Friday, 27 October 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 27.10.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27  OCT. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ ऑक्टोबर २०१ दुपारी १.०० वा.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातल्या २८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मध्यवर्ती सहकारी बँकेनं जवळपास १७ लाख रुपये रक्कम कर्जमाफी पोटी जमा केली आहे. या सर्व शेतकऱ्यांना गेल्या आठवड्यात कर्जमाफीचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. दरम्यान, कर्जमाफीसाठी तयार केलेल्या वेब पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असून, त्या दूर झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल असा विश्वास जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं व्यक्त केला आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्ठी निमित्त मुंबईत आज समारंभपूर्वक त्यांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून वळसे पाटील यांना शुभेच्छा दिल्या. वळसे पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना केलेल्या भाषणात, शरद पवार यांच्यामार्गदर्शनातून आपण राजकारणात आल्याचं सांगताना, सर्वांच्या सहकार्याने समाधानकारक कामगिरी केल्याची भावना कृतज्ञतापूर्वक व्यक्त केली.

****

पायदळ सेना अर्थात इन्फंट्री दिवस आज साजरा करण्यात येत आहे. ७० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी देशाच्या अखंडतेवर निर्माण होणारा धोका लक्षात घेता भारतीय सेनेच्या शीख रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनचे सैनिक लढाऊ विमानानं श्रीनगरमध्ये उतरले होते. पायदळ सैनिकांच्या कामगिरीमुळे पाकिस्तानी सेनेची मदत घेण्याचा कबाईली हल्लेखोरांचं कट उधळून लावण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायदळ सेनेच्या सर्व सैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

प्रख्यात निर्माते दिग्दर्शक गौतम अधिकारी यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. गौतम अधिकारी यांनी १९८५ मध्ये त्यांचे बंधू मार्कंड अधिकारी यांच्यासोबत सब अर्थात श्री अधिकारी ब्रदर्स हा समूह स्थापन केला. झपाट्यानं विस्तार करत हा समूह मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध होणारा पहिला दूरचित्रवाणी उद्योग ठरला. त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांची निर्मिती तसंच दिग्दर्शन केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर विलेपार्ले इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

नोंदणी रद्द झालेल्या शेल कंपन्यांच्या मालमत्तांचा तपास करून, या मालमत्ताच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे व्यवहार होणार नाहीत, याची जिल्हा प्रशासनानं दक्षता घ्यावी, असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. या कंपन्यांमार्फत व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काळ्या पैशाविरोधातल्या मोहिमेअंतर्गत दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं केली आहे. दीर्घ काळापासून कुठलाही व्यवसाय न करणाऱ्या दोन लाखांपेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी सरकारनं रद्द केली असून, या कंपन्यांच्या संचालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे.

****

वस्तू सेवा कर - जी एस टी लागू होण्यापूर्वीच्या मालसाठयावर कर लाभ मिळवण्यासाठी व्यावसायिकांना दिलेली मुदत आता ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. सरकारनं ट्विटरवरुन ही माहिती दिली. एक जुलै रोजी जीएसटी लागू होण्यापूर्वी ज्या व्यावसायिकांनी माल विकला होता, त्यावरील कर लाभासाठी ट्रान वन अर्ज भरणं आवश्यक आहे. जीएसटीच्या पहिल्या महिन्यात जमा झालेल्या ९५ हजार कोटी रुपयांपैकी ६५ हजार कोटी रुपयांच्या कर लाभासाठी करदात्यांनी दावा केला आहे. यानंतर केंद्रीय अबकारी शुल्क आणि सीमा शुल्क मंडळानं एक हजार कोटी रुपयांवरील सर्व दाव्यांची छाननी करण्याचे आदेश दिले आहेत.

****

यशवंतपूर- बिदर या रेल्वेचा येत्या तीन फेब्रुवारी २०१८ पासून लातूर पर्यंत विस्तार करण्यात येणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं म्हटलं आहे. यशवंतपूर- बिदर रेल्वे सुरू झाल्यास लातूर आणि परिसरातून तिरुपती, बेंगळुरुला जाण्यासाठी सुविधा होणार आहे. ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावते.

****

पंढरपूर इथं कार्तिकी यात्रेसाठी मध्य रेल्वे लातूर ते पंढरपूर आणि मिरज ते पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. उद्यापासून तीन नोव्हेंबरपर्यंत दररोज मिरज ते पंढरपूर गाडी धावणार असून, येत्या सोमवारपासून तीन नोव्हेंबरपर्यंत लातूर ते पंढरपूर गाडी धावणार आहे. 

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात कोंडाईबारी घाटात बऱ्हाणपूर - सुरत या खासगी बसच्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले. मध्यरात्री बस पलटी झाल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर, मुदखेड या तालुक्यात नगदी पिक म्हणून केळीचं पिक मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे. यंदा जुलै - ऑगस्ट महिन्यात केळीची लागवड करण्यात आली, मात्र इसापूर धरणात पाणी साठा झाला नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, उभं पिक करपत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****


No comments: