Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 SEP. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ सप्टेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दिनदयाळ
उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. दिनदयाळ उपाध्याय हे आपले
प्रेरणास्त्रोत असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंडित दिनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक
असून, पक्षाच्या स्थापनेपासूनच त्यांच्या मूल्याचं पालन केलं जात असल्याचंही पंतप्रधानांनी
नमूद केलं.
****
दरम्यान, पंतप्रधान आज पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त
सर्वांसाठी वीज या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत ट्रान्सफॉर्मर, मीटर,
वीजेच्या तारांसारख्या उपकरणांवर अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान तेल
आणि प्राकृतिक गॅस निगम - ओ एन जी सीच्या नवीन कार्यालयाचं औपचारिक उद्घाटनही करणार
आहेत. या कार्यलयाचं नाव राजीव गांधी ऊर्जा भवन बदलून पंडित दिनदयाळ ऊर्जा भवन करण्यात
आलं आहे.
****
माध्यमांनी बातम्या देताना खळबळजनक बातम्यांना प्राधान्य न देता बातम्यांची विश्वासार्हता
जपण्यावर भर दिला पाहिजे, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नवी
दिल्ली इथं एका पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. विश्वसनीयता ही पत्रकारितेतली
सर्वात महत्वाची गोष्ट असल्याचं ते म्हणाले. वृत्तपत्र आणि वाहिन्यांनी विकासात्मक
पत्रकारितेवर चर्चा करायला पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीच्या आयुक्तांना बनारस
हिंदू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारीचा आणि पत्रकारांच्या जखमी होण्याचा
अहवाल मागितला आहे. गेल्या शनिवारी विद्यापीठाच्या कुलगुरुंना भेटण्यासाठी गेलेल्या
विद्यार्थ्यांवर सुरक्षा रक्षकांनी लाठीमार केल्यानंतर हिंसक परिस्थिती निर्माण झाली
होती.
दरम्यान, या लाठीमार प्रकरणी राज्य सरकारनं तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि दोन
पोलिसांना निलंबित केलं आहे.
****
क्रिडा मंत्रालयानं
बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. सिंधूनं नुकतंच
कोरिया ओपन सुपर सीरिज चषकावर आपलं नाव कोरलं. कोरिया ओपन सुपर सीरिज जिंकणारी सिंधू
ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक आणि
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सलग दोन वर्ष कांस्य पदक जिंकलं आहे. २०१५ मध्ये सिंधूला
पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
****
ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरूण साधू यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या साहित्यातून समकालिन राजकीय-सामाजिक स्थितीचं
यथार्थ दर्शन घडवून मराठी साहित्याला वास्तववादी वळण देणारा लेखक आपण गमावला असल्याची
भावना व्यक्त करुन, मुख्यमंत्र्यांनी साधू यांना श्रद्धांजली अर्पण केली. साधू यांचं
आज पहाटे मुंबई इथं निधन झालं, ते शहात्तर वर्षांचे होते. साधू यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्यानं त्यांच्यावर
अंत्यसंस्कार केले जाणार नाही.
****
सोलापूर हैदराबाद
महामार्गावर कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच
मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. आज सकाळी हा अपघात झाला. मृत दोघे जण उमरगा इथले
रहीवाशी होते.
****
पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात सध्या सहा
हजार ६०१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातलं मांजरा धरण शंभर टक्के भरलं आहे. धरणात सध्या
१७७ दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद वेगानं आवक सुरु असून, धरणाच्या दोन दरवाज्यातून ४९ पूर्णांक
४८ घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.
****
जालना इथंल्या नाफेड हमीभाव केंद्रावरच्या तूर खरेदी घोटाळ्यात सहभागी असलेल्या
११ संशयित आरोपींना पोलिसांनी काल रात्री उशिरा अटक केली. या तूर खरेदी घोटाळ्यात ७०
जणांवर गुन्हे दाखल असून, अन्य संशयितांना लवकरच अटक केली जाईल, असं पोलीस निरीक्षक
योगेश गावडे यांनी सांगितलं.
****
स्वच्छ भारत अभियाना
अंतर्गत परभणी शहर निर्मल झालं असल्याचं महानगर पालिकेतर्फे सांगण्यात आल आहे. या अभियानाच्या
दुसऱ्या टप्पात ओला आणि सुका कचरा वेगळा करुन त्याचं खत तयार केलं जाणार आहे, अशी
माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
****
तुर्कमेनिस्तान
मधल्या अशगाबात इथं सुरु असलेल्या पाचव्या आशियाई इनडोअर आणि मार्शल आर्ट्स खेळांमध्ये
भारतीय कुस्तीपटू बजरंगनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. बजरंगनं ६५ किलोग्रॅम गटात जपानच्या
दाईची तकातानीचा पराभव केला. या स्पर्धेत भारत सहा सुवर्ण, सात रौप्य आणि अकरा कांस्य
पदकांसह पदक तालिकेत बाराव्या स्थानावर आहे.
****
सत्तावन्नावी राष्ट्रीय
ॲथलेटिक्स स्पर्धा आजपासून चेन्नई इथं सुरु होत आहे. देशभरातून बाराशे ॲथलिट या स्पर्धेत
सहभागी झाले आहेत.
****
No comments:
Post a Comment