Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
नवीन ग्राहक कायदा तयार करण्याची प्रक्रिया
सुरु असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ग्राहक
संरक्षणावरच्या जागतिक परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत
होते. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान, राज्यमंत्री सी आर
चौधरी यावेळी उपस्थित होते. ग्राहकांसाठी केंद्रीय ग्राहक नियामक प्राधिकरणही स्थापन
केलं जाईल, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. वस्तू आणि सेवा कर - जीएसटी प्रणालीचा सर्वात
मोठा लाभार्थी हा ग्राहक आणि मध्यमवर्गीय असल्याचं त्यांनी नमूद केलं. जीएसटीनंतर एक
नवीन व्यवसायिक संस्कृती सुरु झाली असून, त्याचा ग्राहकाला सर्वात जास्त फायदा होणार
असल्याचं पंतप्रधान म्हणाले. ग्राहक सशक्तीकरण आणि ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये,
हे सुनिश्चित करणं यावर सरकार विशेष लक्ष केंद्रीत करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
नवीन ग्राहक संरक्षण विधेयक एक क्रांतिकारी विधेयक ठरेल, असा विश्वास पासवान यांनी
यावेळी व्यक्त केला.
****
दरम्यान, पंतप्रधानांनी चीनच्या सत्ताधारी
कम्यूनिस्ट पक्षाचे प्रमुख म्हणून दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल राष्ट्रपती शी जिनपिंग
यांचं अभिनंदन केलं आहे. ट्विटरसारख्या चीन मधल्या लोकप्रिय मायक्रोब्लॉग वीबो वर दिलेल्या
संदेशात पंतप्रधानांनी, जिनपिंग भारत - चीन संबंधांना अधिक दृढ करतील, असा विश्वास
व्यक्त केला.
****
राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं आज
काश्मीरमधल्या बडगाम इथं, हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सलाहुद्दीनचा
मुलगा सैय्यद शाहीद युसूफ याच्या घरात शोधमोहीम राबवली. या तपासादरम्यान पाच मोबाईल,
एक लॅपटॉप आणि आक्षेपार्ह मजकुर असलेले कागदपत्रं सापडले असल्याचं एनआयएच्या अधिकाऱ्यानं
सांगितलं. शाहीद याला काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी परदेशातून निधी गोळा
केल्याप्रकरणी एनआयएनं अटक केली आहे.
****
आयातीपासून देशांतर्गत उद्योगांचं संरक्षण
करण्यासाठी युरोपियन देशांतून तसंच चीन, कोरिया यासारख्या देशांतून आयात होणाऱ्या हलक्या प्रतीच्या स्टेनलेस स्टीलवर
प्रतिमूल्यावपती आणि इतर शुल्क आकारण्यात येणार आहे. अॅंटी डंपिंग आणि इतर शुल्क प्राधीकरणानं
शिफारस केल्यानं हे शुल्क आकारण्यात येणार आहे. आयात झालेल्या स्टेनलेस स्टीलवर चार
पूर्णांक ५८ शतांश टक्के ते ५७ पूर्णांक ३९ शतांश टक्के इतकं शुल्क आकारलं जाणार असून,
ही आकारणी १० डिसेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहे.
****
केंद्र सरकारची भ्रष्टाचाराविरोधी मोहीम
अधोरेखित करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं येत्या आठ नोव्हेंबरला काळा पैसा विरोधी दिन
पाळण्याचं ठरवलं आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत ही माहिती दिली. गेल्या
वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला केलेली विमुद्रीकरणाची घोषणा ही
काळया पैशाविरोधातल्या मोहिमेची सुरुवात होती, असं जेटली यांनी सांगितलं.
दरम्यान, अरुण जेटली अर्थव्यवस्थेच्या
स्थितीचं खोटं चित्र उभं करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. आठ नोव्हेंबर हा काळा
पैसा विरोधी दिन पाळण्याच्या भाजपाच्या निर्णयावरही ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा
यांनी टीका केली.
****
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ६८ जागांसाठी येत्या नऊ नोव्हेंबरला
एकाच टप्प्यात मतदान होणार असून, मतमोजणी १८ तारखेला होणार आहे.
****
देशभरात आज छठ पूजेचा उत्सव साजरा केला
जात आहे. संध्याकाळी मावळत्या सूयाला अर्घ्य देऊन या पूजेला सुरुवात होऊन उद्या सकाळी
सूर्योदयानंतर ही पूजा समाप्त होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र
मोदी यांनी लोकांना छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पूजेसाठी मुंबई महानगरपालिकेनं
समुद्र किनाऱ्यांवर भाविकांकरता विशेष सुविधा उपलब्ध
केल्या आहेत.
****
औरंगाबाद शहरातल्या अनधिकृत धार्मिक
स्थळांची यादी पोलिसांचा अहवाल आल्यावर महापालिका जाहीर करेल, अशी माहिती पालिका आयुक्त
डी. एम. मुगळीकर यांनी दिली आहे. धार्मिक स्थळांना असलेली लोकमान्यता, वाहतुकीसाठी
निर्माण होणारा अडथळा याबद्दल पोलिसांचा अहवाल मागवला असून, तो आल्यावर धार्मिक स्थळांची
अंतिम यादी न्यायालयात सादर केली जाईल, असं ते म्हणाले.
****
१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा
अंतिम सामना स्पेन आणि इंग्लंड संघात होणार आहे. काल नवी मुंबईत झालेल्या उपांत्य सामन्यात
स्पेननं मालीचा, तर कोलकता इथं झालेल्या दुसर्या उपांत्य सामन्यात इंग्लंडनं ब्राझीलचा
पराभव केला. अंतिम सामना येत्या शनिवारी कोलकता
इथं होणार आहे. त्याच दिवशी तिसर्या स्थानासाठी ब्राझिल आणि माली यांच्यात सामना होईल.
****
No comments:
Post a Comment