Sunday, 24 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 24.09.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 SEP. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

स्वच्छता ही सेवा अभियानाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, ही एक सकारात्मक बाब असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा आज ३६वा भाग प्रसारित झाला.



स्वच्छता ही सेवा या अभियानात पहिल्या चारच दिवसांमध्ये जवळपास ७५ लाखांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले असल्याचं सांगून पंतप्रधानांनी या अभियानाच्या प्रचारात प्रसार माध्यमांचा मोलाचा सहभाग असल्याचं नमूद केलं.



उद्या २५ सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती, तर ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण, नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करत, पंतप्रधानांनी, देशासाठी जगणं, ही या सगळ्या महापुरुषांमध्ये समान गोष्ट असल्याची भावना व्यक्त केली.



येत्या ३१ ऑक्टोबरला देशात युनिटी फॉर रन म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं.

देशाच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येण्याचं, तसंच आगामी १७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन, करत पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या नवरात्रासह आगामी सण उत्सवांनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. 

मन की बात या कार्यक्रमाला आज तीन वर्ष पूर्ण झाली. या कार्यक्रमामुळे जनतेचे विचार सरकारपर्यंत पोहोचले, त्यामुळे सरकारमध्ये सुधारणा करणं सोपं गेलं. एक छोटीशी घडामोड किती मोठं आंदोलन निर्माण करू शकते, याचा अनुभव मन की बात मुळे घेता आला असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

दहशतवाद निर्यात करणारा कारखाना अशी दुष्कीर्ती आपल्याला का लाभली याबाबत पाकिस्ताननं आत्मपरिक्षण करावं असा रोखठोक सल्ला भारतानं दिला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल रात्री संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत बोलताना पाकिस्तानवर जोरदार टीका केली. लष्कर ए तय्यबा, जैश ए मोहम्मद, हिज्बुल मुजाहिद्दिन, आणि हक्कानी नेटवर्क सारख्या दहशतवादी गटांना आसरा देऊन पाकीस्ताननं भारताविरुद्ध अप्रत्यक्ष युद्धच सुरू केलं असल्याचं स्वराज म्हणाल्या. पर्यावरण बदल, सागरी सुरक्षा, बेरोजगारी, महिला सबलीकरण, अण्वस्त्र प्रसारबंदी, सायबर सुरक्षा अशा अनेक विषयांवर स्वराज यांनी यावेळी देशाची भुमिका मांडली. दरम्यान, स्वराज याचं भाषण अतुलनीय होतं आणि जागतिक मंचावर त्यांनी भारताचा अभिमान उंचावला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या उरी सेक्टर इथं आज सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी जवानांनी शोधमोहीम सुरु केली, त्यावेळी ही चकमक झाली.

****

अकोला इथल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.विलास भाले यांची नियुक्ती झाली आहे. पदभार स्वीकारल्यापासून पाच वर्षांसाठी ही नियुक्ती असेल. राज्यपाल तथा कुलपती सी.विद्यासागर राव यांनी डॉ भाले यांची नियुक्ती जाहीर केली.

****

तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिरात पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या दोन पुजाऱ्यांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी सहा महिने मंदीर प्रवेश बंदी केली आहे. पत्रकार संतोष जाधव यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. संजय सौंजी आणि विलास सौंजी अशी या पुजारी पितापुत्रांची नावं आहेत. या दोघांना नोटीस बजावण्यात आली असून, दोन दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या मसलगा मध्यम प्रकल्पात ९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाल्यानं प्रकल्पाचे दोन दरवाजे काल सकाळी उघडण्यात आले. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अनाळा साठवण तलावात ३९ टक्के पाणीसाठा झाला असून लाभक्षेत्रातली २ हजार ६०० हेक्तर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

पैठणच्या जायकवाडी धरणात आज सकाळी साडे सात हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती. धरणाचा पाणी साठा ९८ पूर्णांक ६२ टक्के एवढा आहे.

****

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज इंदूर इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं पहिले दोन सामने जिंकत मालिकेत दोन शून्य नं आघाडी घेतली आहे.

****

तुर्कमेनिस्तान मधल्या अशगाबात इथं सुरु असलेल्या पाचव्या आशियाई इनडोअर आणि मार्शल आर्ट्स खेळांमध्ये भारताला आणखी चार पदकं मिळाली आहेत. पुरुषांच्या १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत साजन प्रकाशला रौप्य पदक मिळालं. महिलांच्या बेल्ट रेसलिंग प्रकारात दिव्या शिलवंत आणि प्रतीक्षा परहार यांना, तर नागालँडचा कुस्तीपटू केडुओविली झुमू याला कझाक कुरेश स्टाईल बेल्ट कुस्तीमध्ये ९० किलो गटात कांस्य पदक मिळालं. या खेळांमध्ये भारत आतापर्यंत पाच सुवर्ण, सात रौप्य आणि सात कांस्य पदकांसह अकराव्या स्थानी आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...