Wednesday, 20 September 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 20.09.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

अंगणवाड्यांमधल्या पोषक आहारासाठीच्या निधीची, तसंच किशोरवयीन मुलींसाठी असलेल्या योजनांसाठीच्या निधीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रीमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. सतरा सरकारी मुद्रणालयांचा विलय करून त्यातून पाच मुद्रणालयं बनवण्यासही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. भारतीय पर्यटन विकास महामंडळाची म्हैसूर, जयपूर आणि इटानगर इथली हॉटेल्स संबंधित राज्य सरकारांच्या अखत्यारीत आणण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. रेल्वे कर्मचाऱ्यांना अठ्याहत्तर दिवसांच्या पगाराइतका बोनस दसऱ्याच्या आधी वाटप करणार असल्याचंही जेटली यांनी सांगितलं. या निर्णयाचा सुमारे बारा लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. खेलो इंडिया ही योजना नव्या स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचं, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 

****

मेक्सिको इथं झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या दोनशे अट्ठेचाळीसवर पोहचली असून यात एकवीस शाळकरी मुलांचा समावेश आहे. काल रात्री झालेल्या, सात पूर्णांक एक दशांश  रिश्टर इतक्या तीव्रतेच्या या भूकंपानं या शहरातल्या बऱ्याच इमारती कोसळल्या आहेत. या इमारतींखाली अनेक लोक अडकलेले असण्याची शक्यता असल्याचं मेक्सिकोच्या नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद, या प्रख्यात शैक्षणिक संस्थांना, आपले परदेशातून निधी मिळवण्याबाबतचे परवाने कायम ठेवण्यासाठीची एक अंतिम संधी केंद्रीय गृह मंत्रालयानं देऊ केली आहे. या संस्थांनी आपले वार्षिक उत्पन्न आणि खर्चाचे अहवाल येत्या अठरा ऑक्टोबरपर्यंत सरकारला सादर केल्यास, दंडाची रक्कम भरून या संस्था आपले हे परवाने कायम ठेवू शकतील, असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. सातत्यानं पाच वर्ष अहवाल न देणाऱ्या अन्य अठरा हजार सहाशे एक्क्याएंशी संस्थांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

****

हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी अहमद बट्ट याला आज अटक करण्यात आली. अनंतनाग पोलिसांनी बिजबेहरा रेल्वेस्टेशनवर त्याला अटक केली.

****

येत्या एक नोव्हेंबरपासून राज्यातल्या साखर कारखान्यांमध्ये ऊस गळीत हंगामाला सुरूवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिगटाची बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. मराठवाड्यातल्या जालना इथली जमीन साखर संशोधन संस्थेसाठी देण्यात आली असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

****

चौदा जानेवारी २०१८ या कालावधीपर्यंत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. सहकार, पणन, कृषी, सांस्कृतिक कार्य आणि सामान्य प्रशासन विभागांनी यासंबंधीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सहकार क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये शंकरराव मोहिते यांच्या नावानं नवा पुरस्कार यावर्षीपासून सुरू करण्याचा निर्णयही यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला.

****

बीड जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या येत्या निवडणुकांमध्ये, निवडणूक आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन होईल याची संबंधित यंत्रणांनी पूर्ण काळजी घ्यावी, अशी सूचना राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी केली आहे. आज बीड इथं यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडल्या जाव्यात, असंही सहारिया यांनी यावेळी सांगितलं. प्रथमच थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होणार असल्यामुळे ह्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत.

****

राज्यातल्या सरकारी तसंच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधून वैद्यकीय पदवी घेणाऱ्या डॉक्टरांना ग्रामीण भागात एक वर्ष सेवा देणं बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिश महाजन यांनी दिली आहे. ते आज मुंबई इथे पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागात डॉक्टर्स आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणं सुनिश्चित होईल, असं त्यांनी नमूद केलं. यासंदर्भात लवकरच अधिवेशनात प्रस्ताव मान्य केला जाईल, असं महाजन यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...