Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 September 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
पर्यटनाचा
विकास झाल्यास गरिबी दूर होण्यास मदत होते, असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
व्यक्त केलं आहे. जागतिक पर्यटनदिनाच्या अनुषंगानं आज नवी दिल्ली इथे राष्ट्रपतींच्या
हस्ते राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांचं वितरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या
पर्यटनस्थळांचा दर्जा सुधारण्यासाठी अधिक परिश्रम घेण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त
केली. ‘अतुल्य भारत - द्वितीय’ या मोहिमेचं राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी उद्घाटन झालं.
****
भारतीय सैन्यानं
म्यानमार सीमेवर मोठी कारवाई करत नागा उग्रवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले आहेत. आज पहाटे
पावणेपाचच्या सुमारास नागा उग्रवाद्यांनी, सीमेवर भारतीय गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्याच्या
उत्तरात सैन्य दलानं ही कारवाई केली. या कारवाईत नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालिम
या अतिरेकी संघटनेचे अनेक अतिरेकी ठार झाल्याचं वृत्त आहे.
****
पोलिस दलाच्या
आधुनिकीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं २५ हजार ६० कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी
दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी तीन वर्षांत
अंतर्गत सुरक्षा, महिला सुरक्षा, आधुनिक शस्त्रखरेदी, सीसीटीव्ही यंत्रणेसह इतर व्यवस्थेचं
आधुनिकीकरण यातून केलं जाणार आहे. केंद्रीय आरोग्य सेवेच्या आयुष विभाग, सैन्यदल, रेल्वे
ईत्यादी विभागात कार्यरत डॉक्टरांचं सेवानिवृत्तीचं वय ६२ वरून ६५ करण्याच्या प्रस्तावालाही
मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
लष्कराच्या
सर्व छावण्यांमध्ये मोबाईल टॉवर्स उभे करण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं
घेतला आहे. कॉल ड्रॉप - संवाद खंडीत होण्याची समस्या वाढत असल्याची तक्रार दूरसंचार
कंपन्यांकडून वारंवार होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
****
कुख्यात गुन्हेगार
दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याच्या पोलिस कोठडीत न्यायालयानं चार दिवसांची वाढ
केली आहे. ठाण्यातल्या बिल्डरला खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी
शाखेनं गेल्या आठवड्यात इकबालला अटक केली होती.
****
जालना जिल्ह्याच्या
जाफराबाद तालुक्यातल्या चाळीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. सरपंचपदी
विजयी झालेल्या चाळीस उमेदवारांपैकी भारतीय जनता पक्षानं २२, तर राष्ट्रवादी कांग्रेस
पक्षानं १४ उमेदवार आपल्या पक्षाचे असल्याचा दावा केला आहे. इतर चार उमेदवार शिवसेना
पुरस्कृत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सदस्य पदाच्या एकूण जागांपैकी ७७ जण बिनविरोध
निवडून आले आहेत. तालुक्यातल्या उर्वरित पंधरा ग्रामपंचायतींसाठी येत्या सात ऑक्टोबरला
मतदान होणार आहे.
****
नवरात्रोत्सवात
आज तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार स्वरुपात महापूजा बांधण्यात
आली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवीला अर्पण केलेले दागिने आज तुळजाभवानी देवीला
घालण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बीड जिल्ह्यात
अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
****
कोल्हापूर-शिरडी
रेल्वेसेवेला आजपासून कोल्हापूर इथून प्रारंभ झाला. अठरा डब्यांच्या या साप्ताहिक गाडीला
मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड आणि अहमदनगर हे मुख्य थांबे असतील.
****
बीड जिल्ह्यातल्या
माजलगाव धरणातला पाणी साठा सुमारे ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. माजलगाव धरणासाठी जायकवाडी
धरणाच्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जायकवाडीचा पाणी साठा ९९ पूर्णांक ६६
टक्क्यांवर पोहोचला आहे. विष्णुपुरी बंधारा शंभर टक्के, सिद्धेश्वर प्रकल्प ५५ टक्के
तर येलदरी प्रकल्पात सध्या जवळपास बारा टक्के पाणीसाठा आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं
खेळाच्या दर्जात सुधारणा करण्याच्या उद्देशानं नवीन नियमावली तयार केली आहे. बॅटचा
आकार, चौकार- षटकार, तसंच अनुचित वागणुकीसाठी कडक शिक्षेसंदर्भातले हे नियम उद्यापासून
लागू होणार आहेत.
दरम्यान, भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय
सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना उद्या बंगळुरू इथं होणार आहे. पाच सामन्यांच्या
या मालिकेतले याआधीचे तीनही सामने जिंकलेला भारतीय संघ उद्याचा सामना जिंकून एकदिवसीय
सामन्यांसाठीच्या जागतिक क्रमवारीतलं सर्वोच्च स्थान टिकवण्याचा प्रयत्न करेल.
****
No comments:
Post a Comment