Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 September 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
योग आणि विपश्यना कोणत्याही
धर्माशी संबंधित नसून, आयुष्य जगण्याचा एक मार्ग असल्याचं, प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांनी केलं आहे. आज रामटेक इथं विपश्यना केंद्राचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी
सकाळी दीक्षाभूमी इथं भेट देऊन, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन
केलं. पवित्र दीक्षाभूमी संपूर्ण जगाला त्याग, शांती आणि मानवतेकडे जाण्यास प्रेरित
करते, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
****
थकीत कर्ज ही समस्या चिंतेचा
विषय असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं भारतीय
बँक संघटनेच्या ७०व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बोलत होते. बँकिंग व्यवस्था सुदृढ
करण्यासाठी सरकार त्वरेनं काम करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. आधार क्रमांकाला
बँक खात्याशी जोडण्याच्या बँकांच्या निर्णयाचं जेटली यांनी स्वागत केलं.
****
खासगी संवर्गात नोंदणी असलेल्या
मात्र अनधिकृतपणे सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा तसंच टॅक्सींना अधिकृत करण्याचा
महत्त्वपूर्ण निर्णय, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केला आहे. ते आज औरंगाबाद
इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. यामुळे या क्षेत्रात चालणाऱ्या गैरव्यवहारांना आळा
बसेल, तसंच महसुलातही वाढ होणार असल्याचं रावते यांनी सांगितलं. राज्यात ऑटोरिक्षा
आणि टॅक्सी परवान्यांच्या संख्येवरचे निर्बंध हटवण्याचा निर्णयही घेण्यात आला असून,
मागेल त्याला परवाना हे धोरण राबवणार असल्याचंही रावते यांनी यावेळी सांगितलं.
****
मजेठिया वेतन आयोगाच्या शिफारशी
सर्व वृत्तपत्र आस्थापनांनी लागू कराव्यात, असं आवाहन राज्य कामगार आयुक्तांनी केलं
आहे. या आयोगाच्या शिफारशी वृत्तपत्र आस्थापनांनी आपल्या पत्रकार तसंच पत्रकारेत्तर
कर्मचाऱ्यांना लागू कराव्यात अशी अधिसूचना केंद्र शासनानं काढली होती, या अनुषंगानं
दाखल अवमान याचिका सर्वोच्च न्यायालयानं निकाली काढल्या असल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
राज्यातले अंगणवाडी कर्मचारी
येत्या २७ सप्टेंबरला मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या
कृती समितीची आज नाशिक इथं बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या
मानधनवाढीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
दरम्यान, या मोर्चाला शिवसेनेनं
पाठिंबा दिला आहे. आझाद मैदानावर उपस्थित राहणार असल्याचं, पक्षप्रमुख उद्घव ठाकरे
यांनी सांगितलं आहे.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र
मुक्त विद्यापीठानं सैन्य दलातल्या जवानांसाठी विशेष दूरशिक्षण शिक्षणक्रम विकसित केला
असून, संरक्षण मंत्रालय आणि मुक्त विद्यापीठ यांच्यात नवी दिल्ली इथं याबाबत सामंजस्य
करार करण्यात आला. लष्करी जवानांना निवृत्तीनंतरही स्वाभिमानानं जगता यावं, या उद्देशानं
त्यांच्यासाठी हा पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणातून
विसर्ग केल्यानं जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातले जोगलादेवी आणि मंगरुळ हे
बंधारे पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. दोन्ही बंधाऱ्यांचे प्रत्येकी दोन दरवाजे आज सकाळी
उघडण्यात आले असून, यामधून दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीत सोडण्यात
येत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
अंपगत्व रोखण्यासाठी जनजागृती
कार्यशाळेला आजपासून लातूर इथं सुरुवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेचं उद्घाटन
खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते झालं. शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांची
आवश्यक तपासणी करुन योग्य प्रकारे उपचार केले, तर अपंगत्व रोखता येऊ शकते, याबद्दल
जनजागृतीसाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत भारताच्या एच एस प्रणयचा चीनच्या शी युकीनं १५-२१,
१४-२१ असा पराभव केला. के श्रीकांतचाही उपान्त्यपूर्व फेरीत पराभव झाल्याचं तो या स्पर्धेतून
बाहेर झाला. पी व्ही सिंधू आणि सायना नेहवालचाही महिला एकेरीत पराभव झाल्यानं भारताचं
या स्पर्धेतलं महिला एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
जालना इथले व्यावासायिक नितीन
कटारिया आणि गोविंद गगराणी यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी, तसंच हा खटला जलदगती
न्यायालयात चालवावा या मागणीसाठी आज जालना इथं मूक मोर्चा काढण्यात आला. गुरु गणेश
भवनपासून गांधीचमन चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात व्यापारी मोठ्या संख्येनं
सहभागी झाले.
****
डॉक्टरांवर
होणाऱ्यां हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय वैद्यक परिषदेच्या वतीनं येत्या दोन ऑक्टोबरला
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. परिषदेचे सचिव संतोष
रंजलकर यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment