Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 SEP. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ सप्टेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
मतं मिळवणं नव्हे तर देशाचा
विकास करणं हे भारतीय जनता पक्षाचं पहिलं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं पशू आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटन
प्रसंगी ते आज बोलत होते. पंतप्रधान दोन दिवसीय वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. २०२२ पर्यंत
शेतीमधलं उत्पन्न दुप्प्ट करणं आणि बेघरांना घर देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी
दिलं. सरकारनं भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरोधात लढाई सुरू केली असल्याचं पंतप्रधानांनी
यावेळी नमूद केलं.
****
परराष्ट्र व्यवहार मंत्री
सुषमा स्वराज यांनी आज न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेच्या
पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांची भेट घेतली. या भेटीत
दहशतवाद आणि एच वन बी व्हीसा संबंधात चर्चा करण्यात आल्याचं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते
रवीश कुमार यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. दोन्ही मंत्र्यांदरम्यान यावेळी स्थानिक
तसंच पाकिस्तान, अफगाणीस्तान आणि दहशतवादाच्या अनुषंगानंही चर्चा झाल्याचं, कुमार यांनी
सांगितलं.
****
केंद्र सरकार आज देशभरात
एल पी जी पंचायत सुरु करणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागात
ज्या ठिकाणी पारंपरिक इंधनाचा वापर होतो, त्याठिकाणी एल पी जी गॅस जोडणी देण्यासाठी
ही पंचायत सुरु करण्यात येणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी पेट्रोलियम मंत्री
धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत गांधीनगर जिल्ह्यातल्या मोटा इश्नापूरगावात देशातल्या
पहिल्या पंचायतीचं आज औपचारिकरित्या उद्घाटन करणार आहेत. एका व्यासपिठावर एल पी जी
वापरण्याचे फायदे काय असतात याबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली
आहे.
****
प्रदुषण नियंत्रण मंडळामध्ये
भरती करण्यासाठी नियम बनवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना दिले
आहेत. राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळांमध्ये योग्य व्यक्तींची निवड करण्यासाठी हे नियम
बनवण्यास न्यायालयानं सांगितलं आहे. तसंच राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळात जर एखाद्या
अयोग्य व्यक्तीची अध्यक्ष अथवा सदस्य म्हणून निवड झाली असल्यास नागरिकांना संबंधित
उच्च न्यायालयांकडे धाव घेण्याची परवानगीही सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे.
****
भारत, जपान, ब्राझील आणि
जर्मनी या देशांना संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये कायमचं सदस्यत्व मिळायला
पाहिजे अशी भूमिका भूतान सरकारनं घेतली आहे. सुरक्षा परिषदेला बळकट करण्यासाठी आणि
नवचैतन्य देण्याच्या दृष्टीनं सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करण्यासाठी भूताननं समर्थन
दर्शवलं आहे. जगातल्या बदलत्या समिकरणांची नोंद घेतली नाही तर सुरक्षा परिषदेमधले बदल
हे अपूर्ण ठरतील, असं मत भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग दोग्बे यांनी संयुक्त राष्ट्र
संघाच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केलं.
****
जम्मू काश्मीरमधल्या सांबा
जिल्ह्यात काल रात्री पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा बलाच्या
दोन जवानांसह पाच जण जखमी झाले. काल रात्रीच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं रहिवाशी
भागावर अंदाधुंद गोळीबार केल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं. आज पहाटेही अनेक भागांवर
उखळी तोफांचा मारा करण्यात आला. सीमेवर असलेल्या ५० गावांना आणि ३० लष्करी चौक्यांना
या गोळीबाराचा फटका बसला.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये
आज पहाटे भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भुकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच
इतकी नोंदवली गेली. सुंबळ भागात भुकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं अमेरिका भूगर्भ सर्वेक्षणानं
सांगितलं आहे. सुदैवानं यात कोणत्याही जीवित हानीचं वृत्त नाही.
****
गुरुग्राम इथल्या रायन
इंटरनॅशनल स्कूल मधल्या विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग -
सीबीआयनं गुन्हा नोंदवला आहे. सीबीआयचं एक पथक या प्रकरणात आणखी पुरावे गोळा करण्यासाठी
आज शाळेत जाणार असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर
मधमेश्वर धरणातून एक हजार ६१४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं, तर नागमठाण मधून एक हजार ४४०
घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी जायकवाडी धरणात आज सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणाचे
१८ दरवाजे सहा इंचानं उघडले असून, त्यामधून नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९८ पूर्णांक २३ टक्के इतका
झाला आहे.
****
टोकियो इथं सुरु असलेल्या
जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू प्रणव जेरी चोप्रा आणि एन
सिक्की रेड्डी आज मिश्र दुहेरीतला उपान्त्य फेरीचा सामना खेळणार आहेत. त्यांच्यासमोर
जपानच्या जोडीचं आव्हान असेल. २०११ नंतर पहिल्यांदा भारतीय जोडी सुपर सिरीजच्या उपान्त्य
फेरीत पोहोचली आहे. या खेळात पुरुष आणि महिला एकेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं
आहे.
****
No comments:
Post a Comment