Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 SEP. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
सरकारनं काही राज्यांमध्ये राज्यपालांची
नियुक्ती केली आहे. राष्ट्रपती भवनानं आज याबाबत निवेदन जारी केलं. बिहारचे राज्यपाल
म्हणून सत्यपाल मलिक यांची, तामिळनाडूच्या राज्यपालपदी बनवारी लाल पुरोहीत, मेघालयच्या
राज्यपालपदी गंगा प्रसाद, अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी ब्रिगेडीयर बी डी मिश्रा
यांची, अंदमान आणि निकोबारचे राज्यपाल म्हणून ॲडमिरल देवेंद्र कुमार जोशी, तर आसामच्या
राज्यपालपदी जगदीश मुखी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी या सर्व नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे.
****
लोकसभा आणि
राज्यांच्या आगामी सर्व निवडणुकांमध्ये मतदानाची पावती देणारी व्ही व्ही पॅट मतदान
यंत्रंच वापरण्यात यावीत असे निर्देश केंद्रीय निवडणुक आयोगानं दिले आहेत. या
आशयाचं पत्र निवडणूक आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य निवडणुक आयुक्तांना पाठवलं
आहे. यापुढे मतदानासाठी व्ही व्ही पॅट यंत्रंच वापरण्यात येतील अशी ग्वाही
तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी मार्चमध्येच राजकीय पक्षांच्या
प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत दिली होती. सध्याच्या मतदान यंत्रांबाबतच्या
तक्रारी लक्षात घेता अशी यंत्रं वापरण्यात यावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष आग्रही
होते.
****
रोहिंग्या मुस्लिम
देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून भविष्यात संकट बनू शकतात असं स्पष्ट मत राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. नागपूर इथं आज दसऱ्यानिमित्त
आयोजित संघाच्या मेळाव्यात ते बोलत होते. रोहिंग्यामुळे फक्त आपल्या रोजगारावर भार
पडणार नाही तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, असं ते म्हणाले.
देशातल्या शिक्षण
प्रणालीवर परदेशी प्रभावाबरोबर शिक्षण धोरणात बदल व्हायला पाहिजे, असं ते म्हणाले.
आपणच आपली भाषा कमी बोलू लागलो असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. भागवत यांनी केंद्र
सरकारच्या कामकाजावर यावेळी समाधान व्यक्त केलं.
****
सार्वजनिक
भविष्य निर्वाह निधी, किसान विकासपत्र, सुकन्या
समृद्धी या सारख्या अल्पबचत योजनांसाठीच्या व्याजदरात ऑक्टोबरपासून सुरू होणार्या
तिमाहीत कोणतेही बदल होणार नाहीत. या संदर्भातलं परिपत्रक अर्थ मंत्रालयानं जारी
केलं. सध्या भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर सात पूर्णांक आठ दशांश टक्के, किसान
विकास पत्रांवर साडे सात टक्के, तर सुकन्या समृद्धी योजनेवर आठ पूर्णांक तीन दशांश
टक्के व्याज मिळतं. आता डिसेंबर अखेरपर्यंत हेच दर कायम राहतील.
****
वस्तु आणि
सेवांच्या निर्यातीपूर्वी बँक हमी सादर करण्याच्या शर्तीतून लहान निर्यातदारांना
वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केवळ एक प्रतिज्ञापत्र सादर करून
त्यांना निर्यात परवाना मिळवता येईल, असं काल जारी करण्यात आलेल्या निवेदनात
म्हटलं आहे. जीएसटी संदर्भातल्या आपल्या अडचणींबाबत या निर्यातदारांच्या शिष्टमंडळानं
काल अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली होती, त्यानंतर हा निर्णय झाला.
****
दूरसंचार आयोगानं
दूरसंचार कंपन्यांनी विकत घेतलेल्या पट्ट्यांसाठीची किंमत फेडण्यासाठीचा कालावधी दहा
वर्षांपासून सोळा वर्षांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. दूरसंचार कंपन्यांवर लावण्यात
येत असलेला दंड सौम्य प्रमाणात कमी करण्यास आयोगानं मान्यता दिली असल्याचं सूत्रांनी
म्हटलं आहे. नवीन राष्ट्रीय दूरसंचार धोरणाचा मसूदा तयार करण्यालाही आयोगानं मान्यता
दिली आहे. त्याचबरोबर उत्तर पूर्व भागांमध्ये दोन हजार आठशे सतरा दूरसंचार टॉवर उभारण्यास
आयोगानं परवानगी दिली आहे.
****
मुंबईतल्या एलफिन्स्टन
रेल्वे स्थानकावर काल घडलेली चेंगराचेंगरीची घटना अतिशय दुर्देवी असल्याचं महाराष्ट्र
नननिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं वार्ताहर परिषदेत
बोलत होते. या स्थानकावरच्या पुलाच्या रुंदीकरणाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
- एमएमआरडीएनं पूर्ण केलं नाही, असा आरोप मुंबई महानगरपालिकेनं केला असल्याचं ठाकरे
यांनी सांगितलं. यावरुन सगळेजण आपापली जबाबदारी नाकारत असल्याचं दिसून येत असल्याचं
ते म्हणाले.
****
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस येत्या १६ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात
मुख्यमंत्री जाफराबाद तालुक्यातल्या अकोला देव आणि देळेगव्हाण या गावातल्या गटशेतीची
पाहणी करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
खासदार रावसाहेब दानवे यांनी जालना इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. राज्य
सरकारनं जालना जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या सीडहब, आयसीटी, टेक्सटाईल पार्क, रेशीम
कोष बाजारपेठ प्रकल्पांचा मुख्यमंत्री आपल्या दौऱ्यात आढावा घेणार असल्याचं त्यांनी
सांगितलं.
मुंबईनंतर देशात
एकमेव जालना इथं होत असलेल्या इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी - आय सी टीच्या कॅम्पससाठी
दोनशे एकर जमिनीचं हस्तांतर झालं असल्याचंही दानवे यांनी यावेळी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment