Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 29 SEP. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
मुंबईत एलफिन्सट्न आणि परळ रेल्वे स्थानकांना
जोडणाऱ्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २२ जण ठार तर ५० हून अधिक जण जखमी झाले.
आज सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अचानक मोठा आवाज होऊन शॉर्टसर्किट
झाल्याने पादचाऱ्यांमध्ये धावपळ, ढकलाढकली सुरू झाल्यानं, ही दुर्घटना घडल्याचा अंदाज
आहे. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना केईएम रुग्णालयात
उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यासाठी
अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक सुरक्षा यंत्रणा विकसित करण्याकरता रेल्वे मंत्रालय
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची मदत घेत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल दिल्लीत
वार्ताहरांना ही माहिती दिली. या संदर्भात आपण भारतीय अंतराळ संशाोधन संस्था - इस्त्रोचे
अध्यक्ष ए एस किरणकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असल्याचं गाोयल यांनी
सांगितलं. सुरक्षेसंबंधीची ही यंत्रणा विकसित करण्यासाठी भारतीय रेल्वे आणि रेलटेल
ही कंपनी संयुक्तरित्या प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं
कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल होऊन लाखो भारतीयांचं २४ तास वीज आणि निरंतर संपर्काचं स्वप्न
साकार होईल अशी ग्वाही गोयल यांनी दिली.
****
प्रवासी वाहतुक करणाऱ्या विमानांनी नियंत्रण
कक्षाकडून उड्डाणाची परवानगी मिळाल्यावर पाच मिनिटांत उड्डाण न केल्यास, त्यांना रांगेतल्या
सर्व विमानांची उड्डाणं झाल्यावरच उड्डाण करता येणार आहे. उड्डाणाला होणाऱ्या उशीरामुळे
विमानसेवेचं वेळापत्रक सतत कोलमडत असल्यानं, नागरी हवाई वाहतुक विभागाच्या महासंचालकांनी
हा निर्णय घेतला आहे. मुंबई तसंच दिल्ली विमानतळावर ही समस्या सातत्यानं उद्भवत असल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना
निवडणूक निधी उपलब्ध करून देणारी योजना अंतिम टप्प्यात असल्याचं वित्तमंत्री अरूण जेटली
यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते. सरकारनं
निवडणूक निधी रोखे उभारण्याबाबतची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पातच केली होती आणि ती प्रत्यक्षात
आणण्याचा आपला निर्धार आहे असं ते म्हणाले. निवडणूक रोख्यांचं स्वरूप विशिष्ट व्याजदरावरील
कर्जाप्रमाणे नव्हे तर हमीपत्रासारखं असेल असं जेटली यांनी सांगितलं. या रोख्यांची
विक्री प्राधिकृत बँकांमार्फत करण्यात येईल. वैधता कालावधीत ते संबंधित राजकीय पक्षांच्या
अधिसूचित खात्यातच जमा करता येतील. रोख्यांवर करदात्यांचं नाव नसेल आणि केवळ ज्यावर
कर भरलेला आहे असाच निधी या रोख्यांद्वारे राजकीय पक्षांना मिळेल याची काळजी घेतली
जाईल अशी ग्वाही जेटली यांनी यावेळी दिली.
****
इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या
द्वेषमूलक वक्तव्यांना आळा घालण्यासाठी नवा कायदा किंवा विद्यमान कायद्यात सुधारणा
सुचवण्यासाठी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीनं न्यायालयाच्या एका निर्णयानंतर लोकसभेचे
माजी सरचिटणीस टी के विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती.
सर्व राज्यांमध्ये सायबर गुन्हे हाताळण्यासाठी समन्वयक नियुक्त करावेत तसंच प्रत्येक
जिल्ह्यात सायबर गुन्हे विषयक स्वतंत्र कक्ष सुरू करावा अशी शिफारस या समितीनं केली
आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तसंच भारतीय दंड विधानाच्या काही कलमांमध्ये या
समितीनं सुधारणाही सुचवल्या आहेत. समितीच्या शिफारसींचा अभ्यास सुरू असून लवकरच त्याबाबत
निर्णय होईल असं गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
****
नवरात्रोत्सवात आज महानवमी सर्वत्र साजरी
होत आहे. तुळजापूर इथं तुळजाभवानी देवी मंदिरात काल होमहवनासह पूर्णाहुती देण्यात आली.
अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवी मंदिरातही काल महाअष्टमीला पूर्णाहुती देण्यात आली. आज
नवमीनिमित्तानं भाविकांनी नांदेड जिल्ह्यातल्या माहूरसह सर्वत्र दर्शनासाठी मोठी गर्दी
केली आहे. औरंगाबाद शहरातही कर्णपुरा भागात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी
पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या.
****
पैठणचं जायकवाडी धरण शंभर टक्के भरलं
आहे. धरणात सध्या तीन हजार दोनशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून,
धरणाच्या डाव्या कालव्यातून पाचशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणात होणारी अत्यल्प आवक पाहता, धरणातून अद्याप विसर्ग करण्याची शक्यता नाही, असं
पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment