Monday, 30 October 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 30.10.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३० ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रगीतासाठी उभं राहणं, म्हणजे त्याप्रती आदरभावना व्यक्त करणं असल्याचं, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी म्हटलं आहे. लोक इतर ठिकाणी रांगेत उभं राहून वाट पाहू शकतात, मग सिनेमागृहात राष्ट्रगीतासाठी लोक ५२ सेकंद का उभं राहू शकत नाहीत, असा प्रश्न ही त्यांनी विचारला. पुण्यात प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात खेर त्यांनी हे मत व्यक्त केलं. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

दरम्यान, अर्थव्यवस्थेतून काळा पैसा वेचून काढण्यासाठी सरकार सतत पावलं उचलत राहील, असा पुनरुच्चार जावडेकर यांनी केला आहे. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेस पक्षानं ५० वर्षांच्या कार्यकाळात काळ्या पैशाविरोधात कोणतंही धाडसी पाऊस उचललं नाही, मात्र भाजप प्रणित सरकारनं तीनच वर्षात काळ्या पैशाविरोधात युद्ध छेडलं असल्याचं ते म्हणाले

****

राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजवणी वेळेत केली नाही तर विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते काल पुण्यात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे कर्जमाफीचा हा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचं पवार म्हणाले. कर्जमाफीच्या ऑनलाईन पद्धतीत येणाऱ्या अडचणींमुळे येत्या डिसेंबरपर्यंत कर्जमाफी होऊच शकत नाही असा दावाही त्यांनी केला आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथले ज्येष्ठ पत्रकार शिवराम कोंडे यांचं आज पहाटे ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी माहूर इथं अंत्यसंस्कार होणार आहे.

****

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शासन विविध योजना राबवत असून, शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते काल जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातल्या घोडसगाव इथं संत मुक्ताई साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या ठिकाणी उभारलेल्या १२ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाचं राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

****

No comments: