकर यावेळी म्हणाले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे चार
दरवाजे आज सकाळी अकरा वाजता अर्ध्या फूटानं उघडण्यात आले. नदीपात्रात दोन हजार घनफूट
प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत असल्याचं पाटबंधारे विभागच्या वतीनं सांगण्यात
आलं. धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून जलशयात पाण्याची आवक चालूच असल्यामुळे विसर्गात
वाढही करण्यात येऊ शकते. धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातूनही प्रत्येकी एक हजार
आणि चारशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
परभणी इथं भारतीय बौद्ध महासभा
जिल्हा शाखेच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिन शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला. यावेळी पंचरंगी ध्वजास मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी
पी शिवशंकर यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
वतीनंही दसऱ्यानिमित्त परभणी इथं पथसंचलन करण्यात आलं.
****
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जालना शहरात येत्या
दोन ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. याबाबतचं नियोजन करण्यासाठी
आज जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात
बैठक घेतली. एक दिवस स्वच्छता मोहीम घेण्याऐवजी ‘झिरो कचरा सप्ताह’ राबवून आठवडाभरात
संपूर्ण शहर स्वच्छ करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. शहरात दररोज निघणाऱ्या
८० टन कचऱ्यापैकी ६० टन कचऱ्याचं नियमित संकलन केलं जातं, उर्वरित २० टन कचरा खासगी
एजन्सीची नेमणूक करून संकलित केला जाईल, असं नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्र शासनाच्या स्वच्छ दर्पण
स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. दोन ऑक्टोबरला नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. गावागावात आणि घरोघरी
शौचालय उभारणीसाठी जनजागृती व्हावी, तसंच सार्वजनिक स्वच्छता वाढावी यासाठी केंद्रशासनानं
'स्वच्छ दर्पण' ही स्पर्धा जाहीर केली होती.
****
No comments:
Post a Comment