आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
३० सप्टेंबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
विजयादशमी अर्थात दसरा आज
सर्वत्र साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू
यांनी जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा हे सत्प्रवृत्तींचा दुष्प्रवृत्तीवरच्या
विजयाचं प्रतिक असून, आजही या मूल्यांचं सर्वाधिक महत्व आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या
शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नागपूर इथं दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा पार पडला. जगाला
आत्ता भारताच्या शक्तीचा परिचय होत असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यावेळी म्हणाले.
गोरक्षा, चीन, पाकिस्तान, रोहिंग्या, आदी मुद्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं.
****
धम्मचक्र प्रवर्तन
दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्त आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीनं नागपूर इथं दीक्षा भूमीवर मुख्य सोहळा
आयोजित करण्यात आला आहे.
औरंगाबाद लेणीच्या पायथ्याशी असलेल्या विपश्यना केंद्रात भंते विशुद्धानंद बोधी
यांनी उपासकांना धम्मदेसना दिली. यावेळी शहर आणि परिसरातून उपासक उपस्थित आहेत. संध्याकाळपर्यंत
उपासक मोठ्या संख्येनं यठिकाणी दाखल होतात.
****
राज्यातल्या सर्व विधानसभा मतदार संघांच्या छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष
पुनरीक्षण कार्यक्रम तीन ऑक्टोबर २०१७ ते पाच जानेवारी २०१८ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. राज्याच्या
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. एक जानेवारी २०१८
रोजी १८
वर्षापेक्षा
जास्त वय असलेली व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र आहे.
****
ग्रामपंचायतींना ताकद देणाऱ्या ७३ व्या आणि ७४ व्या घटना दुरूस्तीला यंदा २५
वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये एक ऑक्टोबरला
होणाऱ्या महिला सभांमध्ये गर्भलिंग निदानविरोधी शपथ घेतली जाणार आहे. राज्य महिला आयोगाच्या
अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली.
No comments:
Post a Comment