Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
ऐतिहासिक वारशांची, वास्तूंची सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी आपणा सर्व देशवासियांची
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन
की बात या कार्यक्रमात ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा आज ३७वा भाग
प्रसारित झाला. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या संवादात चंद्रपूर इथल्या इकॉलॉजिकल प्रोटेक्शन
ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेनं चंद्रपूरच्या भुईकोट किल्ल्यात राबवलेल्या स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण
उल्लेख केला.
****
गेल्या महिन्यात मन की बात कार्यक्रमात गांधी जयंतीच्या अनुषंगानं
खादी वापरण्याचं आवाहन केल्यामुळे दिवाळीच्या दिवसात खादीच्या विक्रीत वाढ झाल्याचं
पंतप्रधानांनी नमूद केलं. खादी आणि हातमाग गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या
जीवनात परिवर्तन साधून त्यांना सक्षम, सशक्त, शक्तिशाली
होण्यासाठीचं साधन बनत असून, ग्रामोद्योगासाठी ही मोठी भूमिका असल्याचं मोदी म्हणाले.
****
यंदाची दिवाळी जवानांसोबत साजरी
केल्याचं सांगून पंतप्रधानांनी, नागरिकांनाही जवानांसोबत वेळ घालवण्याचं आणि त्यांचे
अनुभव जाणून घेण्याचं आवाहन केलं. भारतीय जवान आणि महिलांनी जगात शांतता
प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली असून, ८५ देशांत
भारत शांती - अभियानाचं प्रशिक्षण देत असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
भगिनी निवेदिता यांची दिडशेवी जयंती काल साजरी झाली, परवा ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी, येत्या
चार नोव्हेंबरला गुरुनानक यांची जयंती, तसंच येत्या १४ नोव्हेंबरला
देशाचे पहिले पंतप्रधान जावहरलाल नेहरु यांची जयंती, असल्याचं
सांगून पंतप्रधानांनी या महान व्यक्तींचं स्मरण केलं.
सरदार वल्लभभाई पटेल
यांच्या जयंतीनिमित्त देशात एकता दौडचं आयोजन केलं असून, नागरिकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं.
लहान मुलांचं आरोग्य
सुदृढ राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आयुर्वेद आणि योग याकडे
केवळ उपचाराच्या माध्यमातून न पाहता, ते आपल्या जीवनात
अंगीकारावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
आशिया चषक जिंकल्याबद्दल हॉकी संघाचं, डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्याबद्दल बॅडमिंटनपटू के श्रीकांतचं,
तसंच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचं पंतप्रधानांनी
अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
****
जम्मू काश्मीरमधल्या बांदीपुरा
जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत
विशेष कारवाई बलाचा एक पोलिस हुतात्मा झाला. या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती
मिळाल्यानंतर सुरक्षा दल आणि विशेष कारवाई दलानं शोधमोहीम सुरु केली. यावेळी दहशतवाद्यांनी
मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु केला. या चकमकीदरम्यान पोलिस जवानाला वीरमरण आलं. या
परिसरात दोन दहशतवादी लपले असून, चकमक अद्यापही सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री
नितीन गडकरी यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर इथं भेट देऊन शनीदर्शन घेतलं.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते. गडकरी आज शिर्डी इथं ही भेट देणार असून, त्यानंतर ते औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. चित्ते पिंपळगाव इथं छत्रपती
संभाजी राजे साखर उद्योगाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्रीयश शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमालाही
ते हजर राहणार आहेत.
****
बीड जिल्हा येत्या महिनाभरात
शंभर टक्के उघड्यावर शौचापासून मुक्त करण्यासाठी काम करावं, तसंच परळी बाह्यवळण रस्त्याचं
काम तातडीनं सुरू करावं असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. परळी
इथं विविध खात्याच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जिल्हयाची
पाणंदमुक्तीकडे वाटचाल सुरू असून, आतापर्यंत जिल्ह्यात तीन लाख शौचालयं बांधून पूर्ण
झाली असल्याची माहिती मुंडे यांनी यावेळी दिली.
****
औरंगाबाद महापालिकेच्या
महापौर पदासाठी आज निवडणूक होत आहे. महापौर पदासाठी शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले, काँग्रेसकडून अय्युब खान तर एमआयएमकडून अब्दुल नायकवाडी हे रिंगणात उतरले आहेत.
****
१७ वर्षांखालील फुटबॉल
विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा संघ विजेता ठरला आहे. काल रात्री झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडनं स्पेनचा पाच
दोन असा पराभव केला.
****
फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
पुरुष एकेरीची अंतिम लढत आज भारताचा बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत आणि जपानच्या केंटा
निशिमोटो यांच्यात पॅरिस इथं होणार आहे. श्रीकांतनं उपांत्यफेरीत भारताच्याच एच एस
प्रणयचा, पराभव केला.
****
No comments:
Post a Comment