Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 28 SEP. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ सप्टेंबर २०१७
सकाळी ६.५० मि.
****
·
पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची २५
हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी
·
महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं दक्षिण
कोरियातल्या कंपन्यांना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचं आवाहन
·
ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचं स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण जाहीर
आणि
·
आठवं मराठवाडा लेखिका साहित्य
संमेलन जानेवारीमध्ये बीड इथं होणार
****
पोलिस
दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं २५ हजार ६० कोटी रुपये खर्चाच्या योजनेला
काल मंजुरी दिली आहे. आगामी तीन वर्षांत अंतर्गत सुरक्षा, महिला सुरक्षा, आधुनिक शस्त्र
खरेदी, सीसीटीव्ही यंत्रणेसह इतर व्यवस्थेचं आधुनिकीकरण यातून केलं जाणार आहे. केंद्रीय
आरोग्य सेवेच्या आयुष विभाग, सैन्य दल, रेल्वे आदी विभागात कार्यरत डॉक्टरांचं सेवानिवृत्तीचं
वय ६२ वरून ६५ करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. लष्कराच्या
सर्व छावण्यांमध्ये मोबाईल टॉवर्स उभे करण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं
घेतला आहे. कॉल ड्रॉप - संवाद खंडीत होण्याची समस्या वाढत असल्याची तक्रार दूरसंचार
कंपन्यांकडून वारंवार होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
गतिमान
विकास प्रक्रियेमुळे औद्योगिक क्षेत्रात निर्माण होत असलेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी,
दक्षिण कोरियातल्या कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असं आवाहन, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दक्षिण कोरियाचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री किम डाँग
यून यांच्याशी त्यांनी काल सेऊल इथं चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात मोठ्या
प्रमाणात होत असलेल्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीसह विकासाच्या प्रक्रियेस चालना
मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राशी असलेले आर्थिक संबंध
अधिकाधिक वृद्धिंगत करण्याबरोबरच, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, सांडपाणी प्रक्रिया
प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास,
दक्षिण कोरिया सकारात्मक असल्याचं, अधिकृत सूत्रांनी सांगितलं
****
ग्रामीण
पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं राज्याचं स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण काल जाहीर
करण्यात आलं. या धोरणात अंतर्भूत करण्यात आलेल्या विविध बाबींची येत्या काळात अंमलबजावणी
करून ग्रामीण पर्यटन, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना देण्यात
येईल, अशी घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत
केली. या धोरणाअंतर्गत औरंगाबाद, मुंबई, सिंधुदूर्ग आणि नागपूर इथं प्रत्येकी ४०० तरुणांना
तर प्रत्येक जिल्ह्यातल्या किमान २० तरुणांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. औरंगाबाद इथं
घेतल्या जाणाऱ्या वेरुळ महोत्सवासह अन्य काही महोत्सवांचं पूर्वनियोजन करुन आयोजन
केलं जाणार असल्याचं रावल यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
११६ स्थळांच्या विकास आराखड्यास महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी
समितीनं मान्यता
दिली आहे अशी माहिती, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. काल जागतिक पर्यटन दिवसाच्या
पार्श्वभूमीवर राज्यातल्या निसर्ग पर्यटनासंबंधी माहिती देताना ते बोलत होते. वन्य
प्राण्यांकरता असलेल्या, संरक्षित वनाबरोबरच वन क्षेत्रामध्ये येणारे किल्ले, काही देवस्थानं, पाणस्थळं आणि
जैव विविधता संवर्धन उद्यान यांचा निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे.
यामध्ये अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या मंदिराचा समावेश आहे.
****
शेतकऱ्यांनी ज्या बँकेत त्यांचे कर्ज खाते आहे, त्या बँकेला तत्काळ आपला आधार क्रमांक
नोंद करावा असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या ऑनलाईन
माहिती संकलनाबाबत सहकार विभागाची आढावा बैठक काल मुंबईत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी देशमुख बोलत होते. कर्जमाफीसाठी सर्व कर्जदार शेतकऱ्यांची माहिती बँकेकडून
मागविण्यात आली आहे, मात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नोंद नसल्यामुळे ही माहिती देण्यास विलंब होत
असल्याचे काही बँकांनी सांगितलं आहे.
****
देशभरातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा
आणि शेतमालाला स्वामिनाथन आयोगाच्या सुत्रानुसार हमी भाव देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती मार्फत देशभरात आंदोलन करणार असल्याचं स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी
बोलतांना सांगितलं. शेतमालाला भारतीय
अन्न महामंडळानुसार किमान आधारभूत किंमत देण्याचा दृष्टीकोन हा शेतकऱ्यांच्या हिताचा
नसल्याचं शेट्टी म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या
चाळीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची काल मतमोजणी झाली. सरपंचपदी विजयी झालेल्या चाळीस
उमेदवारांपैकी भारतीय जनता पक्षानं २२, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं १४ गावचे सरपंच
आपल्या पक्षाचे असल्याचा दावा केला आहे. इतर चार गावचे सरपंच शिवसेना पुरस्कृत असल्याचं
सूत्रांनी सांगितलं. तालुक्यातल्या उर्वरित पंधरा ग्रामपंचायतींसाठी येत्या सात ऑक्टोबरला
मतदान होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या चार ग्रामपंचायतींच्या
निवडणुकांचे निकालही काल जाहीर झाले. या चारही ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्याचा
दावा शिवसेनेनं केला आहे. सिल्लोड तालुक्यातल्या, १८ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत काल
११० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता सरपंचपदासाठी एकूण ५९ तर, सदस्यपदासाठी एकूण
३२१ उमेदवार रिंगणात आहेत. कन्नड तालुक्यातल्या औराळा ग्रुप ग्रामपंचायतीसाठीच्या आठ
जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
****
आठवं मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन येत्या
जानेवारीमध्ये बीड इथं होणार असल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव
ठाले पाटील यांनी काल बीड इथं वार्ताहरांना दिली. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून
माजी आमदार उषा दराडे यांची निवड करण्यात आली आहे. उद्या उस्मानाबाद इथं होणाऱ्या
कार्यकारिणीच्या बैठकीत संमेलनाध्यक्षाची निवड केली जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुरुम बाजार समितीचं
संचालक मंडळ बरखास्त करुन त्याठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. शेतीमाल खरेदी-विक्रीच्या
नोंदी न ठेवणे, हमी भावापेक्षा कमी दरानं तूर खरेदी करणं आदी बाबींमुळे ही कारवाई करण्यात
आली आहे.
****
नवरात्रोत्सवात काल उस्मानाबाद जिल्ह्यात
तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार स्वरुपात महापूजा बांधण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवीला अर्पण केलेले दागिने तुळजाभवानी देवीला घालण्यात आल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या
दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
****
नांदेड वाघाळा महानगर पालिका
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालच्या शेवटच्या दिवशी ३१२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता ८१ जागांसाठी ५८१ उमेदवार
निवडणूक रिंगणात उरले आहेत. या उमेदवारांना उद्या
निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाणार आहे. येत्या ११ आक्टोबरला मतदान होणार असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातले
मराठी विभागाचे माजी प्रमुख, साहित्यिक आणि समीक्षक एस.एस.भोसले यांचं काल वृध्दापकाळानं
निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. भोसले यांनी विपुल लेखन केलं असून त्यांनी १८ पुस्तकांचं
लेखन केलं आहे तर २२ पुस्तकांचं संपादन केलं आहे. त्यांच्यावर काल रात्री औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
लातूर शहरातल्या विविध समस्यांविरोधात महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेच्या वतीनं काल महानगर पालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या सर्वच
रस्त्यांवर पडलेले खड्डे, कचऱ्यांचे ढीग आणि महापालिकेकडून होत असलेली चुकीची घरपट्टी
वसूली तसंच महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा कार्यकर्त्यांनी यावेळी निषेध केला.
****
कोल्हापूर-शिर्डी
रेल्वे सेवेला कालपासून कोल्हापूर इथून प्रारंभ झाला. अठरा डब्यांच्या या साप्ताहिक
गाडीला मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड आणि अहमदनगर हे मुख्य थांबे असतील.
****
भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांच्या
मालिकेतला चौथा सामना आज बंगळुरू इथं होणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतले याआधीचे
तीनही सामने जिंकलेला भारतीय संघ चौथा सामना जिंकून एकदिवसीय सामन्यांसाठीच्या जागतिक
क्रमवारीतलं सर्वोच्च स्थान टिकवण्याचा प्रयत्न करेल. दुपारी दीड वाजता
हा सामना सुरू होईल.
****
No comments:
Post a Comment