Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 22 SEP. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०१७
सकाळी ६.५० मि.
****
** विधान परिषद सदस्यत्वाचा
राजीनामा देऊन, ज्येष्ठ नेते नारायण राणे
यांची कॉंग्रेस पक्षालाही सोडचिठ्ठी;
राज्याचा दौरा करून पुढील राजकीय भूमिका ठरवणार
** जलसाठा वाढल्यामुळे पैठणच्या नाथसागर जलाशयाचे १८ दरवाजे उघडले,
९४३२ घनफूट प्रतिसेकंद पाणी गोदावरी नदीच्या पात्रात
** राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या
महागाई भत्त्यात चार टक्के वाढ
** शारदीय नवरात्र महोत्सवाला देशभरात सर्वत्र उत्साहात प्रारंभ
आणि
** दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर
विजय तर जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पराभवामुळे पी व्ही सिंधू आणि सानिया नेहवाल स्पर्धेबाहेर
****
ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काल कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
राज्याचा दौरा करुन आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं
राणे यांनी सांगितलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं
जाहीर सभेत काल ते बोलत होते. राणे यांनी बारा वर्षांपूर्वी
जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता, तेव्हा पक्षानं त्यांना राज्याचे मुख्यमंत्री
बनवणार असल्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण न केल्यामुळे आपण राजीनामा देत
असल्याचं राणे यांनी सांगितलं. आपल्याला चार वेळा
मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन देऊन काँग्रेसनं ते पाळलं नसल्याचा आरोपही त्यांनी
यावेळी केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज
चव्हाण यांच्यावर तसंच शिवसेनेवरही त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. भारतीय
जनता पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं राणे यांनी
वार्ताहरांशी बोलतांना स्पष्ट केलं. मी काँग्रेस सोडल्यानंतर २५ नगरसेवकांनी
लगेच पक्ष सोडला असून यानंतर अनेक जिल्ह्यातून अनेक जण काँग्रेस पक्ष सोडतील असं राणे
म्हणाले. त्यांचे पुत्र निलेश राणे हे देखील क़ाँग्रेस पक्षातून बाहेर पडल्याचं
राणे यांनी सांगितलं. राणे १९९९ साली शिवसेना पक्षामध्ये असतांना राज्याचे मुख्यमंत्री
होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या नाथसागर
जलाशयातला पाणीसाठा ९६ टक्क्यावर गेल्यामुळे काल मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास
धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले. धरणातून ९४३२ घनफूट प्रतिसेकंद पाणी गोदावरी नदीच्या
पात्रात सोडण्यात आलं. काल दुपारनंतर धरणात येणाऱ्या पाणीसाठ्यात एक लाख घनफूट प्रतिसेकंद
पर्यंत वाढ झाल्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यरात्रीनंतर मात्र ही
आवक मंदावली, सध्या ही आवक ४४ हजार घनफूट प्रतिसेकंद असल्याचं अधिकृत सूत्रानं सांगितलं.
धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे. दरवाजे
उघडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना दवंडी पिटून तसंच सामाजिक प्रसार माध्यमांवरून सूचना
देण्यात आली. नदी काठावर पैठण ते नांदेड दरम्यान २५४ गावं आहेत. या सर्व गावांमध्ये
सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात काल
दुपारपासून मध्यमस्वरूपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे
नदी-नाले ओसंडून वाहत असून अनेक भागात पिकांमध्ये पाणी साचलं
आहे. जालना शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या घाणेवाडी जलाशयातील
जलसाठा १६ फुटांपर्यंत वाढला असून पाण्याची आवक सुरुच आहे. शहरातील
मोती तलावाच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. औरंगाबाद शहरातही
काल दिवसभरापासून पावसाची उघडझाप सुरु आहे.
पाणी पातळी वाढल्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाचे सहा वक्र
दरवाजे काल दुपारी एक वाजता आणखी एक फुट वर उचलण्यात आले. यामुळे नदी पात्रात १८ हजार सातशे चौसष्ठ
घनफूट प्रति सेकंद इतक्या पाण्याचा विसर्ग होणार आहे.
परभणी
शहरासह जिल्ह्यात काल दुपारपासून दमदार पाऊस झाला. सेलू परिसरात अर्धा तास जोरदार सरी
कोसळल्या.
****
राज्य
शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं
घेतला. यामुळे आता हा महागाई भत्ता १३२ टक्क्यांवरुन १३६ टक्के झाला आहे. तसंच असुधारीत
वेतनश्रेणीत वेतन घेणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही राज्य शासनानं
आठ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे हा महागाई भत्ता २५६ टक्क्यांवरुन २६४ टक्के
झाला आहे.
एक
जानेवारी २०१७ पासून या दोन्ही श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात
आली असून १ ऑगस्ट २०१७ पासून वाढीव महागाई भत्ता रोखीनं देण्यात येणार आहे. तर १ जानेवारी
२०१७ ते ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्यासंदर्भात वेगळा आदेश काढण्यात
येणार असल्याचं यासंदर्भातल्या शासन निर्णयात म्हटलं आहे.
****
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल आपल्या नव्या संघटनेची घोषणा केली.
‘रयत क्रांती संघटना’ असं या संघटनेचं नाव आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी ही संघटना कार्यरत राहील, अशी ग्वाही खोत यांनी काल कोल्हापूर
इथं झालेल्या शेतकरी मेळाव्यात दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते
खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर खोत यांना संघटनेतून बाहेर काढण्यात
आलं होतं.
***
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद आज नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. आपल्या दिवसभराच्या दौऱ्यात ते दीक्षाभूमी
इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर ते ड्रॅगन पॅलेस कामटी
इथं विपश्यना केंद्राचं उद्घाटन करतील, रामटेक इथल्या जैन मंदिरालाही ते भेट देणार
आहेत. तसंच त्यांच्या हस्ते कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृहाचं लोकार्पण करण्यात
येणार आहे. पदभार स्विकारल्यानंतर त्यांची ही राज्याला पहिलीच भेट असणार आहे.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
शारदीय नवरात्र महोत्सवाला कालपासून
देशभरात सर्वत्र उत्साहात प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या
निमित्तानं देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातल्या देवीची साडे तीन पीठं समजल्या
जाणाऱ्या श्री क्षेत्र माहूर, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र कोल्हापूर आणि
अर्ध पीठ असलेल्या वणी इथं घटस्थापना करण्यात आली. क्षेत्र तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी
मातेची जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. अधिक माहिती
देत आहेत आमचे वार्ताहर…
महाराष्ट्राची कुलस्वामिनी
देवीच्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपूर्णपीठ तुळजापूर इथल्या श्री
तुळजापूर भवानी मातेच्या मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष तथा उस्मानाबादचे जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विधीवत घटस्थापनेचा विधी संपन्न झाला. संबळाच्या कडकडाटात
आई राजा उदोउदोच्या गजरात तुतारीच्या निनादात घटस्थापना झाली. यावर्षी शारदीय नवरोत्रोत्सवातील
सर्व व्यवस्था ई टेंडरींग पध्दतीनं दर्शन पास संगणकीकृत तसंच पोलिस बंदोबस्त ऑनलाईन,
सी सी टिव्ही यंत्रणेचा वापर यामुळे सर्व नवरोत्रोत्सव डिजीटल पारदर्शक पध्दतीनं पार
पडत आहे.
वणी इथं वैदिक मंत्रोच्चारात सप्तश्रृंगी देवीच्या अलंकारांची काल महापूजा करण्यात आली. नवरात्राच्या निमित्तानं देवीचं मंदिर २४ तास खुलं राहणार असून या परिसरात
संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णय देवस्थानच्या वतीनं घेण्यात आला आहे. यावर्षीपासून प्रथमच बोकड बळी प्रथेवर बंदी
घालण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातल्या कर्णपुरा इथल्या मंदिरातही
शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. अंबाजोगाई इथल्या नवरात्रौत्सवासही
परंपरेनुसार कालपासून प्रारंभ झाला आहे. परभणी
जिल्ह्यात विविध ठिकाणच्या माता मंदिरांतून पारंपारिक पद्धतीनं घटस्थापना करून नवरात्र
महोत्सवाला सुरूवात झाली. सर्व ठिकाणी दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे.
****
राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं
पुकारलेला संप बेकायदेशीर असून संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये; तसंच योग्य मार्गानं
आपल्या मागण्या मांडाव्यात, असं आवाहन राज्य शासनानं केलं आहे. राज्यातल्या सर्व चतुर्थश्रेणी
कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेण्याचं आवाहन सामान्य प्रशासन विभागानं केलं आहे.
****
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ३१ ट्रकवर नांदेड पोलिसांनी
कारवाई केली असून पाच कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर एकूण ९३ ट्रक चालक-मालकांवर
गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिलोलीत काल पहाटे चारच्या दरम्यान नांदेडच्या विशेष
पोलीस पथकानं मांजरा नदी पात्रात धाड टाकून ही कारवाई केली.
****
कोलकाताच्या
इडन गार्डन मैदानावर काल झालेला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं ५० धावांनी जिंकला. अजिंक्य रहाणे आणि विराट
कोहली यांच्या अर्धशतकानंतर भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २५२ धावांचं लक्ष्य
ठेवलं. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त २०२ धावांच करू
शकला. यात भारताच्या कुलदीप यादवनं सलग तीन गडी बाद करत हॅटट्रकी नोंदवली. एक.दिवसीय क्रिकेट सामन्यात हॅटट्रीक नोंदवणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
****
No comments:
Post a Comment