Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 SEP. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ सप्टेंबर २०१७
सकाळी ६.५० मि.
****
** योग आणि विपश्यना हा आयुष्य जगण्याचा एक मार्ग - राष्ट्रपतींचं
प्रतिपादन
** अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ; मात्र संघटनांचा येत्या
बुधवारी मुंबईत मोर्चा
** अनधिकृतपणे सार्वजनिक
वाहतूक करणाऱ्या वाहनांना अधिकृत परवाने देणार
आणि
** जायकवाडी धरणातून पाण्याचा
विसर्ग वाढवला; मांजरा धरणाच्या सहा दरवाजातून विसर्ग सुरू
****
योग आणि विपश्यना कोणत्याही धर्माशी संबंधित
नसून, आयुष्य जगण्याचा एक मार्ग असल्याचं, प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
केलं आहे. काल नागपुरात कामठी ड्रॅगन पॅलेस इथं विपश्यना केंद्राचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी
सकाळी नागपूर इथं दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला
अभिवादन केलं. पवित्र दीक्षाभूमी संपूर्ण जगाला त्याग, शांती आणि मानवतेकडे जाण्यास
प्रेरित करते, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. नागपूर इथं रेशीमबाग परिसरात उभारण्यात आलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहाचं लोकार्पण
तसंच सुरेश भट यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण ही राष्ट्रपतींच्या हस्ते काल करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी २१व्या शतकाला
नवी शक्ती देण्याचे सामर्थ्य महाराष्ट्रात असल्याचं नमूद केलं.
****
अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढ करण्यात
आली आहे, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली. अंगणवाडी सेविकांचे मानधन पाच हजार रुपयांवरून
साडे सहा हजार रुपये,मदतनीसांचे मानधन अडीच हजार रूपयांवरून साडे तीन हजार रूपये, तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन तीन हजार दोनशे
पन्नास रूपयांवरून साडे चार हजार रूपये करण्यात आलं आहे. शासनामार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना
दरवर्षी दिल्या जाणाऱ्या भाऊबीजेच्या रकमेतही दुप्पट वाढ करण्यात आली आहे. आता कर्मचाऱ्यांना
दोन हजार रुपये भाऊबीज मिळणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी
पोषण आहार वाटपाचं काम तत्काळ सुरू करावं, असं आवाहनही मुंडे यांनी केलं आहे.
दरम्यान, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी येत्या
२७ सप्टेंबरला मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या
कृती समितीची काल नाशिक इथं बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या मोर्चाला
शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या या मोर्चात उपस्थित राहणार असल्याचं,
पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मानधनात केलेली तुटपुंजी वाढ अन्यायकारक
असल्याचं, आयटक प्रणीत अंगणवाडी कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. या संदर्भात
सरकारनं जारी केलेल्या शासननिर्णयाची आज होळी करणार असल्याचं, संघटनेकडून सांगण्यात
आलं आहे. औरंगाबाद इथं आज सकाळी अकरा वाजता पैठण गेट परिसरात हे आंदोलन करण्यात येणार
असल्याचं आयटक कडून सांगण्यात आलं आहे.
****
उडीद आणि मुगाची राज्यशासनाच्या खरेदी केंद्रांवर
विक्री करण्यासंदर्भात तीन ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांनी नोंदणी सुरु करावी, असं आवाहन
पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. ही खरेदी केंद्रं सुरु करण्यासंदर्भात केंद्र
शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, पणन महासंघ आणि नाफेड यांनी खरेदी केंद्र सुरु
करण्याची सर्व तयारी करावी, असे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत बोलत
होते. शेतकऱ्यांनी सातबारा, आधार पत्र तसंच बँक पासबुकच्या छायाप्रतीसह जवळच्या खरेदी
केंद्रावर नोंदणी करावी, हमी भाव खरेदी केंद्र सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कोणत्या
दिवशी उडीद, मुग खरेदी केंद्रावर आणावे, याची माहिती नोंदणी केलेल्या खरेदी केंद्रांवरुन
शेतकऱ्यांना कळवण्यात येईल, असं देशमुख यांनी सांगितलं.
****
येत्या सात ऑक्टोबरला होत असलेल्या ग्रामपंचायत
निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा काल अखेरचा दिवस होता,
लातूर जिल्ह्यातल्या ३५१ ग्रामपंचायतींसाठी
काल सरपंच पदासाठी एकूण एक हजार ८३५ तर सदस्यपदासाठी नऊ हजार १५ अर्ज प्राप्त झाले.
उपजिल्हाधिकारी सुनिल यादव यांनी ही माहिती दिली.
परभणी जिल्ह्यातल्या १२६ ग्रामपंचायतींसाठी
काल अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी ५०८ तर सदस्यपदासाठी एक हजार ७१७
अर्ज प्राप्त झाले.
बीड जिल्ह्यातल्या ६९१ ग्रामपंचायतींसाठी
सात ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बीड तालुक्यातल्या १३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ७३० तर सदस्यपदाच्या एक हजार ३६ जागांसाठी तीन हजार
७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
हिंगोली तालुक्यातल्या १६ ग्रामपंचायतींच्या
सरपंच पदासाठी ५९ तर सदस्य पदासाठी २७८ अर्ज दाखल झाले.
जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातल्या मनापूर
तसंच गव्हाण संगमेश्वर या दोन ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत.
नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकी साठी काल
एकूण १७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवार घोषीत केलेले
नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
खासगी संवर्गात नोंदणी असलेल्या मात्र अनधिकृतपणे
सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा तसंच टॅक्सींना अधिकृत करण्याचा महत्त्वपूर्ण
निर्णय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केला आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर
परिषदेत बोलत होते. यामुळे या क्षेत्रात चालणाऱ्या गैरव्यवहारांना आळा बसेल, तसंच महसुलातही
वाढ होणार असल्याचं रावते यांनी सांगितलं. राज्यात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी परवान्यांच्या
संख्येवरचे निर्बंध हटवण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, मागेल त्याला परवाना हे धोरण
राबवणार असल्याचंही रावते यांनी सांगितलं. ते म्हणाले....
मराठवाड्यामध्ये खास करून उद्योग कमी येत आहेत.नोकरीचे
प्रश्न असतात. तेंव्हा अशा वेळेस स्वयंरोजगार जर उपलब्ध होत असेल तर तो त्याला मिळाला
पाहिजे. म्हणून बेकायदेशीररित्या चालणाऱ्या रिक्षा आहेत त्यांना आम्ही अधिकृत करण्याचा
निर्णय सरकारनं घेतलेला आहे. आता त्यांच्याकडे बॅच नाहीतर आम्ही त्यांना बॅचही देणार
आहोत.त्यांना रिक्षा वाहन चालवण्याचा परवाना परमीट तेही आम्ही त्यांना देणार आहोत.पण
त्याचं जे शुल्क आहे ते त्यांना द्यावं लागेल.जे
रितसर कायदेशीर आहे ते. ही सवलत ३१ मार्च २०१८ पर्यंतच राहिल. त्यानंतर मात्र जे बेकायदेशीर
चालवतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, दसऱ्यानंतर शिवसेनेचे सुमारे वीस आमदार फुटणार असल्याचा
आमदार रवी राणा यांचा दावा निराधार असल्याचं, रावते यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली
असून, धरणाची पाणी पातळी ९८ टक्क्यांवर पोहोचली आहे. यामुळे धरणातून होणारा विसर्गही
वाढवण्यात आला आहे. सध्या धरणाच्या अठरा दरवाजातून साडे तेरा हजार घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या डाव्या तसंच उजव्या कालव्यातूनही अनुक्रमे
तीनशे तसंच चारशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे. धरणात काल सायंकाळी
सुमारे साडे चौदा हजार घनफूट वेगानं पाण्याची आवक सुरू होती.
दरम्यान, जायकवाडी धरणातून विसर्ग केल्यानं
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातले जोगलादेवी आणि मंगरुळ हे बंधारे पूर्ण क्षमतेनं
भरले आहेत. दोन्ही बंधाऱ्यांचे प्रत्येकी दोन दरवाजे काल सकाळी उघडण्यात आले. यामधून
दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे नदी
काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं काल सकाळी धरणाचे सहा दरवाजे
सुमारे दहा इंच उघडण्यात आले. धरणातून सध्या ३४५ घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा
विसर्ग सुरू आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव प्रकल्पाचे
तेरा दरवाजे काल दुपारी उघडण्यात आले होते, यापैकी सहा दरवाजे रात्री बंद करण्यात आले.उर्वरित
दरवाजातून सुमारे १५ हजार घनफूट वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होता.
****
जालना इथं झालेल्या विभागीय पोलिस क्रीडा
स्पर्धेत औरंगाबाद शहर पोलिस दलानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं आहे. काल या स्पर्धेचा
समारोप झाला. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक गणपतराव माने
यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आले.
****
पैठण तालुक्यात पाचोड ग्रामीण रूग्णालयातला
सहाय्यक अधिक्षक अनिल लोखंडे याला ५०० रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागानं काल
रंगेहाथ पकडलं. कर्मचाऱ्याचा कपात झालेला पगार देण्यासाठी लोखंडेनं लाचेची मागणी केली
होती.
****
No comments:
Post a Comment