आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२५ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त सर्वांसाठी वीज
या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत ट्रान्सफॉर्मर, मीटर, वीजेच्या तारांसारख्या
उपकरणांवर अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान तेल आणि प्राकृतिक गॅस निगम
- ओ एन जी सीच्या नवीन कार्यालयाचं औपचारिक उद्घाटनही करणार आहेत. या कार्यलयाचं नाव
राजीव गांधी ऊर्जा भवन बदलून पंडिय दिनदयाळ ऊर्जा भवन करण्यात आलं आहे.
****
जेष्ठ साहित्यिक
आणि पत्रकार अरुण साधू यांचं आज पहाटे मुंबईतल्या सायन रूग्णालयात निधन झालं. ते ७६
वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थामुळं काल सकाळी त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानं
रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
भूषवलेल्या साधू यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून राजकीय विषय अत्यंत कुशलतेने हाताळले.
****
राज्यातल्या
भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात येत्या एक ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन
करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत
पाटील यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं ग्रामीण आणि शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत
होते. भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस हाच पक्ष पर्याय ठरू शकतो असंही त्यांनी
यावेळी नमूद केलं.
****
राज्य सरकार
आणि केंद्र सरकारनं अनेक जनकल्याणकारी योजना राबवल्या असून त्या जनतेपर्यंत पोहचवण्याची
गरज असल्याचं प्रतिपादन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.
ते काल परतूर इथं बोलत होते. भारतीय जनता पक्षाचा प्रचार तळागाळातल्या लोकांपर्यंत
पोहोचवण्यासाठी विस्तारकांनी काम वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
मूग आणि उडीद
पीक कापणीची आकडेवारी अद्ययावत नसल्याने शेतकऱ्यांना पीकविमा देण्याच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर
यांनी सांगितलं. राज्यस्तरीय कृषी आढावा बैठकीत ते काल मुंबई इथं बोलत होते. यासाठी
कृषी अधिकाऱ्यांनी मूग आणि उडीद पीक कापणीची आकडेवारी तात्काळ कळवण्याचं आवाहन त्यांनी
यावेळी केलं.
****
देशात नवीन
राज्य स्थापन करण्याच्या मागणी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणारी एक श्वेतपत्रिका
केंद्र सरकारनं काढावी अशी मागणी राष्ट्रीय नवराज्य महासंघाचे अध्यक्ष श्रीहरी अणे
यांनी गुवाहाटी इथं पत्रकारांशी बोलताना केली आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी
श्वेतपत्रिकेची आवश्यकता असून यातून एक राष्ट्रीय धोरण तयार केलं जाऊ शकतं असं अणे
म्हणाले.
****
No comments:
Post a Comment