Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 OCT. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** राज्यात एक नोव्हेंबरपासून अनुदानित खतांची विक्री पीओएस
मशीनच्या माध्यमातून करणं बंधनकारक
** ग्रामीण भागात विकासकामांसाठी
मोठ्या प्रमाणात निधी देणार असल्याची ग्रामविकास मंत्र्यांची ग्वाही
** भांडारकर संशोधन संस्थेवर हल्ला प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे
६८ कार्यकर्ते निर्दोष मुक्त
** औरंगाबाद इथं प्रल्हादजी अभ्यंकर
व्याख्यानमालेला प्रारंभ
आणि
** नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या अमनप्रीत सिंगला कांस्य
तर संग्राम दहियाला रजत पदक
****
राज्यात
एक नोव्हेंबरपासून अनुदानित
खतांची विक्री ‘पॉईंट ऑफ सेल’ पीओएस मशीनच्या माध्यमातून करणं बंधनकारक करण्यात आलं
आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल ही माहिती दिली. या खरेदीसाठी शेतकऱ्यांना
आधार क्रमांक देणं बंधनकारक करण्यात आला आहे. आजपासून येत्या ३० तारखे पर्यंत राज्यातल्या
परवानाधारक अनुदानित खत विक्रेत्यांकडे शिल्लक असलेल्या खतांच्या साठ्याचा हिशोब करून
त्यांची नोंद ‘पीओएस’ निगडीत संगणकीय प्रणालीवर आणणार असून, पीओएस मशीनद्वारे विक्री
केलेल्या खतांवरच अनुदान देय राहील, असं फुंडकर यांनी सांगितलं. राज्यात दरवर्षी सुमारे ६० लाख मेट्रिक टन अनुदानित खतांची विक्री होते. त्यामध्ये
खरीप हंगामात ३३ लाख मेट्रिक टन आणि रब्बी हंगामात २७
लाख मेट्रिक टन खताची उलाढाल होते.
****
स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा केंद्रबिंदू
असल्याचं, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश
बापट यांनी म्हटलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या
शेगाव इथं आयोजित कार्यशाळा आणि मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं संगणकीकरण करुन
ई पॉस मशिनच्या माध्यमातून धान्य वितरण करण्यात येणार असल्यामुळे या व्यवस्थेतला काळाबाजार
संपूर्णपणे थांबवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातल्या २८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मध्यवर्ती सहकारी
बँकेनं जवळपास १७ लाख रुपये रक्कम कर्जमाफी पोटी जमा केली
आहे. या सर्व शेतकऱ्यांना गेल्या आठवड्यात
कर्जमाफीचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. दरम्यान, कर्जमाफीसाठी तयार केलेल्या वेब
पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असून, त्या दूर झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या
खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल असा विश्वास जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं व्यक्त
केला आहे.
****
ऊस गाळप हंगामात यंदा तीन हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी करत बळीराजा
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल पंढरपूर इथं सहकार
मंत्री सुभाष देशमुख यांची गाडी अडवली. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या
गाळप हंगामाचं उद्घाटन करण्यासाठी देशमुख आले असता, हा प्रकार घडला.
मंत्र्यांच्या गाडीपुढे रस्त्यावर झोपलेल्या दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
ग्रामीण भागात विकासाची कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देणार असल्याची
ग्वाही राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. त्या काल बीड
जिल्ह्यात गोटेगाव इथं जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार सोहळ्यात
बोलत होत्या. ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम करण्याचा आपला प्रयत्न असून, ग्रामीण
विकासाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देऊन सरपंचांना ताकद देणार
असल्याचं मुंडे यांनी नमूद केलं.
****
पुणे
इथल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला केल्याप्रकरणी
संभाजी ब्रिगेडच्या ६८ कार्यकर्त्यांची पुणे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं काल
निर्दोष मुक्तता केली. जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने ‘शिवाजी
: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात आक्षेपार्ह
लेखनास माहिती पुरवल्याच्या रोषातून पाच जानेवारी २००४ रोजी सुमारे दीडशे
कार्यकर्त्यांनी या संस्थेवर हल्ला करून तोडफोड केली होती. या प्रकरणी ७२ आरोपींना
अटक करण्यात आली होती, त्यापैकी चार जणांचा खटला सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी, काल हा निर्णय देताना, हा
हल्ला नेमका कोणी केला किंवा कोणी घडवून आणला, हे सरकार पक्ष सिद्ध करू न
शकल्यानं, सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
****
प्रख्यात निर्माते दिग्दर्शक गौतम अधिकारी
यांचं काल मुंबईत
दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. गौतम अधिकारी यांनी १९८५ मध्ये त्यांचे
बंधू मार्कंड अधिकारी यांच्यासोबत सब अर्थात श्री अधिकारी ब्रदर्स हा समूह स्थापन केला.
झपाट्यानं विस्तार करत हा समूह मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध होणारा पहिला दूरचित्रवाणी
उद्योग ठरला. त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांची निर्मिती तसंच दिग्दर्शन केलं होतं.
त्यांच्या पार्थिव देहावर काल विलेपार्ले
इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या
खामगांव इथले काँग्रेस नेते संजय पाटील ठाकरे यांच्या
पार्थिव देहावर आज खामगाव इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. ठाकरे
यांचं परवा दिल्ली इथं, हृदय विकाराच्या
झटक्यानं निधन झालं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
परभणी इथं क्षेत्रीय कार्यक्रम सल्लागार समितीची त्रैमासिक सभा काल आणि परवा
घेण्यात आली. महासंचालक कार्यालयाच्या सहाय्यक संचालक सुजाता परांजपे यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या या दोन दिवसीय बैठकीत परांजपे यांनी, बदलत्या परिस्थितीचा
वेध घेऊन कार्यक्रम निर्मिती करण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्र आणि गोवा आकाशवाणी
केंद्रातले सहायक संचालक तसंच कार्यक्रम प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
****
औरंगाबाद इथं प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेला कालपासून
प्रारंभ झाला. राष्ट्रीय सहकारिता विकास महामंडळाचे संचालक सतिश मराठे यांनी, भारतीय
अर्थव्यवस्था आज आणि उद्या या विषयावर
व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी विमुद्रीकरण आणि वस्तू
सेवा कराची अंमलबजावणी
करून अर्थव्यवस्थेला नवी उभारी दिली
असल्याचं मराठे म्हणाले. या निर्णयामुळे प्रारंभी जाणवणाऱ्या अडचणी आता हळूहळू मार्गी
लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या तीन दिवसीय व्याख्यानमालेत
आज ब्रिगेडियर हेमंत महाजन भारतासमोरील चीनचं आव्हान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
****
नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या महापौर पदासाठी काल
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाकडून शीला किशोर भवरे आणि उपमहापौर पदासाठी विनय गिरडे पाटील
यांनी अर्ज दाखल केले, तर भारतीय जनता पक्षाकडून
बेबीताई गुपिले आणि उपमहापौर पदासाठी गुरूप्रीतकौर सोडी
यांनी अर्ज दाखल केले आहेत. महापौर आणि उपमहापौर पदासाठी एक
नोव्हेंबरला निवडणूक होत आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या आठ ग्रामपंचायतींसाठी
काल सुमारे ८७ टक्के एवढं मतदान
झालं. घनसावंगी इथल्या तहसील कार्यालयात आज मतमोजणी
होणार आहे. सरपंचपदाच्या सात जागांसाठी १८, तर सदस्यपदाच्या २४ जागांसाठी ११२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गाढे
सावरगाव इथं सरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे.
****
आंतरराष्ट्रीय
नेमबाजी क्रीडा महासंघाच्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या अमनप्रीत सिंगनं कांस्य पदक
पटकावलं. पुरुषांच्या ५० मीटर पिस्टल प्रकारात त्यानं २०२ पूर्णांक दोन दशांश गुण मिळवले.
नेमबाज जीतू रायला मात्र १२३ पूर्णांक दोन दशांश गुणांसह सातव्या स्थानावर समाधान मानावं
लागलं. या स्पर्धेत संग्राम दहियानं डबल ट्रॅप प्रकारात रजत
पदक पटकावलं.
****
ग्रंथोत्सवाप्रमाणे गावागावात वाचकोत्सव
व्हावा असं मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं
आहे. औरंगाबाद इथं आयेाजित जिल्हास्तरीय
ग्रंथोत्सवाचं काल बागडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं,
त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन सत्रानंतर ‘प्रभावी वाचन माध्यमं‘
या विषयावर परिसंवाद घेण्यात
आला. मुद्रित माध्यम हे सर्वात प्रभावी वाचन माध्यम असल्याचं मत प्राध्यापक जयदेव डोळे
यांनी व्यक्त केलं. तर सामाजिक
संपर्क माध्यमातून वाचनासंदर्भात आशादायी चित्र निर्माण झाल्याचं मत
प्रसिद्ध लेखक वीरा राठोड यांनी व्यक्त केलं
****
औरंगाबाद इथं वीज महावितरणच्या तपासणी मोहिमेत ९३
जणांवर वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले, तर १५४ वीज मीटर जप्त करण्यात आले. सोमवार पासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेत
आतापर्यंत दहा हजार ८०६ ग्राहकांचे
वीज मीटर तपासण्यात आले. तपासणीत एकूण ९३ वीज
ग्राहकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या मोहिमेत ४७१
वीज ग्राहकांचे वीजमीटर जागेवर बदलून देण्यात आले तर वीज
बिल न भरल्यामुळे ८१८ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment