Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 OCT. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबवण्यासाठी राज्यातलं सिंचनक्षेत्र वाढवण्याची आवश्यकता - केंद्रीय परिवहन आणि जलसंपदा
मंत्री नितीन गडकरी
** राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे दिलदार विरोधक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत
** एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा
करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना
आणि
** न्यूझीलंडविरुद्धच्या
ट्वेण्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
****
शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबवण्यासाठी राज्यातलं सिंचनक्षेत्र वाढवण्याची आवश्यकता केंद्रीय परिवहन तसंच जलसंपदा
मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथं वारंगा फाटा ते महागाव या जवळपास
६७ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरण कामासह विविध विकास कामांचं भूमिपूजन गडकरी
यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात
सध्या केवळ १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली
येतं, हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत
नेण्याचा प्रयत्न असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
केंद्र सरकारनं मराठवाडा विभागातल्या रस्त्यांच्या कामांसाठी
४९ हजार ८५४ कोटी ८९ लाख रूपयांचे पॅकेज दिले आहे, त्यापैकी ८ हजार, ४७४ कोटी ६० लाख
रुपये नांदेड जिल्ह्यातल्या रस्ते रुंदीकरण आणि दुरूस्ती कामांसाठी देण्यात आल्याचं
त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या चार मार्गाबरोबरच सारखणी-मांडवी-आदिलाबाद या ४५ किमी अंतराच्या
रस्त्याचं कामही लवकरच
सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली.
****
माजी
केंद्रीय कृषी मंत्री
तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे दिलदार विरोधक असल्याचं,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पवार यांचा काल अमरावती इथं जाहीर नागरी
सत्कार करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयातही
पवार यांनी राज्य सरकारला योग्य सल्ला देण्याचं काम केलं, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी
नमूद केलं.
दरम्यान, या सत्कार समारंभापूर्वी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी
बोलताना पवार यांनी राज्य सरकारनं
केलेली कर्जमाफी नियोजन शून्य पद्धतीनं झाली असल्याची टीका केली. ज्या शेतकऱ्यांनी कर्जच घेतलेलं नाही, अशांना कर्जमुक्तीची पत्रे देण्यात आल्याचं पवार म्हणाले. सरकारनं पंधरा दिवसांत जर या त्रुटीत
सुधारणा केली नाही तर, पुढची दिशा
ठरवावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.
****
२०१८ मध्ये राज्य सरकारनं १३ कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट
निश्चित केलं असून त्यापैकी साडे अकरा कोटी वृक्षांची लागवड वन विभागामार्फत केली जाणार
आहे. उर्वरीत अडीच कोटी वृक्षांची लागवड ही इतर विभाग करणार आहेत. काल या विभागांना
जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आलं असून त्याबाबतचे आदेशही जारी केले आहेत.
यामध्ये मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात १३ लाख चार हजार ८६५, जालना जिल्ह्यात १७ लाख २२ हजार २४०, परभणी जिल्ह्यात
१२ लाख ४७ हजार ७००, हिंगोली जिल्ह्यात ८ लाख ३३ हजार ४००, नांदेड जिल्ह्यात १८ लाख
१६ हजार ५७०, लातूर जिल्ह्यात १० लाख ४६ हजार ४९०, उस्मानाबाद जिल्ह्यात ७ लाख ७९ हजार
९८० आणि बीड जिल्ह्यात चार लाख ९६ हजार ९६० इतकी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष
लागवडीच्या या उद्दिष्ट निश्चितीमध्ये अपरिहार्य स्थिती वगळता कोणताही बदल केला जाणार
नसल्याचं या आदेशात म्हटलं आहे.
****
राज्य परीवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा
करण्याच्या बाबतीत उच्च न्यायालयानं दिलेल्या सुचनेनुसार काल राज्य सरकारनं उच्चाधिकार
समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये परिवहन विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे
प्रधान सचिव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, परिवहन आयुक्त आणि
कामगार आयुक्त यांचा समावेश आहे. याबाबतचा शासन निर्णयही काल जारी करण्यात आला.
उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार ही समिती १५ नोव्हेंबर
२०१७ पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतन सुधारणेबाबत विचार करेल. तसंच २२ डिसेंबर
२०१७ पर्यंत आपला अंतिम निष्कर्ष सादर करेल. या समितीच्या कार्यकक्षेत सध्याच्या वेतनश्रेणीचा
अभ्यास करुन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते निश्चित करण्यासाठी शिफारस
करण्यासह अन्य बाबींचा विचार करण्यात येणार आहे.
****
बडोदा इथं होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या
अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध लेखक राजन खान, रवींद्र गुर्जर, रवींद्र शोभणे, किशोर सानप
आणि लक्ष्मीकांत देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नामांकन मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या
दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नसल्याचं निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट मकरंद
अग्निहोत्री यांनी सांगितलं.
****
चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणणं
बंधनकारक करण्यासंदर्भात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिलेल्या निर्णयाचा पुर्नविचार करण्याचे संकेत काल सर्वोच्च न्यायालयानं दिले. न्यायालयानं आपल्या आदेशामधला shall शब्द काढून
त्याऐवजी may शब्द उपयोगात आणण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे चित्रपटगृहात राष्ट्रगीत
म्हणणं बंधनकारक राहणार नाही, मात्र यासंदर्भात केंद्र सरकारनं निर्णय घ्यायचा आहे,
असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
वतीनं काल बीड
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात माजी मंत्री प्रकाश सोळंके
यांच्यासह अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते
सहभागी झाले होते. सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला
हमी भाव, परतीच्या पावसाने झालेल्या
नुकसानाची तत्काळ भरपाई देण्यात यावी, भारनियमन
बंद करावं, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. एका महिन्यात जर सरकारने या मागण्या
मान्य केल्या नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला.
****
सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावीत,
या मागणीसाठी नांदेड इथं शिवसेनेच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.
जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेनेचे
पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पक्षाच्या वतीनं आपल्या
मागण्यांचं निवेदन निवासी जिल्हाधिकारी जयराज कारभारी यांना सादर करण्यात आलं.
****
शेगाव ते पंढरपूर या पालखी मार्गाची गुणवत्ता
आणि दर्जा उत्तम राहील याची दक्षता घेऊन हा मार्ग जलदगतीने पूर्ण करावा, असे निर्देश
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात
नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दोन हजार कोटी रुपये खर्चून
हा पालखी मार्ग तयार करण्यात येणार आहे. या रस्त्याची कामं आता
प्रत्यक्षात सुरू झाली असून, महामार्गामुळे
सहा लाख वारकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या मार्गावर
वारकऱ्यांना पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहं,
धर्मशाळा आदी भौतिक सुविधा उपलब्ध करून
देण्याचा मानस असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.
****
बीड जिल्हा परिषदेतल्या राष्ट्रवादी काँगेसच्या सहा सदस्यांच्या
अपात्रता आदेशाला ग्रामविकास विभागानं अंतरिम
स्थगिती दिली आहे. काल या स्थगितीबाबत विभागाचे अवर सचिव रा.म. गेंगजे यांनी विभागीय आयुक्त आणि बीडचे जिल्हाधिकारी
यांना पत्र पाठवलं. जिल्हा परिषद पधाधिकारी निवडीच्या वेळी पक्षादेश डावलल्याचा ठपका
ठेवून या सहा सदस्यांना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी अपात्र ठरवलं होतं.
****
पिकांवर कीटकनाशकं फवारतांना यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचा
मृत्यु झाल्याच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी या उद्देश्यानं औरंगाबाद
जिल्ह्यात येत्या १ नोव्हेंबर रोजी कृषी विभागामार्फत सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष
ग्रामसभा घेऊन मार्गदर्शन केलं जाणार आहे.
****
न्यूझीलंडविरुद्धच्या
ट्वेण्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल मुंबईत वार्ताहर परिषदेत संघाची घोषणा केली. या
संघात मुंबईचा फलंदाज
श्रेयस अय्यर आणि हैदराबादचा उदयोन्मुख गोलंदाज मोहम्मद सिराज याचा समावेश करण्यात
आला आहे. या मालिकेतल्या पहिल्या सामन्यानंतर गोलंदाज आशिष नेहरा निवृत्त होत
असल्यानं, त्याचा फक्त पहिल्या सामन्यासाठीच संघात समावेत करण्यात आला
आहे.
श्रीलंकेसोबतच्या आगामी कसोटी मालिकेतल्या तीन पैकी पहिल्या
दोन सामन्यांसाठीही संघाची घोषणा यावेळी करण्यात आली.
****
शिवसेना उपनेते
खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते काल औरंगाबाद शहरातल्या भवानीनगर वार्डात
सिमेंट रस्त्यांच्या विकास कामांचं भूमिपूजन
करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment