Wednesday, 27 September 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 27.09.2017 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 SEP. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·       अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन बालकांचा पोषण आहार त्वरीत सुरु करण्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचं आवाहन

·       सीताफळावर प्रक्रिया करुन त्याचं नोगा ब्रँडच्या माध्यमातून वितरण करण्याच्या  कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या सूचना

·       राज्य शासनाचा ‘पंडीत भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार’ पंडीता माणिक भिडे यांना जाहीर

आणि

·       केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत उपक्रमात कोल्हापूर जिल्हा प्रथम

****

राज्यात २३ हजार ४२२ अंगणवाडी कर्मचारी कामावर हजर झाले असून उर्वरीत कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन बालकांचा पोषण आहार त्वरीत सुरु करावा असं आवाहन  महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. शासनानं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा नुकतीच केली आहे, मात्र काही संघटनांना ही मानधनवाढ समाधानकारक वाटत नसल्यामुळे अद्याप अनेक कर्मचारी संपावर आहेत, त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी हे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत काल मुंडे यांनी चर्चा केली. बालकांचा पोषण आहार पुरवठा ही दैनंदिन अत्यावश्यक बाब आहे, बालकांना अशा प्रकारे उपाशी ठेवणं अत्यंत चुकीचं आहे अशा शब्दात मुंडे यांनी या संपाविषयीची नाराजी व्यक्त केली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवरही शासन सकारात्मक असून, त्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे,असं त्यांनी यावेळी सांगितलं.यासंदर्भात मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुंडे यांनी दिलं आहे.

****

राज्यात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासाठी दक्षिण कोरीयाच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सेऊल इथं राज्यातल्या विविध पायाभूत प्रकल्पांबाबत तिथल्या सरकारशी सामंजस्य करार केले. या करारानुसार स्मार्ट सिटी, महामार्ग, विमानतळ, मेट्रो या सारख्या क्षेत्रातल्या प्रकल्पांच्या उभारणीत राज्याला दक्षिण कोरियाचे सहकार्य लाभणार आहे.

****

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मेजर रमेश उपाध्याय यांना मुंबई उच्च न्यायालयानं एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यानंतर जामीन मिळणारे उपाध्याय हे पाचवे आरोपी आहेत. या बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह १२ जणांना अटक केली होती, मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पाच जणांविरोधात ठोस पुरावे नसल्याचं सांगितलं होतं.

****

परभणी जिल्ह्यातल्या मानवत तहसील कार्यालयातले अव्वल कारकून प्रकाश बोराडे यांना जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी निलंबित केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मानवत तहसील कार्यालयातल्या पुरवठा विभागाची तपासणी केली असता, विभागात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली, तसंच बोराडे यांच्याबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

****

‘आयएनएस - तरासा’ ही युद्धनौका काल नौदलात सामील करण्यात आली. मुंबईतल्या नौदल बंदरात हा समारंभ झाला. व्हाईस ॲडमिरल गिरीश मिश्रा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना मिश्रा यांनी सांगितलं की या युद्धनौकेमुळे पश्चिम नौदल कमांडची शक्ती वाढणार असून, पश्चिम किनाऱ्यावरचं संरक्षण आणखी भक्कम होईल. कार्यरत होण्यापूर्वी या युद्धनौकेनं युद्धाशी संबंधित सर्व चाचण्या पूर्ण केल्या असल्याचं मिश्रा यांनी सांगितलं.

****

सीताफळावर प्रक्रिया करुन त्याचं नोगा ब्रँडच्या माध्यमातून वितरण करण्याबाबत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल सूचना दिल्या. मंत्रालयात कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आइस्क्रीम उद्योग क्षेत्रातून सीताफळाच्या पल्पला मोठी मागणी असते, ही गरज लक्षात घेता नोगानं खाजगी उद्योजकांच्या सहकार्यातून सीताफळाच्या प्रक्रिया झालेल्या मालाचं वितरण करावं, यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो, असं ते म्हणाले.

****

राज्य शासनातर्फे दिला जाणारा ‘पंडीत भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा पंडीता माणिक भिडे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल ही घोषणा केली. शास्त्रीय गायन आणि वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत उपक्रमात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आला आहे. येत्या दोन ऑक्टोबरला नवी दिल्ली इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमात, कोल्हापूर जिल्ह्याला, ‘स्वच्छता दर्पण पुरस्कारा’नं गौरवण्यात येणार आहे. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं स्वच्छ भारत अभियानात होणाऱ्या कामांवर गुणांकन केलं आहे. स्वच्छतेच्या कामांवर कोल्हापूरला ९० टक्के गुण मिळाले आहेत.

****

परभणी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली असल्याचं जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी सांगितलं. या योजनेच्या अंमलबजावणीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. एक आणि दोन ऑक्टोबर रोजी प्रत्येक गावात ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक गावस्तरीय अर्जदार शेतकऱ्यांच्या याद्यांचे चावडी वाचन होणार आहे. या याद्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात प्रसिध्द केल्या जातील. या चावडी वाचनात शेतकऱ्यांच्या शकांचं निरसन केलं जाईल, तसंच यादीतल्या अपात्र शेतकऱ्यांबाबत माहिती देण्याची मुभाही दिली जाणार आहे.

****

जालना जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत दाखल अर्जांचं काल चावडी वाचन झालं. या योजनेसाठी जालना जिल्ह्यातून तीन लाख ९६ हजार १९७ अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातल्या ४८५ ग्रामपंचायतींमध्ये हे वाचन झालं, आचारसंहिता असलेल्या २३२ गावात निवडणूक निकालानंतर चावडीवाचन होणार असून, त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लातूर इथं विजेचा धक्का लागल्यानं किरण लोंढे नामक १९ वर्षीय युवकाचा गेल्या सोमवारी मेंदू मृत झाल्याचं घोषित करण्यात आलं. यानंतर किरणच्या कुटुंबियांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. लातूरमध्ये प्रथमच अवयव दान झालं. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -

किरण लोंढेचं ह्दय हे मुंबईच्या अशियन हार्ट इन्स्टिट्यूटला. एक किडनी औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन हॉस्पिटलला आणि कमलनयन बजाज हॉस्पिटलला पाठविण्यात आली.मुंबईला पाठवण्याच्या अवयवासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली होती.त्याचप्रमाणे औरंगाबादला पाठवण्याचे अवयव हे रस्ता मार्गे पाठवण्यात येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजाराम ओवार यांनी दिली.

****

महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी लातूर तालुका महिला कॉंग्रेसच्यावतीनं ग्रामीण भागात काल स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं. या अभियानात महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ तीन हजार महिलांनी स्वाक्षरी केल्या.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातल्या विहामांडवा इथल्या शरद सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीत आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलनं २० पैकी १८ जागा जिंकून विजय मिळवला. कारखान्याचे सस्थापक अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत घोडके यांच्या पॅनलला केवळ दोन जागा मिळाल्या.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यामधल्या चार ग्रामपंचायतींच्या १२ प्रभागातल्या २१ जागांसाठी  काल शांततेत मतदान झालं. या मतदानाची मतमोजणी आज सकाळी ९ वाजता वैजापूर तहसील कार्यालयात होणार असून, दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील असं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, गंगापूर तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. तर खुलताबाद तालुक्यात १० ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यात पहिल्या टप्प्यातल्या ४० ग्रापंचायतींसाठी १२१ केंद्रांवर काल मतदान झालं.

****

लातूर शहर आणि परिसरात यंदा समाधानकारक पाउस झाल्यानं शहरवासीयांना आता पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नसला तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापौर सुरेश पवार यांनी केलं आहे. आगामी काळात शहरातल्या नळांना मीटर बसवले जाणार असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. गेल्या चार वर्षांपासून लातूर शहराला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला होता.

****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...