Thursday, 26 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 26.10.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 OCT. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ सकाळी .५० मि.

****

** विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार संलग्नीकरणाची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत वाढवणार, केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती

** बिनचूक माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

** भारतमाला योजनेअंतर्गत देशात ४४ आर्थिक मार्गिका उभारणार; १२ मार्गिका महाराष्ट्रातून जाणार

** आणि

** न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा सहा गडी राखून विजय

****

विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार संलग्नीकरणाची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. बँक खाती तसंच मोबाइल क्रमांकाशी आधार क्रमांक संलग्न करण्याविरोधात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान महान्यायवादी के के वेणुगोपाल यांनी ही मुदत ३१ डिसेंबर २०१७ ऐवजी ३१ मार्च २०१८ करण्यात येणार असल्याचं सांगितलं. ज्या नागरिकांना असं संलग्नीकरण करण्याची इच्छा नाही, त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत बिनचूक माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास सुरूवात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कर्जमाफीची रक्कम जमा करण्याच्या प्रक्रियेतल्या तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यासाठी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सगळ्या जिल्ह्यांमधल्या सहकारी बॅंका आणि सहकार उपायुक्तांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.

****

भारतमाला योजनेअंतर्गत देशात ४४ आर्थिक मार्गिका उभारण्यात येणार असून यातील १२ मार्गिका महाराष्ट्रातून जाणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. देशात भारतमाला योजनेअंतर्गत एकूण ६५ हजार ४०० किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार असून २६ हजार २०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश या आर्थिक मार्गिकामध्ये असणार आहे. राज्यातून जाणाऱ्या १२ आर्थिक मार्गिकांमध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, जालना, नागपूर, रत्नागिरी, धुळे, पुणे, सोलापूर, जळगाव, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि वर्धा या १६ जिल्ह्यांचा समावेश आहे.

****

कृषी क्षेत्रासमोर मोठी आव्हानं असून, या पुढच्या काळात जैव तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या समन्वयातून भारतीय शेतीची प्रगती होईल, सा विश्वास भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्त्रो-चे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बत्तीसाव्या पदवी प्रदान समारंभात ते काल बोलत होते. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी तीन हजार सातशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर पदवी तसंच पीएच डी प्रमाणपत्रं वितरित करण्यात आली.

दरम्यान, राज्यपालांनी या दौऱ्यात कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील प्रदर्शनाला भेट दिली तसंच एकात्मिक शेती पध्दती मॉडेलची पाहणी केली. आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास मॉडेलचं राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन झालं.

****

३० ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या कालावधीत देशभरात 'दक्षता जनजागृती सप्ताह' आयोजित करण्यात योणार असल्याची माहिती केंद्रीय दक्षता आयोगानं दिली आहे. राज्यात या सप्ताहाची सुरुवात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

गेल्या वर्षी सर्जिकल स्ट्राईक नंतर सीमारेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेला लष्कराचा जवान चंदू चव्हाण दोषी आढळला असून त्या लष्करी न्यायालयानं तीन महिन्याच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. राष्ट्रीय रायफलचा जवान असलेला चंदू गेल्या वर्षी गस्त घालत असताना चुकुन पाकिस्तानच्या सीमा रेषेत गेला असताना पाकिस्तान लष्करानं त्याला पकडल होतं, त्यानंतर जानेवारीत त्याला भारताच्या हवाली केलं होतं. चव्हाण हा मूळचा धुळे जिल्ह्यातला रहिवाशी आहे. या शिक्षेविरूद्ध तो वरीष्ठ न्यायालयात अपील करू शकतो.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

औरंगाबाद महापालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीनं नंदकुमार घोडेले, तर उपमहापौर पदासाठी भाजपाच्या वतीनं विजय औताडे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसच्यावतीनं अय्युब खान आणि एमआयएमच्यावतीनं अब्दुल नायकवाडी यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्यावतीनं अफसरखान आणि एमआयएमच्यावतीनं संगीता वाघुले यांनी अर्ज दाखल केला आहे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या डेमॉक्रॅटीक पक्षाच्यावतीनं  कैलास गायकवाड यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे. महापौर तसंच उपमहापौर पदासाठी येत्या २९ तारखेला निवडणूक होणार आहे.

****

उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचं प्रमाण कमी ठेवणाऱ्या संस्था विश्वासपात्र ठरतात, असं मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. परभणी इथं वैश्य नागरी सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन बागडे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. बागडे यांनी झरी या गावात आणि परिसरात झालेल्या जलयुक्त शिवार कामाची पाहणीही काल केली.

****

लोककलांचे अभ्यासक प्रसिद्ध रंगकर्मी डॉ रुस्तम अचलखांब यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. नाट्य तसंच शिक्षण क्षेत्रासह समाजातल्या विविध स्तरातल्या मान्यवरांनी यावेळी अचलखांब यांना अखेरचा निरोप दिला. अचलखांब यांचं मंगळवारी रात्री हृदयविकारानं निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. डॉ अचलखांब यांच्या कैफियत आणि साळंत जायचंय, या नाट्यकृती, गावकी हे आत्मकथन तसंच रंगबाजी, अभिनय शास्त्र, आंबेडकरी शाहिरीचे नवे रंग, डॉ आंबेडकरांचे ग्रंथलेखन: एक आकलन, भारतीय पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रंगभूमी, तमाशा लोकरंगभूमी, ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान काल पुण्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं न्युझीलंडवर सहा गडी राखून विजय मिळवला. न्यु्झीलंडनं प्रथम फलंदाजी करत विजयासाठी २३१ धावांचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं, भारतानं ४६ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ते पुर्ण केलं. या विजयामुळे तीन सामन्याच्या मालिकेत भारतानं १- १ अशी बरोबरी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र क्रिकेट असोशिएनच्या पुणे क्रिकेट मैदानाचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांना निलंबित करण्यात आलं आहे. एका पत्रकारानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये साळगावकर हे भारत न्यूझीलंड सामन्यापूर्वी खेळपट्टीशी छेडछाड करण्यास संमती देत असल्याचं, स्पष्ट झाल्यानं, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयनं ही कारवाई केली.

****

फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, बी साई प्रणित, एच एस प्रणॉय आणि किदांबी श्रीकांत यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी आणि पुरूष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

****

उस्मानाबाद इथं झालेल्या, राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, अर्चना राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हा सायकलींग ज्युदो संघाचे अध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते पार पडला. यात १४ आणि १७ वर्षांखालील मुलं आणि मुलींच्या स्पर्धेत पुणे संघांनी तर १९ वर्षांखालील मुलं आणि मुलींच्या स्पर्धेत मुंबईच्या संघांनी प्रथम पारितोषिक पटकावलं.

****

जालना इथल्या आर. डी. भक्त फार्मसी महाविद्यालयात आयोजित आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम सामन्यात १२५ किलो वजन गटात बीडच्या बलभीम महाविद्यालयाचा मल्ल अक्षय शिंदे यानं, तर मुलींच्या ७२ किलो वजन गटात औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयच्या माधुरी लहासे हिने विजेतेपद मिळविलं. विविध वजन गटांमध्ये विजयी झालेल्या कुस्तीपटूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक तसंच प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं.

****

No comments: