आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२९ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
पैठणचं जायकवाडी धरण शंभर
टक्के भरलं आहे. धरणात सध्या तीन हजार दोनशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक
सुरू असून, धरणाच्या डाव्या कालव्यातून पाचशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
सुरू आहे. धरणात होणारी अत्यल्प आवक पाहता, धरणातून अद्याप विसर्ग करण्याची शक्यता
नाही, असं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
राज्याचा अर्भक मृत्यू दर
२१ वरून १९ वर आला असून गेल्या तीन वर्षात सातत्यानं हा दर घटता ठेवण्यासाठी आरोग्य
विभाग प्रयत्न करत असल्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. केंद्र
शासनानं काल याबाबत ‘सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम’-एसआरएस-२०१६ हा अहवाल दिला. या अहवालावर
प्रतिक्रिया व्यक्त करतांना आरोग्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. राज्यात गेल्या वर्षभरात
सुमारे २० लाख बालकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी
सांगितलं.
****
राज्यातल्या रस्त्यांवरील
खड्डे अद्याप का बुजवले नाहीत याबाबत येत्या दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश मुंबई
उच्च न्यायालयानं राज्यशासनाला दिले आहेत. राज्यातल्या रस्त्यांची अवस्था पाहून न्यायालयानं
स्युमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. राज्यातील सर्व महापालिकांसह स्थानिक स्वराज्य
संस्थांना खड्डे न बुजवल्याबाबत उत्तर देण्याचं या आदेशात सांगण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या
निवडणुकीत अर्ज छाननी तसंच अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातल्या ६९० ग्रामपंचायतींच्या लढतीचं
चित्र स्पष्ट झालं आहे. जिल्ह्यात सदस्य पदासाठी ६ हजार १ तर सरपंच पदाकरता २ हजार
२१६ उमेदवारांत निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, सरपंचांची
निवड यावेळी प्रथमच थेट जनतेतून होणार आहे.
****
रेल्वेच्या विकासकामांना
गती देऊन मराठवाड्याचा अनुशेष भरून काढावा, अशी सूचना शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत
खैरे यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांना केली आहे. औरंगाबाद
इथं मराठवाड्याच्या रेल्वेसंबंधी विविध प्रश्नांवर आयोजित बैठकीत ते काल बोलत होते.
****
No comments:
Post a Comment