Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
बिल्किस बानो सामुहिक
बलात्कार प्रकरणात दोषी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई झाली आहे का, अशी
विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. या संदर्भात आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश
दीपक मिश्रा यांनी, दोषी पोलिस कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत कसं घेण्यात आलं, असा प्रश्न
विचारला. या प्रकरणी स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
2002 च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानो वर सामुहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी अधिक
नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी न्यायालयानं बिल्किस बानो ला स्वतंत्र याचिका सादर
करण्याची परवानगी दिली आहे.
****
गुजरात हा अनमोल
असून, तो कधीही विकला जाऊ शकत नाही, असं काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी
म्हटलं आहे. काल अहमदाबाद इथं पाटीदार नेता नरेंद्र पटेल यांनी आपल्याला भाजप प्रवेशाच्या
बदल्यात एक कोटी रुपयांचा प्रस्ताव आल्याचा दावा काल केला होता, त्या पार्श्वभूमीवर
गांधी आज ट्वीटर संदेशात ही बाब नमूद केली.
भाजपचे प्रवक्ते
भारत पंड्या यांनी मात्र नरेंद्र पटेल यांचा हा दावा निराधार असल्याचं सांगत सर्व आरोप
फेटाळून लावले आहेत.
****
हिमाचल प्रदेश
विधानसभा निवडणूकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यत 195 उमेदवारांनी
आपले अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची छाननी
उद्या होणार आहे. तर गुरुवारी अर्ज मागे
घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 68 सदस्यीय विधानसभेसाठी पुढल्या महिन्याचा 9 तारखेला
एका टप्प्यात मतदान होणार आहे
****
जपानमध्ये घेण्यात आलेल्या मध्यावधी निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान
शिंजो आबे यांना मोठा विजय मिळाला. आबे यांच्या आघाडीला जपानी संसदेत दोन तृतीयांश
बहुमत मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो आबे यांचं अभिनंदन
केलं आहे.
****
म्यानमार सरकारने रोहिंग्या मुसलमानांना काही अटींच्या आधारावरच
देशात परतण्याची परवानगी द्यावी, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं
आहे. या प्रकरणाचा धार्मिक स्तरावर हिंसाचारासाठी वापर होऊ शकतो, अशी शक्यता असल्याचं,
ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मानवता आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा अत्यंत संवेदनशील
मुद्दा असल्यानं, रोहिंग्यांच्या मुसलमानांच्या स्वदेशी परतण्यासाठी अटी निर्धारित
करणं आवश्यक असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.
****
वादग्रस्त धर्मप्रचारक जाकीर नाईक याच्या
विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात देश सोडून गेलेल्या जाकीर नाईक विरोधात आरोपपत्र
दाखल करण्याबाबतच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या असून, या आठवड्यात
ते विशेष न्यायालयासमोर सादर केलं जाईल, असं पीटीआयच्या बातमीत
म्हटलं आहे. जाकीरविरोधात दहशतवादी कारवायांना पैसा पुरवण्याचा
तसंच काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
****
बिहारमध्ये मुंगेरनजीक आज एका रेल्वे अपघातात चार महिला ठार
तर एक महिला जखमी झाली. जवळच्या एका घाटावर स्नान करून घरी परतत असलेल्या या पाच महिला
रेल्वे रुळ ओलांडत असताना, भागलपूर दानापूर इंटरसिटी गाडीखाली येऊन त्यांचा मृत्यू
झाला. दाट धुक्यामुळे या महिलांना रेल्वेचा अंदाज न आल्यानं, ही दुर्घटना घडल्याचं,
पोलिस सुत्रांनी सांगितलं.
****
मुंबईत आज एका रेल्वेच्या चालकाचा दुसऱ्या रेल्वेखाली येऊन मृत्यू
झाला. सौराष्ट्र जनता एक्सप्रेस ही गाडी मागून येणाऱ्या ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसला
पुढे जाऊ देण्यासाठी बोईसर इथं थांबली असताना, गाडीचे चालक उमेशचंद्र आर हे इंजिनची
पाहणी करत होते, त्याचवेळी मागून येणाऱ्या ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसखाली येऊन त्यांचा
मृत्यू झाला.
****
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात निवडून
आलेले भारतीय जनता पक्षाचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा काल भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात दानवे
यांनी सरपंचांनी सरपंचकी समजून घेत कर्तव्यं
आणि अधिकार जाणून घ्यावेत, असं आवाहन केलं. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, यांच्यासह
अनेक मान्यवर या सत्कार समारंभाला उपस्थित होते. यावेळी
जिल्ह्यातल्या ११७ सरपंच आणि ७५४ ग्रामपंचायत सदस्यांना यावेळी गौरवण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment