Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 October 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
ग्राहकांच्या हित रक्षणासाठी सरकार कटीबद्ध असून, नव्या
ग्राहक कायद्याचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ग्राहक संरक्षण विषयक आंतरराष्ट्रीय
परिषदेच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. ग्राहकांना सक्षम करणं तसंच त्यांना कुठल्याही
अडचणींचा सामना करावा लागू नये, यावर सरकारचं लक्ष असल्याचं ते म्हणाले. प्रभावी तक्रार
निवारण प्रणाली ही लोकशाही व्यवस्थेत महत्वाची असून, सरकार त्यासाठी तंत्रज्ञान आणि
मजबूत तक्रार निवारण प्रणाली यांची एकत्रित सांगड घालत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद
केलं.
****
तेल उत्खनन आणि शुद्धीकरण क्षेत्रातले निर्बंध आता झपाट्यानं
कमी होत असून, नव्यानं उत्खननासाठी मुबलक संधी असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. या क्षेत्रातल्या संधींची ओळख करून देण्याच्या
उद्देशानं केंद्रीय तेल आणि वायू मंत्रालयातर्फे आज मुंबईत एक संवादसत्र आयोजित करण्यात
आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. सरकार गॅसचा शोध लावण्यासाठी आणि उत्पादन करण्यासाठी
४० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधान यांच्यासह पेट्रोलियम
विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सत्रात नवीन उद्योजक प्रतिनिधींना सविस्तर माहिती
दिली.
****
खासदार शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्करच्या मृत्यूची
चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकामार्फत करण्याची मागणी करणारी याचिका
दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी
यांनी ही याचिका दाखल केली होती. राजकीय हेतूनं ही याचिका दाखल केली असल्याचं न्यायालयानं
म्हटलं आहे.
****
केंद्रीय दक्षता आयोग ३० ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दरम्यान
दक्षता जागृती सप्ताह साजरा करणार असल्याचं दक्षता आयुक्त के व्ही चौधरी यांनी सांगितलं.
ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. ‘माझा संकल्प - भ्रष्टाचार मुक्त भारत’
ही यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना आहे. भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यासाठी दक्षता
आयोगानं ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली असून, या माध्यमातून नागरिक भ्रष्टाचार विरोधी
शपथही घेऊ शकतील, असं चौधरी यांनी सांगितलं.
जालना इथं यानिमित्त निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं
पोलिस उपअधीक्षक रविंद्र निकाळजे यांनी सांगितलं.
****
एकता हेच भारताचं सामर्थ्य असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री
किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या ३१ ऑक्टोबरला एकता दौडचं आयोजन करण्यात
आल्याचं त्यांनी सांगितलं. अतिशय भव्य अशा उपक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू युवक राहणार
असून, संपूर्ण देशभर हा उपक्रम राबवला जाणार असल्याचं ते म्हणाले.
****
एर्नाकुलमहून मुंबईला जाणारी दुरांतो एक्सप्रेस आज दुपारी
कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड ते झाराप रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावरुन घसरली. यामुळे
कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातात कोणत्याही जीवित हानीचं
वृत्त नाही.
****
मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानकाजवळच्या झोपडपट्टीला
आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु
असताना ही आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर
नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातल्या
आठ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे. सरपंचपदाच्या सात जागांसाठी १८, तर सदस्यपदाच्या
२४ जागांसाठी ११२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गाढेसावरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची
निवडणूक बिनविरोध झाली आहे. २१ केंद्रावर होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी ८४ अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
****
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या रोहिलागड इथलं देशी
दारूचं दुकान बंद करण्यासाठी आज ग्रामसभा घेऊन मतदान घेण्यात आलं. या वेळी एक हजार
४६४ पैकी ८४२ महिलांनी देशी दारूचं दुकान बंद व्हावं यासाठी मतदान केलं. त्यामुळे या
गावातलं देशी दारूचं दुकान बंद करण्यात येणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या
अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितलं.
****
बीड शहरात ५० आणि शंभर रुपयांच्या बनावट नोटा बनवणाऱ्या
सय्यद शुकुर शब्बीर याला अटक करण्यात आली आहे. शहरातल्या गांधीनगर भागात शब्बीर हा
बनावट नोटा बनवतो अशी माहिती मध्यप्रदेश पोलिसांना मिळाली होती, त्यावरून मध्यप्रदेश
पोलिसांनी बीड पोलिसांच्या मदतीनं शब्बीरच्या घरावर धाड टाकली. याठिकाणी नोटा बनवण्याचं
साहित्य, एक लाख ५० हजाराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. बनावट नोटा बनवण्याचं
हे मोठं रॅकेट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
****
No comments:
Post a Comment