Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 SEP. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ सप्टेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
बालमजुरीला आळा घालण्यासाठी सर्वांनी
संकल्प करण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली
इथं बाल मजुरीवर आधारित राष्ट्रीय संमेलनात बोलत होते. बाल मजुरीच्या विरोधात सुरु असलेल्या राष्ट्रीय बाल मजूर
प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पेन्सिल नावाच्या एका वेब पोर्टलचं उद्घाटनही
सिंग यांनी यावेळी केलं. या पोर्टलवर बाल मजुरीच्या विरोधातली यंत्रणा लागू
करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं, जिल्हा आणि सर्व प्रकल्प संस्थांना
एकत्र जोडलं जाणार आहे.
****
रेल्वे प्रवासादरम्यान संकटात सापडलेल्या मुलांना वाचवण्यासाठी
रेल्वे सुरक्षा दल राबवत असलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर
रेल्वे मंत्रालयानं देशभरात आणखी ४७ रेल्वे स्थानकांवर ही मोहीम राबवण्याचा निर्णय
घेतला आहे. आता एकूण ८२ स्थानकांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असून, यामध्ये अ एक दर्जाच्या
सर्व स्थानकांचा समावेश आहे.
****
भारतीय स्टेट
बँकेनं बचत खात्यामध्ये सरासरी किमान मासिक शिल्लक रक्कमेच्या मर्यादेत कपात केली
आहे. आता ही मर्यादा पाच हजार ऐवजी तीन हजार रुपये असेल. महानगरं आणि शहरी भागांसाठी ही मर्यादा समान राहील. बँकेच्या ग्रामीण
शाखांमधल्या बचत खात्यांमध्ये सरासरी शिल्लकीची
मर्यादा पूर्वीप्रमाणे म्हणजे एक हजार रुपयेच कायम राहणार असल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात
आलं आहे.
****
संयुक्त राष्ट्र
महासभेत चुकीचं छायाचित्र दाखवून काश्मीरमधल्या
परिस्थितीबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर जोरदार टीका केली. संयुक्त राष्ट्रांतल्या पाकीस्तानच्या प्रतिनिधी मलीहा
लोदी यांनी गा॑झापट्टीतल्या जखमी मुलीचं छायाचित्र दाखवून ती काश्मिरी असल्याचा
आणि भारतातल्या सुरक्षा दलांच्या कारवाईत तिची ही अवस्था झाल्याचा दावा केला होता.
त्यावर प्रतिवाद करताना भारताच्या प्रतिनिधी पौलोमी त्रिपाठी यांनी पाकिस्तानाच्या
या धोरणावर टीका केली. पाकिस्तानातून दहशतवाद जगभर पसरवला जात आहे,
या वस्तुस्थिती वरून जगाचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचं त्रिपाठी म्हणाल्या.
****
आयएनएस तरासा ही नौका भारतीय नौदलात आज दाखल झाली. मुंबईत
नौदलाच्या बंदरावर आयोजित या समारंभात या नौकेचं जलावतरण करण्यात आलं. तरासा ही एक
गस्त नौका असून, यावर आधुनिक यंत्रणेसह युध्दासाठीच्या आधुनिक
बंदुका तसंच वेगानं लक्ष्याचा वेध घेणारी चार वॉटर जेट विमान तैनात आहेत.
****
चालू
पीक वर्षात खरीप हंगामात अन्नधान्याचं उत्पादन १३४ पूर्णांक ६७ दशलक्ष टन होण्याचा
अंदाज आहे. कृषी मंत्रालयाकडून जारी पत्रकात ही माहिती देण्यात आली. यामध्ये
तांदूळ ९४ पूर्णांक ४८ दशलक्ष टन, कडधान्यं ८ पूर्णांक
७१ दशलक्ष टन, तेलबिया २० पूर्णांक ६८ दशलक्ष टन,
कापूस ३२ पूर्णांक २७ दशलक्ष गासड्या तर साखरेचं
उत्पादन ३३७ पूर्णांक ६९ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. यंदा उडदाचं दोन
पूर्णांक ५३ दशलक्ष टन एवढं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या
जाफराबाद तालुक्यात पहिल्या टप्प्यातल्या ४० ग्रापंचायतींसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. १२१ केंद्रांवर
हे मतदान होत असून, निवडणूक विभागानं २०० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. सकाळपासून
मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या
१०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी दाखल अर्जांची छाननी करण्यात आली असून, यात सहा
सरपंचपदाचे तर ८५ सदस्यपदाचे अर्ज बाद झाले आहेत. अर्ज परत घेण्याची मुदत उद्या संपत
असून, त्यानंतरच निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा या चारही तालुक्यातल्या
१०८ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या सात ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
****
राज्य शासनाच्या
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जालना जिल्ह्यातून तीन लाख ९६ हजार
१९७ अर्ज दाखल झाले आहेत. प्राप्त अर्जांचं आजपासून प्रत्येक गावात चावडीवाचन केलं
जाणार आहे. आचारसंहिता असलेल्या २३२ गावात निवडणूक निकालानंतर चावडीवाचन होणार आहे.
त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाईल, असं अधिकृत सूत्रांनी सांगितल.
****
तुर्कमेनिस्तान मधल्या अशगाबात इथं सुरु
असलेल्या पाचव्या आशियाई इनडोअर आणि मार्शल आर्ट्स स्पर्धेच्या दहाव्या दिवशी
भारतानं आणखी पाच पदकांची कमाई केली. बिलियर्ड्सपटू सौरव कोठारीनं पुरुषांच्या
बिलियर्ड्स एकेरीत थायलंडच्या खेळाडूचा ३-१ असा पराभव करुन सुवर्ण पदक पटकावलं.
टेनिसच्या मिश्र दुहेरीत विष्णु वर्धन आणि प्रार्थना ठोंबरे यांच्या जोडीनं रौप्य
पदक मिळवलं, तर तीन कुस्तीपटूंनी कांस्य पदकं मिळवली.
सात सुवर्ण, आठ रौप्य आणि १४ कांस्य पदकांसह भारत या
स्पर्धेत १२ व्या स्थानावर आहे.
****
No comments:
Post a Comment