Thursday, 21 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 21.09.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 SEP. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****
** अंगणवाड्यांमधला पोषक आहार, तसंच, किशोरवयीन मुलींसाठी असलेल्या योजनांसाठीच्‍या निधी मर्यादेत वाढ

** अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आशाकर्मचाऱ्यांमार्फत पोषण आहार पुरवठा करण्याचा, राज्य सरकारचा निर्णय

** साखर कारखान्यांच्‍या ऊस गळीत हंगामाला, येत्या एक नोव्हेंबरपासून सुरूवात

** राज्यात सर्वत्र दमदार पाऊस; धरणं भरू लागली

आणि

** छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम मुदत

****
अंगणवाड्यांमध्ये देण्यात येणारा पोषक आहार, तसंच, किशोरवयीन मुलींसाठी असलेल्या योजनांसाठीच्‍या निधी मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय, काल केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रीमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. १७ सरकारी मुद्रणालयांचा विलिनीकरण करून, त्यातून पाच मुद्रणालयं बनवण्यासही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. भारतीय पर्यटन विकास महामंडळाची म्हैसूर, जयपूर आणि इटानगर इथली हॉटेल्स संबंधित राज्य सरकारांच्या अखत्यारीत आणण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगाराइतका बोनस दसऱ्याच्या आधी वाटप करणार असल्याचंही जेटली यांनी सांगितलं. या निर्णयाचा सुमारे १२ लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. खेलो इंडिया ही योजना नव्या स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचं, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 

****
राज्यातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बालकं, गरोदर महिला, स्तनदा माता, आणि किशोरी मुलींच्या पोषण आहाराची गैरसोय होऊ नये म्हणून, सार्वजनिक आरोग्य विभागाच्याआशाकर्मचाऱ्यांमार्फत पोषण आहार पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासाठी अंगणवाडी सेविकेस देण्यात येणारं दैनिक मानधन, ‘आशाकर्मचाऱ्यांना देण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भाचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी युनियन तर्फे काल औरंगाबाद इथं विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. तर औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं थाळी नाद आंदोलन केलं.

****
येत्या एक नोव्हेंबरपासून राज्यातल्या साखर कारखान्यांमध्ये ऊस गळीत हंगामाला सुरूवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिगटाची बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. तसंच साखर उद्योगासंबंधीचे सर्व परवाने, आणि मान्यता ऑनलाईन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं साडे नऊ टक्के साखर उताऱ्यासाठी,हजार ५५० रुपये प्रती मेट्रिक टन योग्य आणि किफायतशीर मूल्य देण्याचा निर्णय घेतला असून, त्यापुढे उताऱ्याच्या प्रत्येक टक्क्‍यासाठी २६ रुपये प्रती मेट्रिक टन दर देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. नियंत्रण समितीनं घालून दिलेले सर्व निकष पूर्ण करणाऱ्या कारखान्यांना एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यास मान्यता देण्याचे अधिकार साखर आयुक्तांना देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. मराठवाड्यातल्या जालना इथली जमीन साखर संशोधन संस्थेसाठी देण्यात आली असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

****
राज्यातल्या सरकारी तसंच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधून वैद्यकीय पदवी घेणाऱ्या डॉक्टरांना ग्रामीण भागात एक वर्ष सेवा देणं बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिश महाजन यांनी दिली आहे. ते काल मुंबई पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागात डॉक्टर्स आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणं सुनिश्चित होईल, असं त्यांनी नमूद केलं. यासंदर्भात लवकरच अधिवेशनात प्रस्ताव मान्य केला जाईल, असं महाजन यांनी सांगितलं.

****
राज्यात मुंबईसह, कोकण, पुणे, अहमदनगर, नशिकसह मराठवाड्याच्या विविध भागात काल दमदार पाऊस झाला. या पावसामुळे विविध ठिकाणच्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही धरणं पूर्ण भरल्यानं त्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक सुरु असून ९० टक्क्यांपर्यंत हा जलसाठा पोहोचला आहे. धरणातल्या वाढलेल्या पाणीसाठ्याच्या स्थितीमध्ये गोदाकाठच्या ५३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

औरंगाबाद इथं काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सलग तीन तास पावसाचा जोर कायम होता. या पावसानं शहरातल्या सखल भागात, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. काही भागातला वीज पुरवठाही खंडीत झाला होता.

जालना जिल्ह्यात काल चांगला पाऊस झाला. जालना शहरात दुपारी दोन वाजता विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जालना आणि बदनापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. पावसाची संततधार रात्रभर सुरुच होती, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातली माळतोंडी इथं, तलावात दोन बहिणींचा मृत्यु झाला. दोघी काल कपडे धुण्यासाठी तलावावर गेल्या असता, ही दुर्घटना घडली.

बीड जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. आष्टी तालुक्यातील कडी सिंचन प्रकल्प पूर्ण भरला आहे. हिंगोली जिल्ह्यातही पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, मांजरा धरणाचे दरवाजे उघडून मांजरा नदीत पाणी सोडले अशा आशयाची सोशल मिडीया वरून फिरणारी बातमी पुर्णपणे खोटी असल्याचं लातूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनं म्हटलं आहे. याबाबत अफवा पसरवू नये, असं आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसानं,  जिल्ह्यातला आरणगाव इथला तलाव, आणि बंधारा फुटल्यानं वाळुंज गावातल्या दळवी वस्ती मध्ये अडकलेल्या, १५ पुरुष, १४ महिला, आणि  एक लहान मुलगी यांना, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं.

या पावसामुळे हैदराबादहून औरंगाबाद शहरात येणारं विमान रद्द झालं, तर मुंबईहून येणारी दोन विमानं तीन तासांहून अधिक उशीरानं शहरात दाखल झाली. औरंगाबाद -मुंबई विमान ऐनवेळी रद्द करावं लागलं.

****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****
आज अश्विन शुक्ल प्रतिपदा अर्थात घटस्थापना. आजपासून शारदीय नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. यानिमित्त राज्यासह देशभरात घटस्थापनेची तयारी पूर्ण झाली आहे. कोल्हापूरची अंबाबाई, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथली रेणुका देवी आणि बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवीसह राज्यातल्या सर्व देवींच्या मंदिरातील तयारीही पूर्ण झाली आहे. परभणी शहरातील अष्टभुजा देवी तसंच जिल्ह्यातील राणी सावरगाव आणि इंद्रायणी माळावरही घटस्थापनेची तयारी पूर्ण झाली असून, दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरातल्या कर्णपूरा इथं, काही वेळातंच घटस्थापना केली जाणार आहे. इथं भरणाऱ्या यात्रेमध्ये संपूर्ण परिसराची स्वच्छता ठेवण्यासाठी शहरातल्या विविध २२ संघटनांनी ‘जागर स्वच्छतेचा’ ही  मोहीम हाती घेतली आहे.

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या, नाशिक जिल्ह्यातील वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्र महोत्सवासाठी, गडावर प्लास्टीकचा वापर करण्यास, तसंच, बोकड बळीला, यंदा प्रथमच बंदी घालण्यात आली आहे. भाविकांना दर्शन सुलभ व्हावं, यासाठी दसऱ्यापर्यंत अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेलं विशेष दर्शनही, यंदा बंद करण्यात आलं आहे.

****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ साठीचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या संपत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले नाहीत, त्यांनी तात्काळ आपले अर्ज आपले सरकार किंवा  महा ई -सेवा, या केंद्रांमार्फत दाखल करावेत, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील त्यांनी स्वत: जास्तीचे अर्ज ऑनलाईन केंद्रांशी संपर्क साधून रद्द करून घ्यावेत अन्‍यथा ते कर्ज माफीस अपात्र राहतील, असंही  सरकारनं स्पष्ट केलं आहे. अर्जातल्या चुका दुरुस्त करण्याची सोयही पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचं सातार जिल्हा उपनिबंधकांनी कळवलं आहे्र

****
शेतकरी गटांना प्रोत्साहन, सबलीकरणासाठी जालना जिल्ह्यात येत्या दोन वर्षांसाठी गट शेतीची योजना राबवणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी दिली आहे. यामध्ये वीस शेतकरी गटांद्वारे सुमारे १०० एकर क्षेत्रावर गटशेती करून विविध कृषी पुरक उपक्रम शेतकऱ्यांच्या शेतीवर राबविले जाणार आहेत. या योजने अंतर्गत सहभागी होणाऱ्या शेतकरी गटाची नोंदणी आत्मा संस्थेकडे  किंवा शेतकरी उत्पादक कंपनी इत्यादीची नोंदणी आवश्यक आहे. सहभागा करीता अर्ज २६ सप्टेंबर पर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे विनामूल्य सादर करावयाचे आहेत.

****
 टोकियो इथे सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन सुपरसीरिज स्पर्धेमध्ये भारताची पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल,  के. श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि समीर वर्मा या खेळाडूंनी एकेरीचे पहिल्या फेरीचे आपआपले सामने जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सौरभ वर्मा आणि बी. साई प्रणित हे खेळाडू मात्र पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाद झाले आहेत. मिश्र दुहेरीत सात्‍विकसाईराज रांकी रेड्डी आणि अश्विनी पुन्नपा यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

****

No comments: