Sunday, 24 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 24.09.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 SEP. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

** महागाईविरोधात शिवसेनेची मुंबईत अनेक ठिकाणी निदर्शनं

** पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद

** नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी २२४७ उमेदवारांचे अर्ज दाखल

आणि

** भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना

****

कोणत्याही परिस्थितीत एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते काल कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात आतापर्यंत ५८ लाख शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफीसाठीचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत, मात्र ज्या शेतकऱ्यांचे अर्ज अद्याप प्राप्त झाले नाहीत त्यांच्यासाठी राज्यात ठिकठिकाणी तक्रार निवारण केंद्र स्थापन करून, त्यांची प्रकरणं मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. प्राप्त झालेल्या ५८ लाख अर्जांची ऑक्टोबर अखेरपर्यंत छाननी करुन त्यांना प्रथम कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यात येईल, असं पाटील म्हणाले. पीक कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची शक्यता मात्र त्यांनी फेटाळून लावली.

****

महागाईविरोधात शिवसेनेनं काल मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार निदर्शनं केली. पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस, भाज्या तसंच अन्नधान्याच्या भाववाढीविरोधात मुंबईत बारा ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं. निदर्शनावेळी महागाई पुतळ्याचं दहन करण्यात आलं, तसंच केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या.

****

शिवसेना सत्तेत भागीदार असली तरीही सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी रस्त्यावर उतरणार असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांना भारतीय जनता पक्षानं प्रवेश देऊ नये, असं मतही केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्षातून नुकतेच बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेश शक्यतेच्या पार्श्वभूमीवर केसरकर बोलत होते.

****

राज्यातलं भाजप-शिवसेनेचं सरकार म्हणजे सावळा गोंधळ असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. काल मुंबई इथं पक्षाच्या इतर मागासवर्गीय विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. पुरोगामी विचारांचा, प्रगत महाराष्ट्र नेमका कुठे चाललाय, असा प्रश्न उपस्थित करून, पवार यांनी सरकार विविध पातळ्यांवर अपयशी ठरल्याची टीका केली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात, सरकार एखाद्या मुद्यावर निर्णय घेत असताना, शिवसेनेचे मंत्री काय करतात, असा प्रश्न करत, शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, आपल्या भाषणात आरक्षण संपवण्याचं या सरकारचं षडयंत्र असल्याचं, टीका केली.

****

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता या पदाची भरती परीक्षा आता विभागवार न घेता एकाच दिवशी, एकाच वेळी ऑनलाइन घेण्यात येणार आहे. या विभागातल्या सगळ्या पदांची भरती परीक्षा राज्यात एकाच दिवशी ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अमोल सांबरे यांनी केली होती. विभागानं ही मागणी मान्य करत संपूर्ण राज्यात एकाच वेळेस परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांबरे यांनी कळवलं आहे.

****

२०२२ पर्यंत देशात प्रत्येक बेघर व्यक्तीला घर देण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते काल उत्तर प्रदेशात वाराणसी जिल्ह्यातल्या शहंशहापूर इथं प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभधारकांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते. वस्तू आणि सेवा कर कायदा तसंच आधार जोडणीमुळे सरकारनं भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात मोहिम उघडली असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. ‘मन की बात’ या कार्यक्रम मालिकेचा हा ३६वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

*****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातून होणारी पाण्याची आवक मंदावल्यानं, धरणाचे सर्व दरवाजे बंद करून, विसर्ग थांबवण्यात आला आहे. मात्र धरणाच्या डाव्या कालव्यातून ७०० घनफूट, तर उजव्या कालव्यातून ४०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यानं, गेल्या गुरुवारी मध्यरात्रीनंतर धरणाचे अठरा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या दरम्यान, सुमारे चाळीस दशलक्ष घनमीटर पाणी धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलं. धरणात सध्या सुमारे पाच हजार ५३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, एकूण पाणी साठा ९८ टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड यांनी दिली आहे.

****

नांदेड महानगरपालिकेच्या येत्या ११ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी  उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता.  एकूण ८१ जागांसाठी २ हजार २४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, यात अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे. काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व राजकीय पक्षांनी सर्व जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहे. उद्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

**

पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काल औरंगाबाद इथं आम आदमी पक्षाच्या वतीनं क्रांती चौक परिसरात निदर्शनं करण्यात आली. पक्ष कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली.

****

परभणी जिल्ह्यातल्या १२६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होत असून २७ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपली तेव्हा सरपंच पदासाठी पाचशे बावन्न तर ग्रामपंचायत सभासदत्वासाठी दोन हजार ९९२ अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातल्या राजकीय समीकरणांना सध्या वेग आल्याचं चित्र आहे.

****

उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष संभाजीराव जाधव यांचं काल उस्मानाबाद इथं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. उस्मानाबाद नगर पालिकेचे दोन वेळा नगरसेवक म्हणून काम केलेल्या जाधव यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी १० वर्ष सांभाळली. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

भारताचा स्क्वॅश खेळाडू सौरव घोषाल  मकाऊ खुल्या स्क्वॅश स्पर्धेच्या  अंतिम फेरीत दाखल झाला आहे. सौरवनं काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात  जर्मनीच्या सिमन रोस्नरला पराभूत केलं. अंतिम लढतीत सौरव इजिप्तच्या मोहम्मद अबुल्घर याच्याविरुध्द खेळणार आहे.

दरम्यान, जपानच्या टोकियो इथं आयोजित जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताच्या प्रणव चोप्रा - सिक्की रेड्डी या जोडीचा उपांत्य फेरीत पराभव झाला. जपानच्या ताकुरो होकी-सायाका हिरोता जोडीनं पहिला सेट गमावल्यानंतर पुढील दोन्ही सेट जिंकत भारताच्या जोडीवर मात केली.

**

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव वसुंधरा-२०१७ला काल प्रारंभ झाला. अभिनेते योगेश शिरसाठ यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका सिंधुताई सपकाळ तर अध्यक्ष म्हणून कुलगुरु डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्यासह संत बलविंदरसिंगजी तसंच इतर मान्यवर उपस्थिती होते. नृत्य- नाट्य- संगीत चित्रकला, वादविवाद यासह विविध प्रकारच्या स्पर्धांमधून  ७३ महाविद्यालयातल्या दीड हजार विद्यार्थी या महोत्सावात सहभागी झाले आहेत्र

***

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज इंदूर इथं खेळला जाणार आहे. भारतानं पहिले दोन सामने जिंकत मालिकेत दोन शुन्य नं आघाडी घेतली आहे.

****

पैठणी उद्योग सशक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी तुतीची जास्तीत जास्त लागवड करणं आवश्यक असल्याचं विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं संत एकनाथ रंग मंदिरात महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाच्या मराठी पैठणी हस्तकला विभागाच्या वतीनं आयोजित पैठणी साडी महोत्सवाचं उद्घाटन भापकर यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. मनरेगा, रोहयो अशा योजनांच्या माध्यमातून २० हजार एकरवर तुतीची लागवड करण्याचं उद्दीष्ट असल्याचं भापकर यावेळी म्हणाले.

****


No comments: