Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 October 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
आधुनिक आणि एकसंध भारत घडवण्यासाठी
सरदार पटेल यांनी दिलेल्या अनमोल योगदानाप्रती सगळ्या भारतीयांनी कृतज्ञता व्यक्त करायला
हवी, अशा शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सरदार
पटेल यांच्या कार्याचा गौरव केला. दिल्ली इथं आयोजित “मेकींग
अ गांधीयन नॅशनलिस्ट : लाईफ अँड टाईम्स ऑफ सरदार पटेल” या दोन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचं नायडू यांनी आज
उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. पटेल यांनी सदैव
राष्ट्रहिताला प्राधान्य देत, देशाच्या भविष्याला आकार दिला, असं
उपराष्ट्रपती म्हणाले.
****
भाजप सरकारनं नागरिकांना ‘अच्छे दिन’चं स्वप्न दाखवून
बुरे दिन आणल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
काँग्रेसच्या जनआक्रोश आंदोलनाला आज अहमदनगर इथं प्रारंभ झाला, त्यावेळी चव्हाण बोलत
होते. सरकारच्या ऑनलाईन खरेदीच्या धोरणावरही टीका करत, चव्हाण यांनी शेतमालाची थेट
खरेदी करण्याची मागणी केली. प्रशासन कसं चालवायचं, हे या सरकारला माहीत नसल्याचं चव्हाण
म्हणाले.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव
इथं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं भाजप सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. भाजप सरकारला आज तीन वर्ष पूर्ण झाले, त्या पार्श्वभूमीवर
सरकारनं दिलेल्या आश्वासनांची जाणीव करुन देण्यासाठी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा
यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.
****
भारतीय जनता पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी
मेहनत घेतली, त्यांना सत्तेबाहेर ठेवलं जात असल्याचं, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी
म्हटलं आहे. ते धुळे इथं एका कार्यक्रमात बोलत होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे
यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. पुणे औद्योगिक
वसाहतीतल्या कथित भूखंड घोटाळा प्रकरणानंतर खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा
लागला होता.
****
मराठा समाजातल्या तरुणांना
उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करता यावं यासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांची
लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली, या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यापूर्वी झालेल्या बैठकीत निश्चित
करण्यात आलेल्या बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
****
फेरीवाल्यांसंदर्भात सर्वोच्च
न्यायालयाच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी
मुंबई हॉकर्स संघटनेनं उद्या आझाद मैदानावर रोजी-रोटी बचाव आंदोलन करण्याचा इशारा
दिला आहे. राज्य सरकारनंही केंद्र सरकारच्या पथ विक्रेता अधिनियम २०१४ ची अंमलबजावणी
करून राज्यातल्या फेरीवाल्यांना परवाना द्यावा, अशी
संघटनेची मागणी आहे.
****
लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा
तालुक्यातल्या सास्तूर माकणी परिसरात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भूकंपाचा
सौम्य धक्का जाणवला. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातही भूकंपाचा सौम्य धक्का बसला.
या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
परभणी महानगरपालिकेच्या तीन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण
सभेत पाच स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये पक्षीय बलाबलानुसार काँग्रेसचे
तीन, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य असेल.
****
औरंगाबाद इथं भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलच्या दूरसंचार सल्लागार समितीची जिल्हास्तरीय
बैठक आज खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात
आली. बीएसएनएलनं दूरध्वनीसह मोबाईल ग्राहकांना मुबलक, स्वस्त आणि जलदगतीनं सेवा पुरवण्याची सूचना खैरे यांनी यावेळी
केली.
****
गडचिरोली इथल्या जिल्हा परिषद
सदस्य रंजिता कोडाप यांची मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समितीवर अशासकीय
सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. मुद्रा बँक योजनेचा
प्रचार, प्रसार आणि संनियत्रण करण्यासाठी ही राज्यस्तरीय
समिती गठित करण्यात आली आहे.
****
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज परभणी इथं
एकता दौड घेण्यात आली. जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या उपस्थितीत राजगोपालाचारी उद्यानातून
सुरू झालेली ही एकता दौड शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, प्रियदर्शनी मैदानात
विसर्जित झाली.
****
जपानमधल्या काकामिगाहारा इथं
सुरू असलेल्या महिला आशिया चषक हॉकी
स्पर्धेत भारतानं तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात मलेशियाचा
दोन शून्य असा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. उपान्त्य फेरीचा सामना परवा गुरुवारी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment