Saturday, 23 September 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.09.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

२०२२ पर्यंत देशात प्रत्येक बेघर व्यक्तीला घर देण्याचा सरकारनं निर्णय घेतला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी जिल्ह्यात शहंशहापूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभधारकांना प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. वस्तू आणि सेवा कर कायदा आणि आधार जोडणीमुळं सरकारनं भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात मोहिम उघडली असल्याचंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

****

केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुऴेच मुंबई इथं इंदूमिलच्या जागेवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभं राहणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. बुलडाणा इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे दलित जनतेला लाभ मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ प्राध्यापक सी एन आर राव यांची यंदाच्या व्हॉन हिप्पल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अमेरिकेतल्या पदार्थ विज्ञान संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो. राव यांच्या रुपानं प्रथमच एका आशियाई शास्त्रज्ञाला हा पुरस्कार मिळाला आहे. २९ नोव्हेंबरला बोस्टन इथं त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. प्राध्यापक राव यांची त्यांनी सूक्ष्म पदार्थ, ग्राफेन आणि सुपरकंडक्टिव्हिटी बाबत केलेल्या महत्वपूर्ण संशोधनामुळे या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

****

महागाईविरोधात शिवसेनेतर्फे आज मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार निदर्शनं करण्यात आली. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, भाज्या, अन्नधान्याचे वाढते भाव या विरोधात मुंबई शहरात १२ ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं. निदर्शनावेळी महागाई पुतळ्याचं दहन करण्यात आलं, तसंच केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांना भारतीय जनता पक्षानं प्रवेश देऊ नये, असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते आज जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. नुकतेच काँग्रेस पक्ष सोडलेले नारायण राणे यांनी भाजपत प्रवेश करण्याचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर केसरकर बोलत होते. मुंबई इथं आज महागाई विरोधात शिवसेनेनं केलेल्या आंदोलनाबद्दल बोलताना केसरकर यांनी, सत्तेत असली तरीही शिवसेना नेहमी सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचं सांगितलं.   

****

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता या पदाची भरती परीक्षा आता विभागवार न घेता एकाच दिवशी एकाच वेळी ऑनलाइन घेण्यात येणार आहे. या विभागातल्या सगळ्या पदांची भरती परीक्षा राज्यात एकाच दिवशी ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी कोकण विभाग कृषि पदविकाधारक संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अमोल सांबरे यांनी केली होती. ही मागणी मान्य करत सार्वजनिक बांधकाम विभागानं संपूर्ण राज्यात एकाच वेळेस परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांबरे यांनी पत्राद्वारे कळवलं आहे.

****

पैठणी उद्योगाला सशक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तुतीची लागवड करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. औरंगाबाद शहरातल्या संत एकनाथ रंग मंदिरात महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाच्या मराठी पैठणी हस्तकला विभागाच्या वतीनं आयोजित पैठणी साडी महोत्सवाचं उद्घाटन आज भापकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मनरेगा, रोहयो अशा योजनांच्या माध्यमातून २० हजार एकरवर तुतीची लागवड करण्याचं उद्दिष्ट असल्याचं भापकर यावेळी म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३६वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक मंदावल्यानं धरणाचे सर्व दरवाजे आज बंद करण्यात आले आहेत. सध्या धरणात ९८ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड यांनी दिली आहे. धरणात सध्या सुमारे पाच हजार ५३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, धरणाच्या डाव्या कालव्यातून ७०० घनफूट, तर उजव्या कालव्यातून ४०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.

****

जपान खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. टोकियो इथं आज झालेल्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीला थोडक्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. जपानच्या ताकुरो होकी आणि सयाका हिरोता या जोडीनं त्यांना २१-१४, १५-२१, १९-२१ अशा फरकानं पराभूत केलं.

****

No comments: