Sunday, 22 October 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD-22.10.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशातल्या बंदरांचं आधुनिकीकरण करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमधल्या भावनगर इथं दहेज - घोघा या महत्त्वकांक्षी रो-रो सागरी फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधानांनी घोघा ते दहेज फेरीनं प्रवास केला, त्यानंतर दहेज इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सागरमाला प्रकल्पामुळे देशभरात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, तसंच या बंदरांच्या माध्यमातून देशात समृद्धीची सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे देशाला व्यापाराची नवीन संस्कृती मिळाली असल्याचं सांगून पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेनं जात असल्याचं नमूद केलं.

****

सरकारनं सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना, ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे रोख व्यवहार करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या मुलभूत कागदपत्रांची तपासणी अनिवार्य केली आहे. पत्त्याच्या पुराव्याच्या खोट्या प्रती वापरण्यावर आळा बसावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागानं ही अधिसूचना जारी केली.

****

लघू आणि मध्यम उद्योगांवर लावण्यात आलेला वस्तू आणि सेवा कराचा दर कमी करण्यासाठी कर दराची पुनर्रचना आवश्यक असल्याचं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी म्हटलं आहे. केंद्र आणि राज्यातल्या अनेक करांना मिळून एक कर प्रणाली असलेल्या जीएसटीला स्थिर होण्यासाठी कमीत कमी एका वर्षाचा कालावधी लागेल, असं त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. जीएसटीमुळे लघू आणि मध्यम उद्योग तसंच सामान्य जनतेवर कराचा बोजा पडत असेल, तर कराचे दर कमी करण्यात येतील, असं ते म्हणाले.

****

शेतकऱ्यांना कीटकनाशकातून विषबाधा झाल्याप्रकरणी जबाबदार असलेले अनधिकृत बियाणे, कीटकनाशक विक्रेत्यांवर यंत्रणेनं कडक कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यवतमाळ इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. कीटकनाशक फवारणीतून विषबाधेनं शेतकऱ्यांचे झालेले मृत्यू, ही अतिशय गंभीर बाब असून, नफा कमावण्यासाठी शेतकरी, शेतमजुरांचे जीव घेणाऱ्यांना राज्य शासन योग्य धडा शिकवेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्याचे माजी आमदार शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते संपतराव मारुती उर्फ एस. एम. पाटील यांचं आज पुण्यात निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. स्वातंत्र्य संग्रामात सक्रीय सहभाग घेतलेले पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, एस टी महामंडळाचे संचालक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, आदी पदांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. १९६७ ते ७२ दरम्यान त्यांनी माढा मतदार संघाचं विधानसभेत प्रतिनिधीत्व केलं. पाटील यांच्या पार्थिव देहावर माढा तालुक्यात वरवडे इथं आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

वादग्रस्त धर्मप्रचारक जाकीर नाईक याच्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात देश सोडून गेलेल्या जाकीर नाईक विरोधात आरोपपत्र दाखल करण्याबाबतच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या असून, या आठवड्यात ते विशेष न्यायालयासमोर सादर केलं जाईल, असं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. जाकीरविरोधात दहशतवादी कारवायांना पैसा पुरवण्याचा तसंच काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

****

बौध्दांची स्वतंत्र धार्मिक ओळख निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षा भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष ड़ॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. लातूर इथं आयोजित अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेत ते आज बोलत होते. परिषदेचं उद्‌घाटन झारखंड राज्यातले भिक्खु डॉ के संघरक्षित महाथेरो यांच्या हस्ते झालं. परिषदेपूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते आंबेडकर पार्क अशी धम्म फेरी काढण्यात आली.

****

ढाका इथं सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज सायंकाळी भारत आणि मलेशिया संघात लढत होणार आहे. सायंकाळी सात वाजता या सामन्याला प्रारंभ होईल. काल उपांत्य सामन्यात भारताकडून चार शून्य असा पराभव झालेल्या पाकिस्तान संघाचा कोरिया संघाशी कांस्य पदकासाठी सामना होईल.

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतचा पुरूष एकेरीच्या अंतिम सामना आज दक्षिण कोरियाच्या ली ह्युन ई सोबत होईल.

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुंबई इथं सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, भारतानं प्रथम फलंदाजी करत आठ बाद २८० धावा करत, न्यूझीलंड संघाला २८१ धावांचं आव्हान दिलं आहे.

****


No comments: