Friday, 22 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 22.09.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२२ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नागपूर दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी त्यांनी दीक्षाभूमी इथं भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केलं. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपती कोविंद यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. आपल्या या एक दिवसीय दौऱ्यात राष्ट्रपती रामटेक इथं विपश्यना केंद्राचं उद्घाटन तसंच रेशीमबाग इथं सुरेश भट सभागृहाचं लोकार्पण करणार आहेत.

****

जायकवाडी पाठोपाठ मांजरा धरणाचे दरवाजे आज सकाळी ६ वाजता उघडण्यात आले. प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानं आज सकाळी धरणाचे सहा दरवाजे सुमारे दहा इंच उघडण्यात आले. धरणातून सध्या दीडशे घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बीड, लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बहुतांश गावांना मांजरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो.

दरम्यान, पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयातला पाणीसाठा ९६ टक्क्यावर गेल्यामुळे काल मध्यरात्रीच्या सुमारास धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आले. धरणातून ९४३२ घनफूट प्रतिसेकंद पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आलं आहे.

या दोन्ही धरणातून विसर्ग सुरू असल्यानं, गोदावरी तसंच मांजरा नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या बोगस तुकड्या मान्यताप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी एस.एस.वाघमारे आणि कनिष्ठ लिपिक व्ही.पी.सिंधकुमठे यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं काल अटक केली. न्यायालयानं त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत जवळपास ९९ शाळांमध्ये विद्यार्थी संख्या नसतांना बोगस पटसंख्या दाखवून तुकड्या मंजूर केल्याचा आरोप या दोघांवर होता. याप्रकरणी जिल्ह्यातले काही संस्थाचालक, सचिव मुख्याध्यापक अशा ३१५ जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

****

पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काल जालना इथल्या जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली. क्रीडा संकुल आणि त्याभोवतीचा परिसर सुसज्ज करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीसाठी तातडीनं प्रस्ताव पाठवावेत असे निर्देश खोतकर यांनी यावेळी दिले.

****

No comments: