Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 September 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
भारतीय जनता
पक्ष काम करण्यावर जास्त भर देत असल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी
म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत
आज शहा यांनी केलेल्या भाषणाबद्दल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वार्ताहर परिषदेत
माहिती दिली. भाजप वंशवादाचं राजकारण करत नाही, असं सांगून शहा यांनी, देशानं जातीवाद,
आणि वंशवादाचं राजकारण नाकारलं असल्याचं सांगितलं. गरीब आणि वंचितांच्या कल्याणासाठी
सरकारनं विमुद्रीकरण तसंच वस्तू आणि सेवा कर यासारखे निर्णय घेतले असल्याचं ते म्हणाले.
तत्पूर्वी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीचं उद्घाटन केलं.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय
समुदायासमोर पाकिस्तानचा दहशतवादाच्या बाबतीतला खरा चेहरा उघड केल्याबद्दल पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणारा राजकीय प्रस्ताव आज या बैठकीत पारित करण्यात आला.
डोकलाम मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधानांची राजकीय परिपक्वता आणि राजनिपुणता
दिसून आल्याचं या प्रस्तावात म्हटलं आहे.
****
राजीव महर्षी
यांनी आज नियंत्रक आणि महालेखापाल पदाची सूत्रं हाती घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजस्थान कॅडरचे भारतीय प्रशासन सेवेतले
अधिकारी असलेले महर्षी यांनी राजस्थान सरकार आणि केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या
पदांवर काम केलं आहे. गेल्या महिन्यात ते केंद्रीय गृहसचिव पदावरून निवृत्त झाले.
****
सक्तवसुली
संचालनालयानं एअरसेल मॅक्सिस प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र
कार्ती चिदंबरम यांची मालमत्ता जप्त केली असून, बँक खाती आणि मुदत ठेवी गोठवल्या आहेत.
कार्ती यांच्यावर २००६ मध्ये पी चिदंबरम अर्थमंत्री असताना एअरसेल मॅक्सिस करारात थेट
परदेशी गुंतवणुकीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
****
‘स्वच्छता
हीच सेवा’ या अभियानांतर्गत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आज राजभवन परिसरात स्वच्छता
मोहीम राबवली. यावेळी राजभवन मधील देवी मंदीराजवळ वृक्षारोपणही करण्यात आलं.
****
पंडित दीनदयाळ
उपाध्याय यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली इथल्या
महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण
करून अभिवादन केलं.
मुंबईत मंत्रालयातही
जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केलं.
उस्मानाबाद
इथं आज यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महिला रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवण्यात
आली.
****
राज्यातल्या
कांद्याला इतर राज्यातून असलेली मागणी लक्षात घेता पणन मंडळ आणि महाराष्ट्र शेतकरी
उत्पादक कंपनीनं कांदा इतर राज्यात विक्रीसाठी पाठवावा, असे निर्देश पणन राज्यमंत्री
सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र
शेतकरी उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. केंद्र सरकारची
राज्यात असलेल्या रेशन दुकानांच्या माध्यमातून राज्यातला कांदा दिल्लीत विक्री करण्यासंदर्भात
दिल्ली आणि केंद्र सरकारसोबत चर्चा करुन, प्रस्ताव पाठवण्याचे निर्देशही खोत यांनी
यावेळी दिले.
****
ज्येष्ठ साहित्यिक
आणि पत्रकार अरूण साधू यांच्या निधनाबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि
कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शोक व्यक्त केला आहे. साधू यांच्या
निधनामुळे पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातलं एका परखड, व्यासंगी साहित्यिकाला
आपण मुकलो आहोत, असं तावडे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
****
जिल्हास्तरीय
विद्युतीकरण प्रभावीपणे राबवण्यासाठी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या
अध्यक्षतेखाली आज महावितरण कार्यालयात बैठक पार पडली. जिल्हास्तरीय विद्युतीकरण आणि
त्यांचं विस्तारीकरण या बाबत सर्वांचा समन्वय साधून प्रगतीबाबतचा आढावा यावेळी घेण्यात
आला, तसंच नागरिकांच्या विद्युतीकरणासंबंधी असलेल्या तक्रारीही मांडण्यात आल्या.
घाटी रुग्णालयातल्या
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कर्करोग रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणीही खैरे यांनी
आज केली.
****
जालना जिल्ह्यातल्या
जाफराबाद तालुक्यात पहिल्या टप्प्यातल्या ४० ग्रापंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे. १२१ केंद्रांवर होणाऱ्या
मतदानासाठी निवडणूक विभागानं २०० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मतदारांना सकाळी साडेसात
ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येईल, असं तहसीलदार जे. डी. वळवी यांनी
सांगितलं.
****
बँड आणि इतर
वाद्ये, तसंच डॉल्बी वाजवण्यावर शासनानं आणलेले निर्बंध शिथिल करावे या मागणीसाठी आज
सातारा जिल्ह्यातल्या बँड व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाद्ये घेऊन आंदोलन
केलं. यात शंभरहून अधिक व्यावसायिक सहभागी झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
No comments:
Post a Comment