Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 OCT. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
**
पोलिस यंत्रणा बळकटीकरणासाठी राज्य
सरकारची ४०० कोटी रूपयांची योजना
**
बँक खातेधारकांना आधार
क्रमांक बँक खात्याशी संलग्न करणं बंधनकारक असल्याचं, भारतीय रिजर्व्ह बँकेचं स्पष्टीकरण
**
सांगली जिल्ह्यात ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात १० जण ठार तर १३ जण जखमी
आणि
** आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा मलेशियासोबत सामना तर डेन्मार्क बॅडमिंटन स्पर्धेच्या
अजिंक्यपदासाठी किदांबी श्रीकांतची दक्षिण कोरियाच्या ली ह्युन ई सोबत लढत
****
पोलिस सेवेत सुधारणा करण्यासाठी
आणि आवश्यकतेच्यावेळी पोलिस मदत त्वरित उपलब्ध व्हावी या दृष्टीनं पोलिस यंत्रणेचं
बळकटीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. या अंतर्गत सर्व पोलिस नियंत्रण
कक्षांचं आधुनिकीकरण करण्यात येणार आसून. यासाठी चारशे कोटी रूपयांची तरतूद करण्यात
आली आहे. नवीन योजनेनुसार कोणतीही घटना घडल्यानंतर शहरी भागात आठ मिनिटांत आणि ग्रामीण
भागात पंधरा मिनिटांत पोलिस घटनास्थळी दाखल होऊ शकतील. तसंच दूरध्वनीवरूनही एखादी तक्रार
आल्यास तेवढ्याच कालावधीत पोलिस घटनास्थळी दाखल होऊ शकतील, अशी यंत्रणा उभारण्यात येणार
आहे.
****
राज्यातल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधून एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रम
पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या रूग्णालयांमध्ये
एक वर्षाची बंधपत्रित सेवा पूर्ण केल्याशिवाय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना आता प्रवेश घेता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना
पदव्युत्तर पदवीसाठीची प्रवेश परीक्षाही देता येणार नाही. ग्रामीण,
दुर्गम आणि आदिवासी भागात तसंच सरकारी रुग्णालयांमघ्ये डॉक्टरांची कमतरता
जाणवत असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक
वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
****
बँक
खातेधारकांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करणं बंधनकारक असल्याचं, भारतीय
रिजर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात गेल्या काही दिवसांत माध्यमातून प्रसिद्ध
झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बँकेनं, हा खुलासा केला. धनशोधन निवारण अधिनियमांतर्गत
आधार जोडणी अनिवार्य असून, बँकांनी कोणत्याही निर्देशांची वाट न पाहता, या नियमाची
त्वरित अंमलबजावणी करावी, असं नमूद केलं आहे. या वर्षी एक जूनला जारी झालेल्या राजपत्रात
ही बाब स्पष्ट केली असल्याचंही रिजर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
****
मुंबईत काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकांबाहेरच्या फेरीवाल्यांविरोधात धडक आंदोलन करत, फेरीवाल्यांचे
स्टॉल्स उधळून लावले. हे फेरीवाले पंधरा दिवसात हटवण्याची मागणी मनसे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती, मात्र त्याबाबत
काहीही कारवाई न झाल्यानं, मनसे कार्यकर्त्यांनी
काल ठाणे, कल्याण, वसई, आदी रेल्वेस्थानकाबाहेर
फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मोडतोड केल्याचं वृत्त आहे.
मनसेच्या
या कृतीबाबत भारतीय रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त करत, हल्लेखोरांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गरीब
फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी भीमसैनिक आणि आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील,
असा इशाराही आठवले यांनी दिला आहे.
दरम्यान,
बृहन्मुंबई महापालिकेनं, अनधिकृत
फेरीवाल्यांकडून वसूल करण्यात येणारा दंड तसंच विमोचन आकार
यात दुपटीनं वाढ केली आहे. गेल्या
अठरा तारखेपासून हे नवे दर लागू झाल्याचं, महापालिकेकडून सांगण्यात आलं.
****
सांगली जिल्ह्यात काल पहाटे झालेल्या एका अपघातात १० जण ठार तर
अन्य १३ जण जखमी झाले. फरशी
वाहून नेणारा एक ट्रक तासगाव - कवठे महांकाळ
रस्त्यावर योगेवाडी गावाजवळ उलटला, त्यातून प्रवास करणाऱ्या काही कामगारांचा
फरशांखाली दबून मृत्यू झाला. एसटीचा संप असल्यामुळे हे कामगार ट्रकमधून
सांगलीला जात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
भाऊबीजेचा
सण काल सर्वत्र साजरा झाला. यासोबतच गेले पाच दिवस सुरू असलेल्या दीपोत्सवाचीही काल
सांगता झाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल
औरंगाबाद इथं हर्सूल कारागृहातल्या कैद्यांसोबत दिवाळी साजरी केली.
महिला कैदी आणि त्यांच्या मुलांना दिवाळीचा फराळ आणि नवीन कपड्यांचं
यावेळी वाटप करण्यात आलं. कारागृहात असलेल्या महिलांसाठी राज्य
महिला आयोगाच्या वतीनं लवकरच सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि सोलर वॉटर हिटर लावण्यात येणार असल्याची
माहिती रहाटकर यांनी यावेळी दिली. कारागृहातल्या पुरुष कैद्यांनाही
यावेळी फराळ तसंच १०० ब्लॅंकेट्स भेट देण्यात आले.
औरंगाबाद
इथं दिवाळीनिमित्त गरवारे कम्युनिटी सेंटरच्या वतीनं किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली,
या स्पर्धेत मुलांनी रायगड, प्रतापगड, जंजिरा, आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती साकाराल्या.
****
पोलिस
हुतात्मा दिनानिमित्त काल हुतात्मा पोलिसांना अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथं पोलिस
आयुक्तालयात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पोलिस स्मृती स्तंभाला पुष्पचक्र
अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. मराठवाड्यात जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी
सह सर्वत्र हुतात्मा पोलिसांना अभिवादन करण्यात आलं.
****
नांदेड
जिल्ह्यात माहूर इथं शेळ्या राखणाऱ्या दोन युवकांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. काल
दुपारी पारडी शिवारात ही घटना घडली.
उस्मानाबाद
जिल्ह्यात कळंब तालुक्यात दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. खामसवाडी इथं ही
दुर्घटना घडली. खदानीत साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता, त्यांचा बुडून मृत्यू
झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
लातूर
जिल्ह्यात रेणापूर तालुक्यात एका दाळमिलमध्ये कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला, परवा
शुक्रवारी ही घटना घडली.
बीड जिल्ह्याच्या परळी
तालुक्यातल्या धर्मापुरी गावाजवळ काल कार उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर चार जण
जखमी झाले. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धर्मापुरीच्या सबस्टेशन जवळ चालकाचा कारवरील
ताबा सुटल्यानं हा अपघात घडला.
****
जालना
जिल्ह्याच्या परतूर तालुक्यात विद्युततारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग
लागून, शेतातला ऊस जळाला. मौजे रोहिना बुद्रुक इथं ही दुर्घटना
घडली. या भागातल्या पाच शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परतीच्या पावसामुळे बीड जिल्ह्यात १२१ गावातल्या शेतकऱ्यांचं मोठं
नुकसान झाल्याचं, जिल्हा कृषी विभागाच्या अहवालात म्हटलं आहे. अनेक ठिकाणी कापसावर लाल्या रोग पडला असून,
वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत, काढलेली बाजरी काळी पडली असून, बाजरीलरा
कोंभ फुटले असल्याचं, कृषी आयुक्तालयाला पाठवलेल्या
अहवालात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या सदस्यपदी नांदेड इथले बालरोगतज्ज्ञ
डॉक्टर अजित गोपछडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यासाठीची
निवडणूक गेल्या तीन तारखेला परिषदेच्या मुंबईतल्या कार्यालयात झाली होती. या समितीत डॉक्टर गोपछडे हे मराठवाड्यातले एकमेव
सदस्य आहेत. परिषदेच्या अध्यक्षपदी डॉक्टर शिवकुमार उत्तुरे यांची
तर उपाध्यक्षपदी डॉक्टर मनोहर लेले यांची
निवडही बिनविरोध झाली आहे.
****
ढाका इथं सुरू असलेल्या
आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं काल पाकिस्तानवर चार शू्न्य असा विजय मिळवत अंतिम
सामन्यात धडक मारली. गुर्जंतसिंह, ललित उपाध्याय, हरमनप्रितसिंग, आणि सतबीरसिंग या
चौघांनी हे गोल केले. भारताचा अंतिम सामना आज सायंकाळी
मलेशियाविरूद्ध होईल तर पाकिस्तान आणि कोरिया संघात कांस्य पदकासाठी
लढत होईल.
****
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी
श्रीकांतचा पुरूष एकेरीच्या अंतिम सामना आज दक्षिण कोरियाच्या ली ह्युन ई सोबत होईल.
श्रीकांतनं काल उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या वांग विंग की विन्सेन्टचा २१-१८, २१-१७
असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. पहिला सामना आज मुंबईतल्या वानखेडे मैदानावर खेळवला
जाणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला प्रारंभ होईल. मालिकेतला दुसरा सामना २५
ऑक्टोबरला पुण्यात तर तिसरा सामना २९ ऑक्टोबरला कानपूर इथं होणार आहे. या मालिकेनंतर
दोन्ही संघात तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे.
****
जालना इथल्या आर.डी. भक्त
फार्मसी महाविद्यालयात उद्यापासून
दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धांचं
आयोजन करण्यात आलं आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दयानंद
भक्त यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद
आणि बीड जिल्ह्यातल्या ७० महाविद्यालयांमधले महिला आणि पुरुष कुस्तीपटू या स्पर्धेत
सहभागी होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment