Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 SEP. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ सप्टेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
आपत्ती व्यवस्थापन आणि मदत संदर्भातल्या
प्रकरणांमध्ये सर्व देशांना एकाच प्रकारे विचार करावा लागेल, असं केंद्रीय गृहमंत्री
राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
- एन डी एम ए च्या १३व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पूर
परिस्थिती हाताळण्यासाठी अधिक प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
****
सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेण्याकरता
आधार नोंदणी करण्यासाठीची आणि आधार क्रमांक आपल्या खात्याला जोडण्यासाठीची मुदत तीन
महिने वाढवण्यात आली आहे. ही मुदत ३० सप्टेंबरला संपणार होती, आता यासाठीची अंतिम तारीख
३१ डिसेंबर २०१७ ही असेल. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं यासंदर्भातला शासन
निर्णय जारी केला. गरीब महिलांसाठी स्वयंपाकाचा गॅस मोफत उपलब्ध करुन देणारी योजना,
सार्वजनिक विरतण व्यवस्था, मनरेगा, खतं आणि केरोसिनवरचं अनुदान, अशा १३७ योजनांच्या
लाभार्थ्यांकरता आधार नोंदणी आवश्यक आहे.
****
लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सलग तीन
वर्ष भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात गतीमान अर्थव्यवस्था राहीली असल्याचं रेल्वेमंत्री
पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. जगाच्या वर्तमान
वृद्धीला देखील भारत चालना देत असल्याचं ते म्हणाले. जीएसटीसह काही क्रांतिकारी सुधारणा
एनडीए सरकारनं केल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
जम्मू काश्मीर सरकारनं दिव्यांग सैनिक
आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना स्वयंरोजगारासाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध
करुन देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग सैनिकांना चार ते सात
टक्के वार्षिक दरावर २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. जम्मू काश्मीरमधले
रहीवाशी आणि ४० टक्क्यांहून जास्त अपंगत्व असणाऱ्या सैनिकांसाठी ही योजना आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
दिल्या आहेत. लता मंगेशकर यांचा आवाज राष्ट्राची धुन आणि आत्मा बनून कायम राहील, असं
राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधानांनी लता मंगेशकर यांना
दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य चिंतीलं आहे, तसंच मंगेशकर यांचा आवाज कोट्यावधी भारतीयांच्या
मनात गुंजत असल्याचं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
नजीक चिकलठाणा इथं रेल्वेच्या साफसफाईसाठी पीट लाईनचं काम
येत्या वर्षभरात पूर्ण होईल, असं दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार
यादव यांनी सांगितलं. ते आज या पीट लाईनची
पाहणी करण्यासाठी औरंगाबाद इथं आले असता वार्ताहरांशी बोलत होते. परभणी मुखेड या रेल्वेमार्गाचं
दुहेरीकरण डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल, तसंच दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर
असणारे सर्व मानव रहित रेल्वे फाटकं बंद
करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. प्रवाशांच्या
सुविधांवर जास्तीत जास्त प्रमाणात भर देण्यात येत असून,
गाड्यांच्या
फेऱ्या वाढवणं आणि सणांच्या काळात विशेष रेल्वे चालवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
पाचव्या आशियाई इनडोअर आणि मार्शल आर्ट्स
खेळांचा तुर्कमेनिस्तानमधल्या अशगाबात इथं काल समारोप झाला. शेवटच्या दिवशी भारतीय
खेळाडूंनी चार पदकं पटकावली. टेनिसपटू सुमित नागल यानं पुरुष एकेरीत सुवर्ण पदक पटकावलं,
बुद्धीबळात पुरुषांच्या ब्लेट्स टीम प्रकारात दिप्तायन घोष आणि वैभव सुरु यांनी प्रत्येकी
एक कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारतानं नऊ सुवर्ण, १२ रौप्य आणि १९ कांस्य पदक
मिळवून पदक तालिकेत अकरावं स्थान मिळवलं.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपासून नव्या
नियमांची अंमलबजावणी होणार आहे. नव्या नियमानुसार एखाद्या खेळाडूनं गैरवर्तन केलं तर,
त्याला संपूर्ण सामन्यासाठी मैदानाबाहेर काढलं जाऊ शकतं. बॅटच्या कडांचीं जाडी, झेल,
धावचीत याबातही नियम बदलण्यात आले आहेत. तसंच
कसोटी सामन्यात डावाचा खेळ ८० षटकांहून जास्त झाल्यानंतर पंचांचा निर्णयाचा ‘टॉप अप
रिव्ह्यू’ मागता येणार नाही, असा नवीन नियमही आजपासून लागू झाला. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये
आज होणारा एकदिवसीय सामना, तसंच दक्षिण आफ्रिका आणि यूएईमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यात
हे नवे नियम लागू असतील.
****
दरम्यान, भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांच्या
मालिकेतला चौथा सामना आज बंगळुरू इथं होणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतले याआधीचे
तीनही सामने जिंकलेला भारतीय संघ चौथा सामना जिंकून एकदिवसीय सामन्यांसाठीच्या जागतिक
क्रमवारीतलं सर्वोच्च स्थान टिकवण्याचा प्रयत्न करेल. दुपारी दीड वाजता हा सामना सुरू
होईल.
****
औरंगाबाद इथल्या महावितरण कार्यालयातले
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. कार्यालयात उशीरा येणं,
कामात दुर्लक्ष करणं यामुळे ही कारवाई करण्यात आली. यात २० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना
निलंबित करण्यात आलं असून, १४८ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment