Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25 SEP. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ सप्टेंबर २०१७
सकाळी ६.५० मि.
****
** स्वच्छता
ही सेवा अभियानाला मिळणारा उस्फूर्त प्रतिसाद ही सकारात्मक
बाब - पंतप्रधान नरेंद्र मोदी
** स्वयंपाकाच्या गॅसवरची
सबसिडी बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक
वायु मंत्री धर्मेद्र प्रधान यांचं स्पष्टीकरण
** केंद्र सरकारनं पेट्रोल-गॅस दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मागणी
** जेष्ठ साहित्यिक अरूण साधू यांचं निधन
आणि
** ऑस्ट्रेलियाविरूद्धचा
तिसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना जिंकत भारताचा मालिका विजय
****
स्वच्छता
ही सेवा अभियानाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ही एक सकारात्मक बाब असल्याचं,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून
ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. मन की बात या कार्यक्रमाला काल तीन वर्ष पूर्ण
झाली. या कार्यक्रमामुळे जनतेचे विचार सरकारपर्यंत पोहोचले, त्यामुळे सरकारमध्ये सुधारणा
करणं सोपं झाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
तरूण पिढीमध्ये खादीचे आकर्षण वाढत असल्याने देशात अनेक
ठिकाणचे बंद पडलेले खादी निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू झाल्याचं
त्यांनी सांगितलं. साताऱ्याच्या लेफ्टनंट
स्वाती महाडिक यांच्या धैर्य आणि धाडसाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. येत्या ३१ ऑक्टोबरला
देशात युनिटी फॉर रन म्हणजे एकता दौड संकल्पना राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं. पर्यटनाला
प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येण्याचं, तसंच आगामी १७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत
मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करत, पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या नवरात्रासह
आगामी सण उत्सवांनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
****
देशात नवीन राज्य स्थापन करण्याच्या
मागणी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणारी एक श्वेतपत्रिका केंद्र सरकारनं काढावी अशी
मागणी राष्ट्रीय नवराज्य महासंघाचे अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी गुवाहाटी इथं पत्रकारांशी
बोलताना केली आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी श्वेतपत्रिकेची आवश्यकता असून यातून
एक राष्ट्रीय धोरण तयार केलं जाऊ शकतं असं अणे म्हणाले. नवीन राज्य निर्मितीसंदर्भात
कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाची भूमिका स्पष्ट नाही. पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगानंतर
काँग्रेसनंही या विषयावर कोणतीही भूमिका घेतली नाही असं ते म्हणाले.
****
स्वयंपाकाच्या गॅसवरची सबसिडी बंद करण्याचा
सरकारचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री धर्मेद्र
प्रधान यांनी स्पष्ट केलं आहे.ते काल लखनौ इथं एका कार्यक्रमाच्या अनुषंगानं बोलत होते.
मात्र श्रीमंत लोकांनी त्यांची सबसिडी स्वत:हून सोडली तर सरकारला गरीबांना या गॅसवर
सबसिडी देणं सोपं होईल असं त्यांनी सांगितलं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत आणि त्यांचं
उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार आता इथॅनॉल ४० रूपये प्रति लीटर दरानं खरेदी करणार
असल्याचं सांगून, जैव आणि ऊसाच्या कचऱ्यापासून पेट्रोल निर्मिती करण्याचाही सरकारच्या
विचाराधीन असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
केंद्र सरकारनं पेट्रोल-गॅस दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा
अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. ते काल
अहमदनगर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमती
पाहता ही भाववाढ करण्याची गरज नव्हती, या दरवाढीची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागत
असल्याचं पवार म्हणाले. इंधन वाढीविरोधात शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी अभिनंदन
केलं, मात्र सत्तेत राहून आंदोलन करणं बरं दिसत नाही, सत्तेत राहून परिस्थिती सुधारा
किंवा सत्तेतून बाहेर पडून आंदोलन करा, असा सल्ला पवार यांनी शिवसेनेला दिला. शेतकरी
कर्जमाफी, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन या मुद्यांवरूनही पवार यांनी सरकारच्या धोरणांवर
टीका केली.
****
मूग आणि उडीद पीक कापणीची आकडेवारी अद्ययावत नसल्याने शेतकऱ्यांना पीकविमा देण्याच्या
प्रक्रियेत विलंब होत असल्याचं कृषीमंत्री
पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं. राज्यस्तरी कृषी आढावा बैठकीत ते काल मुंबई इथं बोलत
होते. यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी मूग आणि उडीद पीक कापणीची आकडेवारी तात्काळ कळवण्याचं
आवाहन त्यांनी यावेळी केलं. ऑक्टोबर अखेरपर्यंत शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात मिळावी
या दृष्टीनं प्रयत्न करण्यात येत असल्याचं ते म्हणाले.
****
श्री क्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कॅनडा सरकारकडून २००० कोटी रुपयांची
मदत मिळणार असल्याची माहिती, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी दिली. भारत
आणि कॅनडा मैत्री करारास १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कॅनडानं स्वत:हून पंढरपूरच्या
विकासासाठी मदतीची तयारी दर्शवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीला
पंढरपूर इथं सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर काल मुंबईत कॅनेडियन शिष्टमंडळाची काही
वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत पंढरपूर शहराच्या विकासाबाबत सविस्तर
चर्चा करण्यात आली. येत्या तीन ऑक्टोबरला कॅनडाच्या तज्ज्ञ मंडळींचा एक गट पंढरपूर
शहराची पाहणी करुन आराखडा तयार करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जेष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू
यांचं आज पहाटे मुंबईतल्या सायन रूग्णालयात निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. प्रकृती
अस्वास्थामुळं काल सकाळी त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात
आलं होतं. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. साधू यांनी देहदान करण्याचा
निर्णय घेतला असल्यानं त्यानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. ८०व्या अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या साधू यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून
राजकीय विषय अत्यंत कुशलतेने हाताळले. १९९५ ते २००१ पर्यंत त्यांनी पुणे वृत्तपत्रविद्या
विभागात विभागप्रमुख म्हणूनही काम केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान आणि अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानंही
त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. झिपऱ्या,
तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल,
शोधयात्रा, सिंहासन, स्फोट या त्यांच्या कांदबऱ्या आहेत तर एक माणूस उडतो त्याची गोष्ट,
ग्लानिर्भवति भारत, यासह पडघम, अक्षांश-रेखांश,
तिसरी क्रांती, सभापर्व सह विपुल साहित्यलेखन त्यांनी केलं.
****
राजकारणात
सत्तेपुढं लोटांगण घालणाऱ्यांची संख्या वाढत असल्यानं देशाची लोकशाही धोक्यात आल्याचं
मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद
इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स दिननिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी स्वत:च्या विचारांशी कधीच बेइमानी केली नाही, देशानं क्षणोक्षणी त्यांची
अवहेलना केली मात्र त्यांचं मन मोठं होतं, असंही त्यांनी पुढं बोलतांना नमूद केलं.
****
जालना जिल्ह्यात बरंजळा इथं तहसीलदारांनी जप्त केलेला
वाळूचा ट्रक, दोन तलाठ्यांसह पळवून नेणाऱ्या तस्कराविरुध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा
नोंदवण्यात आला आहे. तहसीलदार योगिता कोल्हे यांनी बरंजळा इथं वाळूचा ट्रक पकडला होता.
हा ट्रक वाळू तस्कर सर्जेराव चव्हाण यानं काल सकाळी दोन तलाठ्यांसह पळवून नेला होता.
महसूल विभागाचे कर्मचारी तसंच पोलिस पथकानं जवळपास पंधरा किलोमीटर पाठलाग करून ग्रामस्थांच्या
मदतीनं हा ट्रक पकडून, चालकास ताब्यात घेतलं आणि तलाठ्यांची सुटका केली.
****
तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिरात पत्रकारांशी गैरवर्तन
करणाऱ्या दोन पुजाऱ्यांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी सहा महिने मंदीर प्रवेश
बंदी केली आहे. पत्रकार संतोष जाधव यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई
केली. संजय सौंजी आणि विलास सौंजी अशी या पुजारी पितापुत्रांची नावं आहेत. या दोघांना
नोटीस बजावण्यात आली असून, दोन दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या कस्तुरवाडी
इथं, काल दुपारी कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. यातील
दोघी सख्ख्या बहिणी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अन्य एका घटनेत मंठा तालुक्यातल्या
वाई इथं माकड मागे लागल्यामुळे दोन मुली विहिरीत पडल्या आणि त्यांचा पाण्यात बुडून
मृत्यू झाला.
****
पैठणच्या जायकवाडी धरणातली पाण्याची आवक मंदावली असून,
धरणाची पाणी पातळी साडे अठ्ठ्याण्णव टक्क्यांवर स्थिर आहे. धरणाचे सर्व दरवाजे बंद
असले तरी, डाव्या तसंच उजव्या कालव्यातून अनुक्रमे एक हजार आणि पाचशे घनफूट प्रतिसेकंद
वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मांजरा धरणाचे चार दरवाजे बंद करण्यात आले असून, धरणाच्या
दोन दरवाजातून सुमारे ५० घनमीटर प्रतिसेकंद वेगानं काल पाण्याचा विसर्ग सुरू होता.
****
औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे काल सकाळी धावणी मोहल्ला
परिसरात हेरिटेज वॉक घेण्यात आला. या भागातला ऐतिहासिक उदासी मठ, भाई दयासिंग गुरुद्वारा,
हनुमान मंदिर, कुस्तीचा २०० वर्षे जुना आखाडा आणि प्रसिद्ध अप्पा हलवाई यांच्याबद्दल
इतिहासप्रेमींना माहिती देण्यात आली. इतिहासप्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित
होते.
****
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत परभणी शहर निर्मल झालं असल्याचं
महानगर पालिकेतर्फे सांगण्यात आल आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्पात ओला आणि सुका
कचरा अलग करुन त्याचं खत तयार केलं जाणार आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
***
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला तिसरा सामना काल इंदूर इथं भारतानं पाच गडी राखून जिंकला आणि मालिकेत ३-०
नं आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियानं भारतापुढं विजयासाठी
२९४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सामनावीर ठरलेल्या हार्दिक पंड्याच्या ७८ धावा तसंच
अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांची शतकी भागीदारी यामुळं भारतानं हे आव्हान लीलया पेललं.
****
No comments:
Post a Comment