Wednesday, 27 September 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 27.09.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 SEP. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

भारताचं सौंदर्य जवळून अनुभवण्यासाठी जगभरातल्या लोकांनी भारताला भेट देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवसाच्या अनुषंगानं केलेल्या एका ट्विट संदेशात त्यांनी हे आवाहन केलं असून, देशातल्या युवावर्गानं देशभरातली विविधता अनुभवावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. केवळ पर्यटनातल्या आनंदासाठी नाही तर ते भाग अभ्यासण्यासाठीही आपला देश पहावा, यामुळे आपल्या जीवनाला नवी दिशा मिळते, असं पंतप्रधानांनी आपल्या या संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान नवी दिल्लीत ाष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आजपासूनचा नियोजित संप स्थगित झाला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांनी ही माहिती दिली. याआधी गेल्या २१ आणि २२ सप्टेंबरला या कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप केला होता, मागण्या विचारात न घेतल्यास आजपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भातला सरकारचा प्रतिसाद पाहता, कर्मचारी संघटनेनं हा संप मागे घेतला आहे.

****

शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणास संपूर्णपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशभरातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार हमी भाव देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती मार्फत देशभरात आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतमालाला भारतीय खाद्य महामंडळानुसार किमान आधारभूत किंमत देण्याचा दृष्टीकोन हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचं शेट्टी म्हणाले.

२०१४ च्या निवडणुकीच्यावेळी दिलेलं उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करावं असंही ते म्हणाले.

खाद्यतेल आयात केल्यामुळे देशात तेलबिया पीकांचं नुकसान झाल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. गेल्या काही दिवसात चांगला पाऊस झाला, मात्र त्यापूर्वी कपाशी तसंच सोयाबीन पिकं करपून शेतकऱ्यांचं नुकसान झालं, या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेट्टी यांनी केली.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी आलेल्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. या अर्जांचं चार गटांमध्ये वर्गीकरण केलं जाणार आहे. येत्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त होणाऱ्या ग्रामसभांमध्ये त्यांचं वाचन होणार असून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन तालुकास्तरीय समितीला अर्जांच्या याद्या देण्यात येणार आहेत. अर्ज फेटाळला गेला असेल तर उपविभागीय अधिकारी समितीकडे अपील करता येणार आहे. कर्जमाफी अर्जात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जावरील प्रक्रियेची माहिती वेळोवेळी दिली जाणार आहे. ज्या चालू कर्ज खातेदारांनी ३१ जुलै २०१७ पर्यंत घेतलेल्या कर्जाची फेड केलेली आहे, त्यांना प्रोत्साहन अनुदानही मिळणार आहे.

****

शिर्डी विमानतळाचं लोकार्पण येत्या एक ऑक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. यासाठीची पूर्वतयारी म्हणून काल मुंबई ते शिर्डी विमान उड्डाण चाचणी घेण्यात आली. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सह काही आमदारांना घेऊन, एअर इंडियाचं बहात्तर आसनी विमान मुंबईहून शिर्डी विमानतळावर पोहोचलं. नागरी विमान वाहतुक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिर्डी विमानतळाचं संपूर्ण तांत्रिक परीक्षण केल्यानंतर, येत्या एक तारखेला विमानतळाचं लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

****

डिजिटल इंडिया या योजनेच्या धर्तीवर राज्यात राबवण्यात येत असलेल्या डिजिटल महाराष्ट्र या योजनेअंतर्गत राज्यातल्या शाळा डिजिटल करण्यात येत आहेत. शालेय शिक्षण विभागातर्फे यासाठी काम सुरू असून, त्यामुळे राज्यातल्या चार जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा आता डिजिटल झाल्या आहेत. यामध्ये मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या शाळांचा समावेश आहे.

****


No comments: