Sunday, 24 September 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad - 24.09.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून साताऱ्याच्या लेफ्टनंट जनरल स्वाती महाडिक यांचं कौतुक केलं. स्वाती महाडिक यांचे पती संतोष महाडिक यांना दोन वर्षांपूर्वी जम्मू काश्मीर मध्ये कुपवाडा इथं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं, त्यानंतर स्वाती यांनीही लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला, संपूर्ण प्रशिक्षण घेऊन, त्या सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या, स्वाती यांच्यासह निधी दुबेही पतीच्या निधनानंतर लष्करात रुजू झाल्या, या महिलांचं धैर्य आणि धाडसाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. खादी या विषयावरही पंतप्रधानांनी मन की बात मधून मत व्यक्त केलं. तरूण पिढीमध्ये खादीचे आकर्षण वाढत असल्याने खादीच्या विक्रीत वाढ झाली असून, खादी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये एका नव्या पद्धतीने विचार करण्याचा उत्साह निर्माण झाला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशात अनेक ठिकाणचे बंद पडलेले खादी निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं.

****

आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांनी घरगुती वापराच्या गॅसवरचं अनुदान घेतलं नाही, तर गरजुंना अनुदान देणं सोपं जाईल, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनऊ इथं एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ४० रुपये प्रती लिटर दरानं इथेनॉल खरेदी करणार असल्याचं प्रधान यांनी यावेळी सांगितलं. जैव कचरा आणि उसाच्या कचऱ्यापासून इंधन तयार करण्याच्या योजनेवर काम सुरु असल्याचं ते म्हणाले. 

****

केंद्र सरकारने पेट्रोल-गॅस दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. ते आज अहमदनगर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमती पाहता ही भाववाढ करण्याची गरज नव्हती, या दरवाढीची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागत असल्याचं पवार म्हणाले. इंधन वाढीविरोधात शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी अभिनंदन केलं, सत्तेत राहून परिस्थिती सुधारा किंवा सत्तेतून बाहेर पडून आंदोलन करा असा सल्ला पवार यांनी दिला. शेतकरी कर्जमाफी, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन या मुद्यांवरूनही पवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.

****

जम्मू काश्मीरमध्ये बारामुला जिल्ह्यातल्या सोपोर इथं आज दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक आणि तीन स्थानिक नागरिक जखमी झाले. एका दहशतवाद्यानं सीमा सुरक्षा बलाच्या शिबिराजवळ हातबॉम्ब फेकल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

****

जालना जिल्ह्यातल्या बरंजळा इथं तहसीलदारांनी जप्त केलेला वाळूचा ट्रक एका संशयितानं दोन तलाठ्यांसह पळवून नेला. आज सकाळी ही घटना घडली. महसूल आणि पोलिस पथकानं पंधरा किलोमीटर पाठलाग करून ग्रामस्थांच्या मदतीनं हा ट्रक पकडून, चालकास ताब्यात घेतलं आणि तलाठ्यांची सुटका केली. ट्रक पळवून नेणाऱ्या सर्जेराव चव्हाण याच्यावर या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या कस्तुरवाडी इथं, आज दुपारी कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. यातील दोघी सख्ख्या बहिणी आहेत.

****

पैठणच्या जायकवाडी धरणातली पाण्याची आवक मंदावली असून, धरणाची पाणी पातळी साडे अठ्ठ्याण्णव टक्क्यांवर स्थिर आहे. धरणाचे सर्व दरवाजे बंद असले तरी, डाव्या तसंच उजव्या कालव्यातून अनुक्रमे एक हजार आणि पाचशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मांजरा धरणाचे चार दरवाजे बंद करण्यात आले असून, आज सकाळी धरणाच्या दोन दरवाजातून सुमारे ५० घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होता.

****

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे आज सकाळी धावणी मोहल्ला परिसरात हेरिटेज वॉक घेण्यात आला. या भागातला ऐतिहासिक उदासी मठ, भाई दयासिंग गुरुद्वारा, हनुमान मंदिर, कुस्तीचा 200 वर्षे जुना आखाडा आणि प्रसिद्ध अप्पा हलवाई यांच्याबद्दल इतिहासप्रेमींना माहिती देण्यात आली. इतिहासप्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान इंदूर इथं सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर २९४ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पहिल्यांदा फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघानं ५० षटकात सहा बाद २९३ धावा केल्या. भारताकडून जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन, तर यजुवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी एक बळी घेतला. 

****

मकाऊ खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताचा सौरव घोषाल आज अंतिम सामना खेळणार आहे. त्याच्यासमोर इजिप्तच्या मोहम्मद अबोलघरचं आव्हान असेल.

****

No comments: