Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 SEP. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नागपूर दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी राज्यपाल
सी विद्यासागर राव, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्यासह अनेक मान्यवरांनी विमानतळावर राष्ट्रपतींचं स्वागत केलं. त्यानंतर राष्ट्रपतींनी
दीक्षाभूमी इथं भेट देऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं.
राष्ट्रपती कोविंद यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. आपल्या या एक दिवसीय दौऱ्यात
राष्ट्रपती रामटेक इथं विपश्यना केंद्राचं उद्घाटन तसंच नागपुरात रेशीमबाग इथं कविवर्य
सुरेश भट सभागृहाचं लोकार्पण करणार आहेत.
****
पाकिस्तान
जागतिक दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचं भारतानं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या
महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी केलेल्या भाषणाला उत्तर देताना
भारताच्या प्रतिनिधी एनम गंभीर यांनी पाकिस्तान आता भौगोलिकदृष्ट्या दहशतवाद्यांसाठी
पर्याय बनला असल्याचा आरोप केला. पाकिस्तानात दहशतवाद्यांना वावरण्यास पूर्ण संरक्षण
दिलं जात असल्याचं गंभीर यांनी नमूद केलं.
****
जम्मू
काश्मीरमधल्या बनिहाल भागात गेल्या बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या
दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी आज अटक केली. गझनफर आणि आरिफ असं या दोघांचं
नाव असून, त्यांची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.
दरम्यान,
जम्मू काश्मीरमधल्या अरनिया, रामगढ आणि आर एस पुरा सेक्टर इथं काल रात्री पाकिस्तानी
सैन्यानं अंधाधुंद गोळीबार केला. सीमेलगतच्या ४० गावांना या गोळीबराचा फटका बसला असून,
यात सहा नागरिक जखमी झाले आहेत.
****
राज्यातल्या
रस्त्यांची दुरवस्था झालेली असल्यानं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं
या समस्येकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. गेल्या वीस वर्षात रस्त्यांवर झालेल्या खर्चाची
माहितीही न्यायालयानं मागवली आहे. हिंगोली जिल्ह्यात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एका
महिलेला खाटेवरून चार किमी चालत रूग्णवाहिकेपर्यंत न्यावं लागल्याची बातमी नुकतीच प्रकाशित
झाल्याच्या पार्श्वभूमीवर खंडपीठानं स्वयंप्रेरणेनं याचिका दाखल करून घेतली. यावरच्या
सुनावणीदरम्यान न्यायालयानं राज्य सरकारला येत्या ३० ऑक्टोबर पर्यंत रस्त्यांच्या कामाची
माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
****
बालमृत्यू
रोखण्यासाठी राज्याचा आरोग्य विभागामार्फत होत असलेल्या प्रयत्नांची दखल नीति आयोगानं
घेतली असून यात महाराष्ट्रचं काम उत्कृष्ट असल्याचे गौरवोद्गार आयोगानं काढले आहेत.
राज्यातले डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, एएनएम, आशा कार्यकर्त्या या सर्वांच्या प्रयत्नांमुळे
बालमृत्यू रोखण्यासाठी यश येत असल्याचं आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी म्हटलं
आहे.
****
प्रत्यक्ष
कराच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न वाढावं यासाठी करपात्र व्यक्तींनी त्वरित विवरण
पत्रं दाखल करावीत, यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्याचे प्राप्तिकर आयुक्त
ए एस शुक्ला दिली आहे. नाशिक इथं आयकर भवनात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.
रोख व्यवहार करणाऱ्या विविध व्यावसायिक घटकांवर तसंच कांदा व्यापारी किंवा तत्सम कृषी
व्यापाऱ्यांवर प्राप्तीकर विभागाचं विशेष लक्ष असल्याचं ते म्हणाले.
****
धनगर आरक्षण तसंच सोलापूर विद्यापीठाला
अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी मल्हार क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी
आज सातारा इथं रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात गदारोळ केला. शिक्षणमंत्री विनोद
तावडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू असताना, कार्यकर्त्यांनी तावडे यांच्यादिशेने
बुक्का उधळला. पोलिसांनी मल्हार क्रांतीचे राज्य समन्वयक मारुती जानकर यांना या प्रकरणी
अटक केली असल्याचं आमच्या साताऱ्याच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उजनी धरणातून भीमा नदीपात्रात होणारा
विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या धरणातून ८० हजार घनफुट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू
आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
मराठवाड्यातही
जायकवाडी तसंच मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं, नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा
इशारा देण्यात आला आहे.
****
मराठवाड्यातले
बोडखे डोंगर हिरवेगार करण्याकरता, येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत नव्यानं एक हजार रोपवाटिका
मंजूर करण्याच्या उद्दीष्टपूर्तीसाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी छाननी
समिती स्थापन करुन, बैठक घेण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात
आयोजित वृक्ष लागवड आढावा बैठकीत ते बोलत होते. पुढील दोन वर्षात पंधरा कोटी वृक्षलागवडीच्या
उद्दीष्टपूर्तीकरता मनरेगा अंतर्गत जिल्हानिहाय वर्गीकरण करून तालुकास्तरावर वृक्षलागवडीचं
काम मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावयाचं असल्याचं त्यांनी सांगितलं,
****
No comments:
Post a Comment