Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 OCT. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
·
ग्राहकांच्या हित रक्षणासाठी कठोर कायदा करण्याचा सरकारचा विचार - पंतप्रधान नरेंद्र
मोदी
·
आधार क्रमांक नसलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही स्वस्त
धान्य दुकानातून धान्य देण्याच्या केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना
·
वारसा स्थळ दत्तक योजनेअंतर्गत अजिंठा लेणीच्या विकासासाठी यात्रा ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची
निवड
आणि
·
औरंगाबाद महानगरपालिकेच्या आस्थापना आणि महसूल
विभागाचा उपायुक्त अय्युब खान नूरखान पठाणला लाच प्रकरणी अटक
****
ग्राहकांच्या हित रक्षणासाठी सरकार कठोर कायदा करत असून या नव्या ग्राहक कायद्याचा मसुदा तयार
करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं ग्राहक संरक्षण विषयक आंतरराष्ट्रीय
परिषदेच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. ग्राहकांना सक्षम करणं
तसंच त्यांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यावर
सरकारचं लक्ष असल्याचं ते म्हणाले. प्रभावी तक्रार निवारण प्रणाली
ही लोकशाही व्यवस्थेत महत्वाची असून, सरकार त्यासाठी तंत्रज्ञान
आणि मजबूत तक्रार निवारण प्रणाली यांची एकत्रित सांगड घालत असल्याचंही त्यांनी यावेळी
नमूद केलं.
****
एकता हेच भारताचं सामर्थ्य असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री
किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत
ते बोलत होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या
३१ ऑक्टोबरला एकता दौडचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अतिशय भव्य अशा या उपक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू युवक
राहणार असून, संपूर्ण देशभर हा उपक्रम राबवला जाणार असल्याचं
ते म्हणाले.
यानिमित्त राज्यात सर्वत्र एकता दौडचं
आयोजन करण्यात आलं आहे, जालना इथं निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं पोलिस उपअधिक्षक रविंद्र निकाळजे यांनी
सांगितलं.
****
आधार क्रमांक नसलेल्या पात्र लाभार्थ्यांची नावं यादीतून
वगळू नयेत अशा स्पष्ट सूचना केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या आहेत. शिधा पत्रिका आधार
क्रमांकाशी जोडली नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून धान्य नाकारल्यानं झारखंडमधल्या
एका ११ वर्षीय मुलीच्या कथित मृत्युच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या
आहेत. या सर्व लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्यात यावं, असं केंद्र
सरकारनं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ऐतिहासिक अजिंठा लेणी विकासासाठी
यात्रा ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यटन
मंत्रालयाच्या वारसास्थळ दत्तक योजने अंतर्गत देशातल्या १४ स्मारकांच्या संवर्धनासाठी
सात कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. काल नवी दिल्ली इथं आयोजित ‘पर्यटन पर्व’ या
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मंत्रालयाच्यावतीनं या निवडीची घोषणा करण्यात आली. ही कंपनी आता ‘स्मारक मित्र’ म्हणून ओळखली जाणार असून सामाजिक
दायित्व निधीतून अजिंठा लेणीच्या ठिकाणी पर्यटन पूरक सोयीसुविधा उपलब्ध करून देणं तसंच
या लेण्यांच्या संवर्धनाचं काम कंपनी करणार
आहे.
****
बीड शहरात
५० आणि शंभर रुपयांच्या बनावट नोटा बनवणारा सय्यद
शुकुर शब्बीर याला अटक करण्यात आली आहे. शहरातल्या गांधीनगर भागात शब्बीर बनावट
नोटा बनवतो अशी माहिती मध्यप्रदेश पोलिसांना मिळाली होती, त्यावरून
मध्यप्रदेश पोलिसांनी बीड पोलिसांच्या मदतीनं शब्बीरच्या घरावर धाड टाकली. याठिकाणी
नोटा बनवण्याचं साहित्य, एक लाख ५० हजाराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. बनावट
नोटा बनवण्याचं हे मोठं रॅकेट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या अनधिकृत धार्मिक
स्थळांची यादी पोलिसांचा अहवाल आल्यावर महापालिका जाहीर करेल, अशी
माहिती पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली आहे. धार्मिक
स्थळांना असलेली लोकमान्यता, वाहतुकीसाठी निर्माण होणारा अडथळा याबद्दल पोलिसांचा अहवाल
मागवला असून, तो आल्यावर धार्मिक स्थळांची अंतिम यादी न्यायालयात सादर केली
जाईल, असं ते म्हणाले.
****
मुद्रांक घोटाळ्यातला प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगीचं
काल बेंगळूरु इथल्या रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. तेलगी याला मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी
२००७ मध्ये ३० वर्ष सक्तमजुरी आणि २०२ कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली
होती.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातल्या
आठ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. सरपंचपदाच्या
सात जागांसाठी १८, तर सदस्यपदाच्या २४ जागांसाठी ११२ उमेदवार
निवडणूक रिंगणात आहेत.गाढ़ेसावरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची
निवडणूक बिनविरोध झाली आहे. २१ केंद्रावर होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी
८४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकासाचा आराखडा
तयार करण्यात येत असून या ग्रामपंचायतींना
मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा
मुंडे यांनी केलं आहे. पांगरी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अठराव्या
गळीत हंगामाचा शुभारंभ पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते काल झाला, त्यावेळी त्या बोलत
होत्या. नव्यानं निवडून आलेल्या सर्व सरपंच तसंच सदस्यांनी या निधीचा चांगला उपयोग
करुन घेऊन आपल्या गावाचा विकास करावा असं आवाहन त्यांनी केलं .
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या आस्थापना आणि महसूल
विभागाचे उपायुक्त अय्युब खान नूरखान पठाण याच्या
सांगण्यावरून तक्रारदाराकडून लाचेचा एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता
स्वीकारताना लिपिक दादाराव लाहोटी याला काल
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ अटक केली. कनिष्ठ लिपीक पदावर कायमस्वरूपी नियुक्ती करण्याचा उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर फाईल पहिल्या बैठकीत ठेवण्यासाठी
अय्युब खान यानं तक्रारदारकडे तीन लाख रूपयांची लाच मागितली होती.
****
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या रोहिलागड इथलं देशी दारूचं
दुकान बंद करण्यासाठी काल ग्रामसभा घेऊन मतदान घेण्यात आलं.
या वेळी एक हजार ४६४ पैकी ८४२ महिलांनी देशी दारूचं दुकान बंद व्हावं
यासाठी मतदान केलं. त्यामुळे या गावातलं देशी दारूचं दुकान बंद
करण्यात येणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी
सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्हा
परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. सवंर्ग एक ते चार मधील दहा वर्षे एकाच शाळेवर
सेवा दिलेल्या शिक्षकांना या बदली प्रक्रियेत अर्ज करता येणार आहे. सर्व्हर कार्य
करत नसल्यामुळे तसंच अन्य
तांत्रिक अडचणींमुळे अनेक शिक्षकांना अर्ज करता आले नाहीत, ही बाब लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथल्या श्री. रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या १६
व्या गळीत हंगामचा शुभारंभ काल झाला.
भोकरदन-जाफ्राराबाद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झाली असल्याचं
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष खासदार
रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. कारखान्याचे अध्यक्ष
विजयसिंह परिहार यांच्या सह संचालक आणि शेतकरी
उपस्थित होते.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठणच्या खुल्या कारागृहात, खुले कारागृह कैदी आरोग्य आणि स्वच्छता समितीची
स्थापना करण्यात असून समितीच्या अध्यक्षपदी वैजापूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या
आहारतज्ञ डॉ.वसुधा पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकार चंद्रकांत तारु
आणि दिया फाउंडेशनच्या अध्यक्ष नम्रता पटेल यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात
आली आहे.
****
फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची
पी व्ही सिंधूनं महिला एकेरीत आणि किदांबी श्रीकांतनं पुरूष एकेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना
पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मात्र सायना नेहवाल पराभूत झाल्यामुळे
तिचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पुरूष दुहेरीत सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टीच्या
जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, मात्र अश्विनी पोन्नप्पा आणि एन. सिक्की
रेड्डी ही जोडी महिला दुहेरीत पराभूत झाली आहे.
****
तीन फेब्रुवारी २०१८ पासून यशवंतपूर- बिदर या रेल्वेचा
विस्तार लातूर पर्यंत करण्यात येणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment