Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
येत्या पाच वर्षात देशात पाच लाख कोटी रुपये खर्चाचे त्र्याऐंशी हजार
सहाशे सत्त्याहत्तर किलोमीटर्स लांबीचे रस्ते बांधण्याच्या योजनेला केंद्र सरकारनं
मंजूरी दिली आहे. महत्त्वाकांक्षी ‘भारतमाला‘ योजनेचा
यामध्ये समावेश आहे. देशाच्या सीमावर्ती भागातली संपर्क व्यवस्था सुधारणं, हा
सागरमाला प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पातून चौदा
कोटी वीस लाख तासांचा रोजगार निर्माण होणार आहे.
****
एम.वेंकय्या नायडू
उपराष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानंतर राज्यसभेत रिक्त झालेल्या त्यांच्या
जागेसाठीची निवडणूक येत्या सोळा नोव्हेंबरला होणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर
केलं आहे. नायडू राजस्थानातून राज्यसभेवर निवडून गेले होते.
****
३० ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या कालावधीत देशभरात 'दक्षता
जनजागृती सप्ताह' आयोजित करण्यात योणार असल्याची माहिती केंद्रीय दक्षता
आयोगानं दिली आहे. राज्यात या सप्ताहाची सुरुवात भ्रष्टाचार निर्मूलनाची
शपथ घेऊन होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शेतकरी कर्जमाफीच्या योजनेत शेतकऱ्यांचे
पैसे त्यांच्या बँकखात्यांमध्ये जमा करण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांकडून
आधार क्रमांक घेण्यास सुरुवात केल्यानंतर, अनेक
शेतकऱ्यांकडून एकाच आधार क्रमांकाचा उपयोग होत असल्याचं निदर्शनास आलं
आहे. बँकांनी सरकारला याबाबत माहिती दिल्यानंतर सरकारनं तत्काळ सहकार
विभाग आणि बँक प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे.
***
वाशिम जिल्ह्यात
शासकीय तूर खरेदीत झालेल्या कथित
घोटाळ्याची चौकशी करावी, या
मागणीसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते हरीश
सारडा यांच्यासह अनेक नागरिकांनी गेल्या
दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणकर्त्याना सगळ्याच राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात चालू महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पंचवीस
हजार हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झाल्याचं जिल्हा प्रशासनाच्या
प्राथमिक पंचनाम्यांमध्ये दिसून आलं आहे. नाशिक जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या 125 टक्के
पाऊस
झाला असून, परतीच्या
पावसानं प्रामुख्याने भात, नागली, उडीद, मका, भुईमूग या पिकांचं नुकसान झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
प्रसिद्ध रंगकर्मी
साहित्यिक डॉ रुस्तम अचलखांब यांचं काल रात्री औरंगाबाद इथं निधन झालं. ते ७३ वर्षांचे
होते. डॉ अचलखांब यांची कैफियत, साळंत जायचंय, या नाट्यकृती, गावकी हे आत्मकथन तसंच
रंगबाजी, अभिनय शास्त्र, आंबेडकरी शाहिरीचे नवे रंग, डॉ आंबेडकरांचे ग्रंथलेखन: एक
आकलन, भारतीय पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रंगभूमी, तमाशा लोकरंगभूमी, ही पुस्तकं प्रसिद्ध
आहेत. तर लोकनायक श्रीकृष्ण या पुस्तकाचं लेखन
सध्या सुरू होतं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे
प्रमुख म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळलेले अचलखांब यांनी, दोन हजार नऊ साली पुण्यात
पिंपरी चिंचवड इथं झालेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भुषवलं होतं.
डॉ अचलखांब यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात येत
आहेत.
****
महाराष्ट्र क्रिकेट
असोशिएनच्या पुणे क्रिकेट मैदानाचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांना निलंबित करण्यात
आलं आहे. एका पत्रकारानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये साळगावकर हे भारत न्यूझीलंड सामन्यापूर्वी
खेळपट्टीशी छेडछाड करण्यास संमती देत असल्याचं, स्पष्ट झाल्यानं, भारतीय क्रिकेट नियामक
मंडळ बीसीसीआयनं ही कारवाई केली. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयच्या क्युरेटरने या खेळपट्टीची
पाहणी करून, ती सुयोग्य स्थितीत असल्याचा अहवाल दिला आहे. भारत न्यूझीलंड एकदिवसीय
क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज पुण्यात या मैदानावर खेळवला जाणार आहे.
पहिला सामना जिंकून न्यूझीलंड मालिकेत आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment