Tuesday, 24 October 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 24.10.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२४ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

उत्तर प्रदेशात लखनौ आग्रा द्रुतगती महामार्गावर आज वायुदलाची जवळपास २० लढाऊ विमानं उतरली आहेत. या हवाई कसरतींमध्ये मिग 2000, सुखोई 30 आणि ए एन 32 प्रकारातल्या विमानांचा समावेश आहे. लढाऊ विमानांच्या या कसरती पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली आहे.

****

भारत तिबेट सीमा पोलिस - आयटीबीपी चा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयटीबीपीला शुभेच्छा दिल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलिसांनी साहस, शौर्य तसंच मानवतावादी कार्याच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.

****

संयुक्त राष्ट्र दिवस आज साजरा होत आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी होणं, हा भारतासाठी गौरव असल्याचं, मोदी यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या कार्याची जनतेला माहिती करून देण्याच्या उद्देशानं, १९४८ पासून २४ ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून पाळला जातो.

****

केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्याही राजकीय पक्षाला विशेष प्राधान्य देत नसल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी नमूद केलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप  फेटाळून लावला.  हवामानासह अनेक गोष्टींचा विचार करूनच, हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका गुजरातच्या आधी घेत असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

राज्यरिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य सरकारनं उच्चाधिकार समितीची स्थापना केली आहे. या समितीपरिवहन विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, परिवहन आयुक्त आणि कामगार आयुक्तांचा समावेश आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.

****

बडोदा इथं होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध लेखक राजन खान, रवींद्र गुर्जर, रवींद्र शोभणे, किशोर सानप आणि लक्ष्मीकांत देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नामांकन मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही.   

****

No comments: