Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
उच्च न्यायालयाच्या
आदेशानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी आपला चार दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेतल्यानंतर
आज सकाळपासून एसटी गाड्या सुरू झाल्या आहेत. ऐन दिवाळीत झालेल्या या संपानं प्रवाशांची
मोठ्या प्रमाणावर अडचण झाली होती. जालना, अहमदनगर, औरंगाबाद जिह्यांमधली बससेवा पूर्वपदावर
येत असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
आज देशभरात पोलिस
स्मृती दिवस पाळला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतल्या पोलिस
स्मारक मैदानावर, शहीद पोलिसांना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.
गेल्या वर्षात देशभरात
तीनशे त्र्याऐंशी पोलिसकर्मचाऱ्यांनी कर्तव्य
बजावताना प्राण गमावले, अशी माहिती गुप्तचर विभागाचे संचालक राजीव जैन यांनी दिली आहे.
ते आज नवी दिल्लीत पोलिस स्मृती दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.राज्यातही आज पोलिस
स्मृती दिनाच्या कार्यक्रमात मुंबई, अहमदनगर, सातारा जालना इथे पोलिस स्मारकांना पुष्पचक्र
अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
****
बोफोर्स प्रकरणाच्या
आधीच्या निर्णयाचा सरकारनं पुनर्विचार करावा आणि याबाबतीत सर्वोच्च न्यायालयात विशेष
अनुमती याचिका दाखल करण्यास आपल्याला परवानगी द्यावी असं केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं
म्हटलं आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या हिंदुजा बंधूंविरूध्दचे सगळे आरोप
फेटाळून लावणाऱ्या निकालाच्या विरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करू
इच्छित असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची
परवानगी यूपीए सरकारनं २००५ मध्ये नाकारली होती.
****
भारताच्या परकीय
चलनाच्या साठ्यात सप्टेंबर महिन्यात विक्रमी वाढ झाली आहे. डीबीएस या प्रमुख जागतिक
आर्थिक सेवा कंपनीनं ही माहिती जाहीर केली आहे. यानुसार सप्टेंबर महिन्यात परकीय गंगाजळीचा
भारताचा साठा चारशे दोन अब्ज पन्नास कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे.ऑगस्ट २०१३ मध्ये हा
साठा दोनशे पंचाहत्तर अब्ज डॉलर्स इतका होता. देशात परकीय गुंतवणूक वाढल्यानं तसंच
चालू खात्यातली तूट कमी झाल्यानं ही वाढ नोंदली गेली आहे.
****
सार्वजनिक अन्नधान्य
वितरण व्यवस्थेतला गैरव्यवहार रोखण्यासाठी देशातल्या जवळपास ८१ टक्के स्वस्त धान्य
दुकानावरच्या शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय
अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.
उर्वरीत शिधापत्रिकाही आधार क्रमांकाशी संलग्न करण्यावर केंद्र सरकार भर देत आहे. यासाठी
राज्यांना डिसेंबर अखेरपर्यंतचा अवधी देण्यात आला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
मात्र, आधारपत्र नसेल तर अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ देण्यापासून कोणालाही वंचित करण्यात
आलं नसल्याचा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.
****
देशभरात आज भाऊबीजेचा
सण उत्साहात साजरा होत आहे. भावाबहिणींच्या नात्यातल्या प्रेमाला उत्सवी रूप देणाऱ्या
दिवाळीतल्या या दिवसाला महाराष्ट्र आणि गोव्यात भाऊबीज, कर्नाटकमध्ये भातृ द्वितीया,
बंगालमध्ये बाई पोटा, मणिपूर मध्ये नींगोल चाकुबा तर नेपाळमध्ये भाई टीका या नावांनी
संबोधलं जातं.
****
व्यापाऱ्यांना सुरूवातीचे
वस्तू आणि सेवाकर ३बी परतावे दाखल करता यावेत, यासाठी वस्तू आणि सेवाकर नेटवर्क जीएसटीएन
नं एक्सेल प्रणालीवर आधारित ऑफलाईन साधन सुरू केलं आहे. करदात्यांनी जीएसटीएन पोर्टलवरून
हे ऑफलाईन साधन डाऊनलोड करून घेऊन त्यात आवश्यक ती माहिती भरून जीएसटी पोर्टलवर अपलोड
करायची आहे. माहिती अपलोड केल्यानंतर अर्ज तपासून पाहता येणार असून, त्यानंतर डिजीटल
स्वाक्षरी करून परतावे दाखल करता येणार आहेत.
****
मुंबईतल्या रेल्वे
स्थानकांबाहेरच्या फेरीवाल्यांना पंधरा दिवसात हटवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केल्यानंतर त्याबाबतीत काही कारवाई न झाल्यामुळे मनसेच्या
कार्यकर्त्यांनी आज ठाणे स्थानकाबाहेर उभ्या
असलेल्या फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मोडतोड करत त्यांना हटवल्याचं वृत्त आहे. मनसे
कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे दादर तसंच इतर स्थानकांबाहेरील फेरीवाले निघून गेले
असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
****
नाशिकच्या कॅटस
अर्थात कॉम्बेट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची अठ्ठाविसावी
तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. आज सकाळी नाशिकमध्ये या वैमानिकांचा दीक्षांत सोहळा
लष्करी थाटात पार पडला. यावेळी या तुकड्यातल्या वैमानिकांचा सत्कार करण्यात आला. तसंच
हवाई प्रात्याक्षिकं सादर करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment