आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२० सप्टेंबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
मुंबईमध्ये काल झालेल्या
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून दक्षतेचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयं
आज बंद आहेत . येत्या काही तासात मुंबईत जोरदार पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्यानं
वर्तवला आहे. राज्यात काल कोकणट्टीसह कोल्हापूर, सातारा, नाशिक आणि अन्य भागातही जोरदार
पाऊस झाला.
बंगालच्या खाडीत कमी दाबाचं
क्षेत्र तयार झालं असून त्यामुळ येत्या काही तासात ओडिशाच्या काही भागात मुसळधार वृष्टी
होण्याची शक्यताही हवामानखात्यान वर्तवली आहे. नाशिक शहर आणि परिसरात काल संध्याकाळनंतर
झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे या पावसामुळे रेल्वेसेवा काही
अंशी प्रभावित झाली असून मुंबईहून येणाऱ्या सगळया गाडया उशीरा येत आहेत.
****
केंद्र सरकारच्या निवृत्त
होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकार आज एक मोबाईल अॅप सुरु करणार आहे . पेन्शन कॅलक्यूलेटर
या नावाच्या या अॅपमुळे या कर्मचाऱ्यांना आपल्या
निवृत्ती वेतनासंबंधी, निधीसंबंधी आणि कारकीर्दीच्या नोंदींसंबंधी माहिती मिळवता
येईल तसंच यासंदर्भातल्या आपल्या तक्रारीही दाखल करता येतील.
****
राज्यातल्या सातशे वीस किलोमीटर लांबीच्या सागरी किनाऱ्याचं
संरक्षण करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेत कालपासून दोन अत्याधुनिक बोटींचा
समावेश करण्यात आला आहे. मुरुड जंजिऱ्या जवळच्या दिघी बंदरावर काल झालेल्या एका शानदार
समारंभात या बोटी नौदलात दाखल झाल्या.
****
२००८ च्या मालेगाव बॉबस्फोट
प्रकरणातल्या दोन आरोपींचा जामीन राष्ट्रीय तपास पथकानं मंजूर केला आहे. सुधाकर चतुर्वेदी
आणि सुधाकर द्विवेदी उर्फ शंकराचार्य अशी त्या दोघांची नावं आहेत.
****
उत्तर अमेरिकेतल्या मेक्सिकोची
राजधानी मेक्सिको सिटी इथे काल रात्री शक्तीशाली भूकंपाचा धक्का बसला.रिश्टर स्केल
वर सात पूर्णांक एक दशांश इतक्या तीव्रतेच्या या भूकंपानं शहरातल्या अनेक इमारती कोसळून
आतापर्यंत एकशे एकोणचाळीस लोक मृत्यूमुखी
पडले असल्याचं वृत्त आहे..
****
येत्या
काही महिन्यात येणाऱ्या दसरा ,दिवाळी आणि छठपूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं
देशभरात चार हजार विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेगाड्या
तीस आक्टोंबर पर्यंत सुरु राहतील.
****
No comments:
Post a Comment