आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१७ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम
दिन आज साजरा होत आहे. औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानातल्या मुक्तीसंग्राम स्मृतिस्तंभाजवळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. विधानसभा
अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, राज्य महिला
आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, वक्फ मंडळाचे अध्यक्ष एम एम शेख, आदी मान्यवर यावेळी
उपस्थित होते. ध्वजारोहणापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुक्ती संग्राम स्मृती स्तंभाला पुष्पचक्र
अर्पण करून अभिवादन केलं. पोलीस दलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना
देण्यात आली. उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा
दिल्या.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यात केवाडिया इथं उभारण्यात आलेल्या
सरदार सरोवर धरणाचं राष्ट्रार्पण केलं. या धरणाचा गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश
आणि राजस्थानच्या नागरिकांना लाभ मिळणार आहे. केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी,
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, पंतप्रधानांचा
जन्मदिवस आज भारतीय जनता पक्ष सेवा दिवस म्हणून साजरा करणार आहे. यानिमित्त देशभरात
आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं आहे.
****
शेतकऱ्यांना
कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना, आधार कार्ड नसले तरी नोंदणी करता येणार आहे. नोंदणी
नंतर आधार क्रमांक देण्याची सुविधा शासनानं दिली असल्याचं नांदेडच्या जिल्हा उपनिबंधक
कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण दोन लाख
५९ हजार २५९ शेतकरी कुटूंबाचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या
जिंतूर इथल्या स्वस्त धान्य दुकानाचा काळ्या बाजारात जाणारा दहा टन तांदूळ जिंतूर पोलिसांनी
जप्त केला आहे. काल पहाटे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तीन संशयिताविरूद्ध जिंतूर
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद-
धुळे राष्ट्रीय महामार्गावर औट्रम घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे या मार्गावरची
सर्व वाहनांची वाहतूक येत्या सात ऑक्टोबर पर्यंत गौताळामार्गे वळवण्यात आली आहे. औरंगाबादकडून
धुळ्याकडे येणारी आणि जाणारी सर्व वाहनं गौताळा, नागदघाट, चाळीसगावमार्गे जातील.
****
एअर मार्शल पद्मविभुषण
अर्जन सिंग यांचं काल रात्री नवी दिल्लीत निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. काल सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानं, त्यांच्यावर सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचार सुरु होते.
****
No comments:
Post a Comment