Monday, 23 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 23.10.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 OCT. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ सकाळी .५० मि.

****

** आर्थिक सुधारणांशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचं काम सुरूच राहणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

**  शेतकऱ्यांना कीटकनाशकातून विषबाधा झाल्याप्रकरणी जबाबदार असलेल्यांविरूद्ध कडक कारवाई करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ांचा पुनरूच्चार

** ग्राहकांना आकर्षक व्याज आणि परताव्याचं प्रलोभन दाखवणाऱ्या जाहिरातींविरोधात कारवाई करण्याच्या राज्य सरकारच्या पोलिसांना सूचना

आणि

** आशिया चषक हॉकी स्पर्धेचं भारताला विजेतेपद तर डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा किदांबी श्रीकांत पुरूष एकेरीत अजिंक्य; मात्र एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा पराभव

****

आर्थिक सुधारणांशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचं काम सुरूच राहणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरात इथं एका योजनेच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत ते काल बोलत होते. आर्थिक सुधारणांसह देशात वित्तीय स्थिरता राखली जाणार असल्याचं ते म्हणाले. आपलं सरकार गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. व्यापाऱ्यांनी जीएसटी अंतर्गत नोंदणी केल्यास आयकर विभागाद्वारे त्यांच्या जुन्या खात्यांची चौकशी केली जाणार नाही असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.

****

केंद्र आणि राज्यातल्या अनेक करांना मिळून एक कर प्रणाली असलेल्या वस्तू आणि सेवा कर - जीएसटीला स्थिर होण्यासाठी कमीत कमी एका वर्षाचा कालावधी लागेल, असं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब नमूद केली. जीएसटीमुळे लघु आणि मध्यम उद्योग तसंच सामान्य जनतेवर कराचा बोजा पडत असेल, तर कराचा दर कमी करण्यासाठी कर आकारणीची पुनर्रचना आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

****

सरकारनं सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना, ५० हजार रूपयांपेक्षा अधिक रकमेचा रोख व्यवहार करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी अनिवार्य केली आहे. पत्त्याच्या पुराव्याच्या खोट्या प्रती वापरण्यावर आळा बसावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ओळखपत्रासह आधार क्रमांकाचीही गरज लागणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागानं ही अधिसूचना जारी केली.

****

शेतकऱ्यांना कीटकनाशकातून विषबाधा झाल्याप्रकरणी जबाबदार असलेले अनधिकृत बियाणे, कीटकनाशक विक्रेत्यांवर यंत्रणेनं कडक कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यवतमाळ इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.

यावेळी बोलतांना ते म्हणाले....

ज्या कंपन्यांनी लायसेन्स नसतांना किंवा त्यांच्या लायसेन्समध्ये या औषधांना परवानगी नसतांना ज्यांनी त्याची विक्री केली आहे. त्यांच्यावर फौजदारी करावाई करण्याचे आदेश दिले आहेत.लायसेन्स त्यांच्याकडे नसतांना देखील ज्या कंपन्यांनी त्यांना पुरवठा केला त्या कंपन्यांनावर देखील गुन्हे दाखल करण्याचे याठिकाणी आदेश आम्ही दिलेले आहेत. त्यासोबत मोठ्या प्रमाणात शेतकरी किंवा शेतमजुर जे फवारणीला जातात तर फवारणीला जातांना त्यांनी जी काही काळजी घेतली पाहिजे जे काही प्रोटेक्टीव्ह गीअर्स वापरले पाहिजेत. त्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात आला आहे.कंपन्यांनी देखील सांगितलं आहे की त्याचा पुरवठा जो आहे तो केला पाहिजे. त्यामुळे राज्य सरकारनं अत्यंत सिरीयसली कारवाई केलेली आहे.

   कीटकनाशक फवारणीतून विषबाधेनं शेतकऱ्यांचे झालेले मृत्यू, ही अतिशय गंभीर बाब असून, नफा कमावण्यासाठी शेतकरी, शेतमजरांचे जीव घेणाऱ्यांना राज्य शासन योग्य धडा शिकवेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

****

राज्यातल्या विविध लहान- मोठ्या वित्तीय संस्थांचा कारभार आणि त्यांच्याकडून ग्राहकांना दाखवण्यात येणाऱ्या आकर्षक व्याज, परतावाबाबतच्या प्रलोभनात्मक जाहिरातींविरोधात कारवाई करण्याच्या सूचना गृह विभागानं पोलिसांना दिल्या आहेत.

राज्यात विविध ठेवीदार कंपन्यांच्या फसवणुकीपासून नागरिकांचं रक्षण व्हावं, यासाठी या कंपन्यांविरोधात कोणतीही तक्रार नसतांनादेखील कारवाई करण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ४(१)(दोन) अन्वये कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आलेले आहेत.

****

कर्जमाफीची रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. बँकांना दिवाळीच्या सुट्या असल्यामुळं कर्जमाफीची रक्कम बॅंक खात्यात जमा व्हायला वेळ लागल्याचं त्यांनी सांगितलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेत आगामी अडीच वर्षांसाठी शिवसेना-भारतीय जनता पार्टी महायुतीचाच उमेदवार महापौर असेल आणि युती धर्माप्रमाणे अडीच वर्ष करार पाळला जाईल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी वार्ताहरांशी बोलतांना दिली. महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांच्या नावाची त्यांनी यावेळी घोषणा केली.

****

बौध्दांची स्वतंत्र धार्मिक ओळख निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षा भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष ड़ॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. लातूर इथं आयोजित अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेत ते काल बोलत होते. परिषदेचं उद्घाटन झारखंड राज्यातले भिक्खु डॉ के संघरक्षित महाथेरो यांच्या हस्ते झालं. परिषदेपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडक चौक ते आंबेडकर पार्क अशी धम्म फेरी काढण्यात आली.

****

ढाका इथं आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल भारतानं मलेशियावर २-१ अशी मात करत आशिया चषक जिंकला. रमणदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आशिया चषक हॉकीतलं भारताचं हे तिसरं विजेतेपद आहे. काल झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघानं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. भारतानं दोन्ही गोल हे पूर्वाधात केले तर उत्तरार्धात मलेशियानं एक गोल करून आघाडी कमी केली.

****

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं पुरूष एकेरीचं अजिंक्यपद भारताच्या किदांबी श्रीकांतनं जिंकलं आहे. काल रात्री ओदेंसेमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात श्रीकांतनं कोरियाच्या ली युन इलचा २५ मिनटांमध्ये २१-१०, २१-५ असा पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल श्रीकांतचं अभिनंदन केलं आहे.

****

न्यूझीलंडनं पहिल्या एकदिवसीय आंतराराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात काल भारताचा सहा गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या १२१ धावांच्या जोरावर २८० धावा केल्या. न्यूझीलंडनं एक षटक शिल्लक असतानाचं विजयासाठीचं लक्ष्य पार केलं. या विजयाबरोबरच न्यूझीलंडनं या मालिकेत १-० नं आघाडी घेतली आहे. दोन्ही संघादरम्यान दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी पुण्यात खेळला जाणार आहे.

****

शासकीय योजना राबवण्यासाठी सरपंचांनी अभ्यास  करणं गरजेचं असल्याचं मत खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त  केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार भारतीय जनता पक्षातर्फे  काल औरंगाबाद इथं  करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. सरपंचांनी सरपंचकी समजून घेवून कर्तव्यं आणि अधिकार जाणून घ्यावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी जिल्ह्यातल्या ११७ सरपंच आणि ७५४ ग्रामपंचायत ससस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते राम मुखर्जी यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. अनियंत्रित रक्तदाबाच्या त्रासानं ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते, काल पहाटे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हम हिंदुस्थानी, लीडर, एक बार मुस्कुरा दो, राजा की आयेगी बारात, या सह अनेक हिंदी तसंच बंगाली चित्रपटांचं राम मुखर्जी यांनी दिग्दर्शन केलं होतं. अभिनेत्री राणी मुखर्जी हिचे ते वडील होत.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्याचे माजी आमदार शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते संपतराव मारुती उर्फ एस. एम. पाटील यांचं काल पुण्यात निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. स्वातंत्र्य संग्रामात सक्रीय सहभाग घेतलेले पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, एस टी महामंडळाचे संचालक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, आदी पदांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. १९६७ ते ७२ दरम्यान त्यांनी माढा मतदार संघाचं विधानसभेत प्रतिनिधीत्व केलं. पाटील यांच्या पार्थिव देहावर माढा तालुक्यात वरवडे इथं काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

****




No comments: