Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26 SEP. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ सप्टेंबर २०१७
सकाळी ६.५० मि.
****
**
सर्वांना वीज पुरवण्यासाठी ‘सौभाग्य’
योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
**
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून चार दिवस दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर
** मूग आणि
उडीद खरेदीसाठी
मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी पद्धतीचा
वापर करणार - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत
** साईबाबा
समाधी शताब्दी महोत्सवाचा येत्या एक
ऑक्टोबरला राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रारंभ
आणि
** बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी
शिफारस
****
‘सर्वांसाठी वीज’ या योजने अंतर्गत, ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ अर्थात सौभाग्य
योजनेचा शुभारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल नवी
दिल्लीत करण्यात आला, जिथे वीज नाही तिथं, सौर ऊर्जा उपलब्ध करून देणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी
बोलतांना सांगितलं. पंडीत दीनदयाल यांच्या जन्म
शताब्दी वर्षानिमित्त ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार,
देशात अजूनही चार कोटी लोकांपर्यंत वीज पोहोचली नाही, ही बाब
लक्षात घेऊन येत्या डिसेंबर अखेर पर्यंत सर्व भागाचं विद्युतीकरण केलं जाईल. यासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च
येणार आहे. विद्युत निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या ट्रांन्सफॉर्मर,
विद्युत मिटर, वायर, या उपकरणांवर
या योजने अंतर्गत अनुदान देण्यात येईल, वीज जोडणीसाठी कुठलेही
शुल्क आकारले जाणार नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
जिथं वीज नाही, तिथं, सोलार
पॅकमध्ये पाच एल.ई.डी. बल्ब, बॅटरी आणि एक पंखा दिला
जाणार आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचंही काल उद्घाटन केलं.
****
राज्यात विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आज दक्षिण कोरियाच्या चार दिवसाच्या दौऱ्यासाठी
जात आहेत. या दौऱ्यात ते सॅमसंग, ह्युंडई,
हेवी इंजिनिअरींग, एल जी इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या
कंपन्यांच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. दक्षिण कोरियानं महाराष्ट्रात गुंतवणूक करावी यासंदर्भात मुख्यमंत्री दक्षिण कोरियातल्या उद्योजकांशी चर्चा करणार आहेत.
****
राज्यात यावर्षी मूग तसंच उडीद खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा
त्रास वाचावा आणि खरेदी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी
पद्धतीचा वापर करण्यात येणार असून, राज्यात येत्या तीन ऑक्टोबरपासून ८३ उडीद, मूग खरेदी
नोंदणी केंद्रं सुरू करण्यात येणार असल्याचं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल
सांगितलं. मूग आणि उडीद खरेदी प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी आयोजित बैठकीत मुंबईत
काल ते बोलत होते. मोबाईल अँपद्वारे मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी केली
जाईल, शेतकऱ्यांना मूग, उडीद विक्रीसाठी कोणत्या तारखेला आणायचा याबाबत संदेशाद्वारे कळविले जाईल. त्यामुळे
शेतकऱ्यांचा होणारा वेळेचा अपव्यय आणि चकरा टाळल्या जाणार असल्याचं खोत यांनी सांगितलं.
खरेदी केंद्रावर आणण्यात येणारा माल स्वच्छ आणि चाळणी केलेला आणावा, अशी सूचना त्यांनी
यावेळी केली.
****
भ्रष्टाचारा विरुद्धच्या लढाईत कुठलीही तडजोड केली जाणार
नाही, अशी ग्वाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ते काल भारतीय जनता पक्षाच्या
राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत नवी दिल्लीत बोलत होते. केवळ निवडणुका जिंकणं हेच भारतीय जनता पक्षाचं
उद्दीष्ट नाही, निवडणुकांच्या पलिकडे जाऊन, लोकशाहीचा विचार व्हायला हवा, असं पंतप्रधान
म्हणाले.
****
साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ
येत्या एक तारखेला शिर्डी इथं राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते
करण्यात येणार आहे. शिर्डी इथं बांधण्यात आलेल्या नवीन विमानतळाचं उद्घाटनही
राष्ट्रपती या दिवशी करतील. शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानच्या कार्यालयीन सूत्रांनी
काल ही माहिती दिली. या सोहळ्याला राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेतले
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित असतील. शिर्डी
इथल्या विमानसेवेमुळे शिर्डी- मुंबई हे अंतर अवघ्या ४० मिनिटात पार करता येणार आहे.
****
कारागृहामधल्या महिला कैद्यांसमवेत असणाऱ्या त्यांच्या
लहान मुलांची योग्य ती काळजी घेण्यासाठी व्यवस्था करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं,
राज्य सरकारला दिले. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी, आणि या संदर्भात काय पावलं उचलता
येतील यासाठी येत्या, पाच तारखेला संबधीत विभांगांची एक बैठक बोलवण्यात यावी, आणि १२
ऑक्टोबरला त्यासंबधीचा अहवाल सादर करावा, असेही आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जालना इथल्या भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ-
नाफेड हमीभाव केंद्रावरच्या तूर खरेदी घोटाळ्यात सहभागी असलेल्या ११ संशयित आरोपींना
पोलिसांनी अटक केली आहे. या तूर खरेदी घोटाळ्यात ७० जणांवर गुन्हे दाखल असून,
अन्य संशयितांना लवकरच अटक केली जाईल, असं पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा शिवसेनेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर
यांनी बँकेच्या सर्वसाधारण सभेत काल राजीनामा
दिला. बँकेत निवडून आलेल्या सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी तयार केलेल्या
समीकरणानुसार आमदार चिखलीकर यांनी हा राजीनामा दिला. यावेळी बोलतांना चिखलीकर यांनी
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आपण विधीमंडळात उपस्थित करणार असल्याचं
सांगितलं.
****
जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यात पहिल्या टप्प्यातल्या
४० ग्रापंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. १२१
केंद्रांवर होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक विभागानं २०० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
मतदारांना सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येईल, असं तहसीलदार
जे. डी. वळवी यांनी सांगितलं.
औरंगाबाद जिल्ह्याच्या
वैजापूर तालुक्यातल्या चार ग्राम पंचायतींमध्येही
पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. उर्वरीत २५ ग्राम पंचायतींची
निवडणूक दुसऱ्या टप्प्यात सात ऑक्टोबरला होणार आहे.
****
क्रीडा मंत्रालयानं बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची पद्मभूषण
पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. सिंधूनं नुकतीच कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धा जिंकली,
ही स्पर्धा जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत
रौप्य पदक आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सलग दोन वर्ष कांस्य पदकही तिनं मिळवलं होतं.
२०१५ मध्ये सिंधूला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
****
जातीय सलोखा कार्यक्रमाअंतर्गत परभणी पोलीस प्रशासनाच्या
वतीनं पूर्णा शहरात काल एकता दौड काढण्यात आली. व्यापारी, विद्यार्थी तसंच स्थानिक
नागरिकांनी मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभाग नोंदवला.
****
भारतीय रिपब्लिकन पक्ष- बहुजन महासंघाच्या वतीनं विविध
मागण्यांसाठी
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तहसील कार्यालयावर काल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पत्रकार
गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, महागाई कमी करण्यात
यावी, गायरान जमिनिचे पट्टे संबंधितांच्या नावावर करण्यात यावेत आदी मागण्यांचा यात
समावेश होता. महासंघाच्या शिष्टमंडळानं तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन यावेळी
सादर केलं.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या कासार शिरशी
इथले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक पंडितराव मुळजकर यांचं काल निधन झालं. ते १०३ वर्षांचे
होते. लातूर मधल्या करीबसवेश्वर शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम
पाहिलं. आज सकाळी ११ वाजता कासार शिरशी इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात
येणार आहेत.
****
जिल्हास्तरीय विद्युतीकरण प्रभावीपणे राबवण्यासाठी शिवसेना
उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली काल महावितरण कार्यालयात बैठक
पार पडली. जिल्हास्तरीय विद्युतीकरण आणि त्यांचं विस्तारीकरण या बाबत सर्वांचा समन्वय
साधून प्रगतीबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला, तसंच नागरिकांच्या विद्युतीकरणासंबंधी
असलेल्या तक्रारीही मांडण्यात आल्या. घाटी रुग्णालयातल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
आणि कर्करोग रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणीही खैरे यांनी केली.
****
परभणी शहरातल्या नानलपेठ पोलीस ठाण्याच्या
ताब्यात असलेला संशयित समशेर खान पठाण याच्या पोलीस कोठडीतील मृत्यु प्रकरणी, तत्कालीन पोलीस निरीक्षक, एम ए रौफ यांना काल औरंगाबाद
न्यायालयानं १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या
श्रीरामपूर इथल्या एका गुन्ह्यात संशयित म्हणून पकडल्यानंतर २५ डिसेंबर २०१६ मध्ये
समशेर खान पठाण याचा नानलपेठ पोलीसंच्या ताब्यात असताना मारहाणीदरम्यान मृत्यु झाला
होता.
****
No comments:
Post a Comment