Sunday, 29 October 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.10.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारतीय जनता पक्षानं सत्तेची तीन वर्षपूर्ती म्हणून कर्जमाफीची फसवी भेट शेतकऱ्यांना दिली अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर इथं शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते आज बोलत होते. राज्यातल्या भाजप सरकारनं केवळ शिवसेनेच्या दबावामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असं ही राऊत यांनी नमूद केलं.

****

विमानतळात प्रवेश करण्यासाठी आता ओळखपत्र म्हणून मोबाईल आधार ग्राह्य धरलं जाणार आहे. हवाई उड्डाण सुरक्षा संस्थेच्या प्रसिध्दीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार पालकांबरोबर येणाऱ्या मुलांना कुठल्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज नसेल. हवाई उड्डाण सुरक्षा संस्थेनं प्रसिध्द केलेल्या यादीतल्या दहा ओळखपत्रांपैकी कुठलेही एक ओळखपत्र विमानतळ परिसरात प्रवेश करण्यासाठी ग्राह्य धरलं जाणार आहे. यात पारपत्र, मतदान ओळखपत्र, आधार किंवा मोबाईल आधार, पॅन कार्ड आणि वाहनचालक परवाना यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी सरकारी शिक्षण संस्थांकडून जारी करण्यात आलेलं छायाचित्रासह ओळखपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यासह शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी साडेआठ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. आज शिर्डी इथं साईमंदिरात माध्यान्ह आरतीला हजेरी लावून, साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री राम शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, गडकरी आज औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. चित्ते पिंपळगाव इथं साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ तसंच श्रीयश शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.

****

मुंबई इथं आज सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातर्फे पहिली कस्टम हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते. ही मॅरेथॉन जनता आणि शासन यांच्यातला संवाद दृढ करणारी ठरेल, असं मत जेटली यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

वस्तू आणि सेवा कर नेटवर्क - जीएसटीएननं वस्तू आणि सेवा कर जमा करण्याच्या प्रणालीत अधिक सुविधा देण्यासाठी सर्वेक्षण सुरु केलं आहे. जीएसटीएनचे अध्यक्ष अजय भूषण पांडेय यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. कॉलसेंटरच्या माध्यमातून जीएसटीअंतर्गत विवरणपत्रं सादर करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रियांनुसार प्रक्रिया अधिक सुलभ करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नंदकुमार घोडले ७७ मतं मिळवत विजयी झाले आहेत. उपमहापौर पदी भाजपचे विजय औताडे निवडून आले. घोडेले यांनी एमआयएमचे अब्दुल नाईकवाडे यांचा पराभव केला. अब्दूल नाईकवाडे यांना २५, तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार अय्युब खान यांना ११ मतं मिळाली.

बाळासाहेब ठाकरे यांचं शहरातलं प्रस्तावित स्मारक, रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्था, स्वच्छता या प्रमुख मुद्यावर काम करणार असल्याचं सांगत, नवनियुक्त महापौर घोडेले यांनी त्यांचा संकल्पनामा प्रसिद्ध केला.

****

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते लक्ष्मीनारायण ऊर्फ लालाजी जैस्वाल यांच्या पार्थिव देहावर आज औरंगाबाद इथं कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, राज्याचे पशूसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी जैस्वाल यांचं अंत्यदर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. जैस्वाल यांचं काल रात्री औरंगाबाद इथं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते.

****

जालन्यातल्या तेरा मटका बुकींना जिल्ह्यातून एका वर्षाकरता हद्दपार करण्यात आलं आहे. मटका-जुगार न चालवण्याचं कायदेशीर शपथपत्र देऊनही या मटका बुकींनी अवैध व्यवसाय सुरूच ठेवल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेनं त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित केली होती. या प्रस्तावाच्या आधारे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनयमाच्या कलम ५५ नुसार ही कारवाई केली.

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान कानपूर इथं खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडसमोर ३३८ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पहिल्या डावात भारतीय संघानं निर्धारित षटकात रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर ३३७ धावा केल्या.

****

No comments: