Monday, 30 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 30.10.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 OCT. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ सकाळी .५० मि.

****

** उद्याच्या एकता दौडमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

** ऊस देऊन साखर कारखाने जगवण्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं शेतकऱ्यांना आवाहन

** औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे विजय औताडे यांची निवड

आणि

** क्रिकेटमध्ये न्‍यूझीलंडला तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात सहा धावांनी पराभूत करून भारतानं दोन -एक फरकानं मालिका जिंकली तर भारताच्या किदांबी श्रीकांतला फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद

****

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उद्या साजरी होत असून या निमित्त देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. या दौडमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा ३७वा भाग काल प्रसारित झाला. सरदार पटेल यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी यावेळी केला. याचबरोबर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी, येत्या चार नोव्हेंबरला गुरुनानक यांची जयंती, तसंच येत्या १४ नोव्हेंबरला देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची जयंती, असल्यानं, पंतप्रधानांनी या त्यांचं स्मरण केलं.

ऐतिहासिक वारसा तसंच वास्तूंची सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी आपणा सर्व देशवासियांची असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. आपल्या संवादात पंतप्रधानांनी चंद्रपूर इथल्या इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेनं चंद्रपूरच्या भुईकोट किल्ल्यात राबवलेल्या स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

आशिया चषक जिंकल्याबद्दल हॉकी संघाचं, डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्याबद्दल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचं, तसंच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचं यावेळी पंतप्रधानांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

****

अहमदनगर जिल्ह्यासह शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी साडेआठ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. काल शिर्डी इथं साई मंदिरात माध्यान्ह आरतीला हजेरी लावून, साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री राम शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यापूर्वी गडकरी यांनी शनिशिंगणापूर इथं हजेरी लावून शनिदर्शन घेतलं.

****

ऊस देऊन साखर कारखाने जगवण्याचं आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. ते काल औरंगाबाद  जिल्ह्यातल्या संभाजीराजे साखर कारखान्याच्या गळित हंगामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच इथेनॉलसारख्या उपपदार्थ निर्मितीवर भर देऊन शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करावेत असंही गडकरी यावेळी म्हणाले. छोट्या कारणासाठी शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातला कारखाना सोडून अन्यत्र ऊस देऊ नये असं आवाहनही त्यांनी यावेळी बोलतांना केलं.

औरंगाबादनजिकच्या सातारा परिसरातल्या श्रीयश प्रतिष्ठानच्या फार्मसी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उदघाटन काल  गडकरी यांच्या हस्ते झालं.

संशोधनावर देशाचं भवितव्य अवलंबून असून, संशोधनाची व्याप्ती वाढण्याची आवश्यकता असलाचं मत गडकरी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केलं.

****

बुद्धीझम ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी भेट असल्याचं श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी म्हटलं आहे. धम्मयान शैक्षणिक आणि धर्मादाय संस्था तसंच पर्यटन विभागातर्फे औरंगाबाद इथं आयोजित, दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट फेस्टीवल फॉर कल्चरल ॲण्ड रिलेशनशिप २०१७, या परिषदेचं राजपक्षे यांच्या हस्ते उदघाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. या आंतरराष्ट्रीय बुध्दीस्ट फेस्टीव्हलमुळे भारताचे श्रीलंकेसह इतर बुध्दीस्ट देशांसोबतचे नातेसंबंध वृध्दीगंत होण्यास निश्चितच चालना मिळेल असं राजपक्षे यावेळी म्हणाले. राजपक्षे यांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीलाही काल भेट दिली.

****

विमानतळात प्रवेश करण्यासाठी आता ओळखपत्र म्हणून मोबाईल आधार ग्राह्य धरलं जाणार आहे. हवाई उड्डाण सुरक्षा संस्थेच्या प्रसिध्दीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार पालकांबरोबर येणाऱ्या मुलांना कुठल्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज नसेल. हवाई उड्डाण सुरक्षा संस्थेनं प्रसिध्द केलेल्या यादीतल्या दहा ओळखपत्रांपैकी कुठलेही एक ओळखपत्र विमानतळ परिसरात प्रवेश करण्यासाठी ग्राह्य धरलं जाणार आहे. यात पारपत्र, मतदान ओळखपत्र, आधार किंवा मोबाईल आधार, पॅन कार्ड आणि वाहनचालक परवाना यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी सरकारी शिक्षण संस्थांकडून जारी करण्यात आलेलं छायाचित्रासह ओळखपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नंदकुमार घोडेले ७७ मतं मिळवत विजयी झाले आहेत. त्यांनी एमआयएमचे अब्दुल नाईकवाडे यांचा पराभव केला. अब्दूल नाईकवाडे यांना २५, तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार अय्युब खान यांना ११ मतं मिळाली. पमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे विजय औताडे निवडून आले. ्यांनाही ७७ मते िळाली तर एमआयएमच्या संगीता वाघुले यांना २५ मते मिळाली. काँग्रेसचे अफसरखान यांना १२ मते मिळाली.

शहरातलं प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे स्मारक, रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्था, स्वच्छता या प्रमुख मुद्यावर काम करणार असल्याचं सांगत, महापौर घोडेले यांनी आपला संकल्पनामा प्रसिद्ध केला.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत फेरीवाल्यांच्या विरोधात केलेलं आंदोलन बेकायदेशीर असून ते मागं घ्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. मनसेनं जर हे आंदोलन मागे घेतलं नाही तर भीमसैनिक त्यांच्या आंदोलनाला चोख उत्तर देतील असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला. कायदा हातात घेऊन विरोध करणं योग्य नाही असं मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

भारतानं न्यूझीलंडला तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सहा धावांनी पराभूत करुन तीन सामन्यांची मालिका दोन-एक फरकानं जिंकली आहे. कानपूरमध्ये काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ निर्धारित ५० षटकात ७ गडी बाद ३३१ धावाच करु शकला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करतांना भारतानं विराट कोहली आणि रोहित शर्माच्या व्यक्तीगत शतकांच्या जोरावर ६ गडी बाद ३३७ धावा करुन न्यूझीलंडला विजयासाठी ३३८ धावा करण्याचं आव्हान दिलं. १४७ धावा करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीरावा तर विराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
****

फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद किदांबी श्रीकांतनं पटकावलं आहे. काल पॅरिस इथं झालेल्या अंतिम सामन्यात श्रीकांतनं जपानच्या केन्टा निशिमोटोचा २१ - १४ आणि २१ - १३ असा सहज पराभव केला. श्रीकांतचं हे या वर्षातलं चौथं सुपरसिरीज विजेतेपद आहे. यापूर्वी त्यानं इंडोनेशिया सुपर सिरीज, ऑस्ट्रेलिया खुली बॅडमिंटन आणि डेन्मार्क सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत विजय मिळवला आहे. एकाच वर्षात चार सुपर सिरीज स्पर्धा जिंकणार तो पहिलाच खेळाडू ठरला आहे तसंच फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीचं जेतेपद मिळवणाराही तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘सृजन २०१७’ या युवक महोत्सवाला कालपासून औरंगाबाद इथं प्रारंभ झाला. प्रसिद्ध अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर हिच्या हस्ते या महोत्सवाचं काल उदघाटन झालं. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जवळपास ३८ प्रकारच्या कलांचं सादरीकरण करण्यात येणार आहे.

****

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते लक्ष्मीनारायण ऊर्फ लालाजी जैस्वाल यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी जैस्वाल यांचं अंत्यदर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. जैस्वाल यांचं परवा रात्री औरंगाबाद इथं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते.

****

जालन्यातल्या तेरा मटका बुकींना जिल्ह्यातून एका वर्षाकरता हद्दपार करण्यात आलं आहे. मटका-जुगार न चालवण्याचं कायदेशीर शपथपत्र देऊनही या मटका बुकींनी अवैध व्यवसाय सुरूच ठेवल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेनं त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित केली होती. या प्रस्तावाच्या आधारे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी ही कारवाई केली.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...